रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

sakal_logo
By

( पान ५)

रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

रेल्वे कमी, प्रवासी जास्त ; अनारक्षित डब्यात घुसखोरी

चिपळूण, ता. ४ ः दिवाळीच्या सुट्टीनंतर शहराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी रेल्वेस्थानकावर वाढू लागली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे कमी आणि प्रवासी जास्त आहेत. आरक्षित डब्यांचे आरक्षण मिळत नाही त्यामुळे अनारक्षित डब्यातून फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे फावले आहे. अशा प्रवाशांवर ना रेल्वेत कारवाई होते आणि ना स्टेशनवर. त्यामुळे अनारक्षित डब्यातून फुकट्या प्रवाशांना आवरण्याची डोकेदुखी रेल्वे प्रशासनासमोर उभी राहिली आहे.
कोकण रेल्वेमार्गावरून चिपळूणहून मुंबईकडे जाण्यासाठी केवळ ९ अशा गाड्या आहेत की, ज्यांना चिपळूणमध्ये थांबा आहे. यातील काही रेल्वे रात्री धावतात तर काही दिवसा. या गाड्या गोवा आणि कर्नाटक येथून फुल्ल होऊन येतात. त्यामुळे टू टायर, थ्री टायर आणि स्लीपर कोचचे आरक्षण मिळत नाही. एखादा प्रवासी जबरदस्ती आरक्षित डब्यात गेला तर त्याच्याकडून रेल्वेच्या नियमानुसार दंड आणि तिकिटाचे पैसे घेतले जातात; मात्र अनारक्षित डब्यातून तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नेहमीच ओरड असते. अनेक प्रवासी लोकल ट्रेनने मुंबईहून पनवेलपर्यंत येतात. पनवलेहून चिपळूणकडे येणाऱ्या ट्रेनच्या लोकल डब्यात शिरतात. हे प्रवासी चिपळूण स्थानकावर उतरतात आणि स्टेशनच्या बाहेरचा रस्ता धरतात. टीसीकडून तिकिटाची चौकशी केली जात नाही. त्यामुळे तिकिटाविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे फावते. अशीच अवस्था चिपळूणहून मुंबईकडे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आहे. ९ एक्सप्रेस गाड्या चिपळूण रेल्वेस्थानकावर कायम थांबत असल्या तरी अनेक रेल्वे पाणी भरण्यासाठी चिपळूण रेल्वेस्थानकावर थांबतात. त्यातसुद्धा विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी चढतात. टीसीचा त्रास नको म्हणून जनरल डब्यांमधून ते प्रवास करतात.

कोट
कोकण रेल्वे तोट्यात असल्याची ओरड महामंडळाकडून सुरू आहे. फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने मोहिमा घेण्यात आल्या तर विनातिकीट प्रवासी, अवैध तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जरब बसेल आणि रेल्वेचा तोटा काही अंशी कमी होईल.

आदिल मुकादम, कळंबस्ते


कोट

रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेला झेंडा दाखवण्यासाठी खाकी कपड्यातील कर्मचारी दिसतात. तसेच चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून रेल्वेचे पोलिस कर्मचारी असतात; मात्र विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचा तपास करण्यासाठी नियुक्त कर्मचारी कधीही स्थानकावर दिसत नाहीत. रेल्वेतून प्रवास करणारे टीसीही स्थानकावरील प्रवाशांची चौकशी करत नाहीत. त्यामुळे स्थानकावर तिकीट तपासणी करणारे टीसी असणे आवश्यक आहे.

शंकर सावंत, चिपळूण प्रवासी