संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

( टुडे पान १ संक्षिप्त )

चौपदरीकरणातील मोरीचा भराव तिसऱ्यांदा ढासळला

चिपळूण ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेढे-सवतसडा येथील मोरीचा भराव तिसऱ्यां‍दा ढासळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाऊस नसतानाही हा प्रकार घडल्याने महामार्ग कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. महामार्गावर परशुराम घाटाच्या पायथ्याशी पेढे-सवतसडा हा परिसर आहे. चौपदरीकरण कामांतर्गत येथे मोरी उभारण्यात आली आहे. पावसाळ्यात हा भराव दोनवेळा कोसळला होता. पाऊस असल्याने भराव कोसळू शकतो, असे म्हटले जात होते; मात्र भराव कोसळल्याने त्या वेळी दुसऱ्‍या बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. ठेकेदार कंपनीने येथे दुरुस्ती व डागडुजीचे कामही केले होते. पावसाने उघडीप घेऊन किमान पंधरा दिवस झाले आहेत. अशा परिस्थितीतही तेथील मोरीचा भराव पुन्हा ढासळल्याने ईगल कंपनीच्या कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

डीबीजे महाविद्यालयात अनामत रक्कम परत

चिपळूण ः येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, त्या विद्यार्थ्यांची अनामत रक्कम परत मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० यामध्ये एफ.वाय.बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएमएस, आयटी, सीएस, बायोटेक व २०२०-२१ प्रथम वर्ष एमएस्सी, एमकॉम, एमएसाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची अनामत रक्कम परत मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत ही रक्कम घेऊन जावी. याकरिता विद्यार्थ्यांनी ३ ते ३१ नोव्हेंबर २०२२ या कालावधीतच यावे. सोबत प्रवेश पावती व ओळखपत्र आणावे. ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी अनामत रक्कम घेण्याकरिता येऊ नये. तसेच २०२१ मार्चमध्ये १२वी परीक्षा फॉर्म भरलेले खासगी व नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे त्या विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक घेऊन यावे. संबंधित विद्यार्थ्यांनी ही अनामत रक्कम घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधव बापट व रजिस्ट्रार लिना भाटिया यांनी केले आहे.

सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

चिपळूण ः काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दिवसा कडक ऊन तर सकाळ-सायंकाळी कडाक्याची थंडी पडत आहे. त्यातच दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणात वाढ झाल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. सर्दी-खोकला, अंगदुखी, डोकेदुखी या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त सण साजरा होत असल्यामुळे नागरिकांकडून दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे दिसून आले. या आतषबाजीमुळे ध्वनी आणि हवा प्रदुषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे.