महाराष्ट्र-कर्नाटक समन्वय बैठक आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र-कर्नाटक समन्वय बैठक आज
महाराष्ट्र-कर्नाटक समन्वय बैठक आज

महाराष्ट्र-कर्नाटक समन्वय बैठक आज

sakal_logo
By

13838 - भगतसिंग कोश्यारी
60179 - थारवचंद गेहलोत

महाराष्ट्र-कर्नाटक समन्वय बैठक आज
दोन्ही राज्यपालांची उपस्थिती; सीमाभागातील नऊ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमाभागात असलेल्या जिल्ह्यातील प्रशासकीयसह अन्य प्रश्‍नांबाबत उद्या (ता. ४) येथे समन्वय बैठक होत आहे. रेसिडेन्सी क्लबमध्ये सकाळी ११ ते १ या वेळेत होणाऱ्या बैठकीला राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, कर्नाटकचे राज्यपाल थारवचंद गेहलोत यांच्यासह सीमा भागातील नऊ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या बैठकीसाठी रात्री उशिरा कर्नाटकचे राज्यपाल गेहलोत यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर बैठकीची जय्यत तयारी सुरू आहे. दोन्ही राज्यपाल शासकीय विश्रामगृह येथे राहणार असल्याने तेथे पोलिस बंदोबस्त तैनात आहे. राज्यपाल बैठकीला जाणाऱ्या मार्गावर आज बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली. दौऱ्यासाठी धैर्यप्रसाद चौकात भरणारी मंडई आज साहित्यासह हलवण्यात आली. विश्रामगृह ते रेडिसेन्सी क्लब रस्त्यावरील खड्डेही मुजवण्यात आले.
बैठकीसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्याबाहेरून येणारे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्यातील समन्वयाचे काम हे अधिकारी करतील. काल रात्री या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. उद्याच्या बैठकीत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दहा मिनिटे देण्यात आली आहेत.

राज्यपालांच्या सचिवांकडून आढावा
समन्वय बैठकीसाठी राज्यपालांचे सचिव संतोष कुमार आज कोल्हापुरात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठकीचा आढावा घेतला. नोडल अधिकाऱ्यांना दिलेली जबाबदारी व इतर तयारीची माहिती त्यांनी या बैठकीत घेतली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रभारी अपर जिल्हाधिकारी भगवान कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके आदी यावेळी उपस्थित होते.

या मुद्यांवर चर्चा शक्य
कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यावर या बैठकीत चर्चा शक्य आहे. याशिवाय गोव्यातून कर्नाटकमार्गे होणारी मद्य तस्करी, आंतरराज्य गुन्हेगारांना मिळणारी मदत, हत्तींसह इतर प्राण्यांचा होणारा त्रास हेही मुद्दे चर्चेत असतील. महाराष्ट्रातील काही प्रकल्प अलीकडे गुजरातला हलवण्यात आले, या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक व महाराष्ट्रातील उद्योगांची स्थिती, उपलब्ध जागा, वीज, पाण्याची उपलब्धता, जमिनीची माहितीही बैठकीत घेतली जाणार आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनी एका राज्यात तर वास्तव्य दुसऱ्या राज्यात आहे, अशांना येणाऱ्या अडचणीही यावेळी मांडण्यात येणार आहेत.