दारू तस्करांवर मोक्का लावण्याची केवळ घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू तस्करांवर मोक्का लावण्याची केवळ घोषणा
दारू तस्करांवर मोक्का लावण्याची केवळ घोषणा

दारू तस्करांवर मोक्का लावण्याची केवळ घोषणा

sakal_logo
By

दारू तस्करांवर मोक्का
लावण्याची केवळ घोषणा
कायदयाविना हात बांधलेले; जुन्या कायद्यानुसारच कारवाई
चिपळूण, ता. ४ः महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकारमधील राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी ‘‘गोव्यातून एक जरी बाटली महाराष्ट्रात आणल्यास थेट मोक्का लावू” असा इशारा दिला. त्यांच्या या घोषणेचे कायद्यामध्ये रूपांतर झालेले नाही. त्यामुळे चिपळुणात लाखोची गोवा बनावटीची दारू पकडूनसुद्धा संशयितांवर पोलिसांना मोक्कांतर्गत कारवाई करता येत नाही. गोवा बनावटीची करमुक्त दारू गोव्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत तस्करी करण्याचे प्रमाण मागील काही वर्षात झपाट्याने वाढले आहे. चिपळूण शहर आणि उपनगरात गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात येते. कंटेनर भरून लाखोची दारू गेली कित्येक वर्ष येत असताना पोलिसांकडून मात्र कारवाई होत नाही. उपनगरांमध्ये शाळांच्या परिसरातील घरातून गोवा बनावटीच्या दारूची विक्री होते. अनेकजण गोरगरिबांना गोवा बनावटीच्या दारूविक्रीतून गब्बर झाले आहेत. गोवा बनावटीच्या दारू व्यवसायात झपाट्याने वाढ होत आहे. चिपळूणपासून जवळ असलेल्या गावात गोवा बनावटीची दारू मिळत होती. एकाच गावात तीन ते चार ठिकाणी गोवा बनावटीची दारू मिळत होती. वाईन मार्टमध्ये मिळणाऱ्या दारूपेक्षा ही दारू स्वस्त असते. त्यामुळे ग्रामीण भागातील धाबेचालक आणि मद्यपान करणारे गोवा बनावटीच्या दारूला प्राधान्य देत होते. गोवा बनावटीच्या दारूचा व्यवसाय करून रस्त्यावर राहणारे म्हणून पाहिले जायचे अशा काहींनी स्वतःचे वजन वाढवून करोडोंचे बंगले उभारले आणि तालुक्यात अनेक युवकांना देशोधडीला लावले; मात्र या विक्रेत्यांवर कोणीही कारवाई करत नव्हता. चिपळूणचे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी पुढाकार घेऊन काही दिवसांपूर्वी २४ लाखाची गोवा बनावटीची दारू पकडली. त्यानंतर पुन्हा ४ लाख ७२ हजार रुपयाची गोवा बनावटीची दारू पकडण्यात आली. एकाच आठवड्यात तब्बल २९ लाखाची दारू पकडून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी गोव्यातून एक बाटली जरी दारू महाराष्ट्रात आणली आणि एकाच गुन्ह्यात दोन-तीनवेळा तोच आरोपी आढळला तर पोलिस प्रशासन ज्याप्रकारे आरोपींना मोक्का लावतात त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांकडे शिफारस करून मोक्का लावण्याबाबत मागणी करण्याची सूचना त्यांनी केली आहे. या घोषणेनंतर सबंधितांचे धाबे दणाणायला पाहिजे होते; मात्र तसे झाले नाही. पोलिसांना इच्छा असली तरी मंत्र्यांच्या घोषणेचे अद्याप कायद्यात रूपांतर झाले नसल्यामुळे घोषणा हवेत विरल्याची चर्चा आहे.

कोट
गोवा बनावटीची दारूविक्री करणाऱ्या एकाच व्यक्तीवर दोनवेळा गुन्हे दाखल झाले तर त्याच्या विरोधात मोक्का लावण्याबाबत मंत्र्यांनी घोषणा केली आहे. त्यासाठी पोलिस केवळ शिफारस करू शकतात; मात्र पोलिसांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. जे कायदे अस्तित्वात आहेत त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल.
- रवींद्र शिंदे, पोलिस निरीक्षक चिपळूण