सागरी महामार्गावरील पूल मंजुर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सागरी महामार्गावरील पूल मंजुर करा
सागरी महामार्गावरील पूल मंजुर करा

सागरी महामार्गावरील पूल मंजुर करा

sakal_logo
By

सागरी महामार्गावरील पूल मंजुर करा

केळुसकर ः ...तरच कोकणच्या पर्यटन व्यवसायाला गती

कणकवली,ता. ४ ः पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई महानगरीशी जोगणाऱ्या रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र या महामार्गावरील उर्वरित ६ पुलांच्या मंजुरीसाठी सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी संघटितपणे तातडीने प्रयत्नशील रहावे, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ‘कोविआ’ने स्थापनेपासूनच कोकण रेल्वेसह मुंबई -कोकण-गोवा, पश्चिम किनारी सागरी महामार्ग हे प्रकल्प होण्यासाठी सातत्याने संघर्ष सुरू ठेवला आहे. सागरी महामार्गासाठी १९८० मध्ये आरोंदा-किरनपाणी, जैतापूर आदी ठिकाणी परिषदा घेतल्या होत्या; मात्र, त्यानंतर ४२ वर्षांत या महामार्गाचे भिजत घोंगडे आहे. त्याला कोकणातील सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींची अनास्था कारणीभूत आहे. यापुर्वीच्या राज्यकर्त्यांनी हा सागरी महामार्ग समृद्धी महामार्ग म्हणून जाहीर केला आहे. त्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. निधीही जाहीर केला आहे; मात्र असे असताना या महामार्गावरील केवळ रेवस-करंजा या पुलासाठीच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ८९८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या महामार्गावरील दिघी, आगरदांडा, बाणकोट, बागमांडले, जयगड आणि दाभोळ या उर्वरित ६ पुलांच्या बाबतीत रस्ते विकास महामंडळाने कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही. हे सर्वं पूल नाबार्डकडे प्रस्तावित आहेत. वेशवी-बाणकोट-बागमांड्या पुलाला तर २०१३ मध्ये नाबार्डकडून अर्थसाहाय्य मिळूनही तो रखडला आहे. एकीकडे केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या विद्यमान कार्यकाळात महाराष्ट्रासह देशातील अनेक महामार्ग, समृद्धी महामार्गाची कामे अल्पावधीतच पूर्ण झाल्याचे दिसते; मात्र पत्रकारांनी मुंबई-कोकण-गोवा महामार्गासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले तरी या महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.
---
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींवर टीका
पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यातील लोकप्रतिनिधी विकासकामांसाठी पक्षिय मतभेद विसरून एकत्रितपणे लढा देतात; मात्र कोकणवासीयांच्या दुर्दैवाने कोकणातील लोकप्रतिनिधी पक्षिय झालर लावून विकासकामांच्या बाबतीत संघटितपणे प्रयत्नरत नाही. त्यामुळे पाटबंधाऱ्यांसह विविध विकासकामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. सागरी महामार्ग हा अंतर कमी करणारा आहे. पर्यटन विकासाला चालना देणारा आहे. आता तरी लोकप्रतिनिधींनी हा महामार्ग सर्वं पुलांनिशी तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे एकत्रितपणे पाठपुरावा करावा, अशी मागणी केळुसकर यांनी केली आहे.