देशाला शिवभक्त मावळ्यांची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशाला शिवभक्त मावळ्यांची गरज
देशाला शिवभक्त मावळ्यांची गरज

देशाला शिवभक्त मावळ्यांची गरज

sakal_logo
By

60448
दादर ः ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांच्या ‘युद्धपति श्रीशिव युद्ध पंचअंग कोष’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी सुनील पवार, मंजिरी मराठे, डॉ. नाईक, समीर वारेकर आदी.

देशाला शिवभक्त मावळ्यांची गरज

सुनील पवार ः दादर येथे ‘युद्धपति श्रीशिव’ पुस्तकाचे प्रकाशन

कुडाळ, ता. ५ ः सात दशकांहून अधिक काळ शिवचरित्राचा अभ्यास केलेल्या आप्पांच्या सान्निध्यात येऊन आणि त्यांच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन अनेक कट्टर शिवभक्त मावळे तयार होत असून त्यांची या देशाला सध्या गरज आहे. आप्पांची पुस्तके महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि समितीमार्फत हे कार्य सुरु राहील, असे प्रतिपादन श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केले.
ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचे ३४ वे पुस्तक ''युद्धपति श्रीशिव युद्ध पंचअंग कोष'' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि दुर्गसृष्टी प्रतिष्ठान, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २) दादर येथील मामा काणे हॉटेल सभागृहात इतिहासप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे प्रमुख कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, समाजसेविका डॉ. अलका नाईक, जुन्या मुंबईचे इतिहास अभ्यासक नितीन साळुंखे, शिवभक्त राम धुरी, दुर्गसृष्टी प्रतिष्ठानचे संस्थापक समीर वारेकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी आप्पांची कन्या शिल्पा परब-प्रधान यांनी आप्पांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास थोडक्यात सांगितला. दुर्गसृष्टी प्रतिष्ठानचे वारेकर यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाशी संबंधित दुर्ग, आरमार, शस्त्र, अश्व आणि युद्ध या पंचअंगाचा शब्दकोष असे या पुस्तकाचे स्वरुप आहे. सर्वच इतिहासप्रेमी व अभ्यासकांना उपयोगी पडेल असे हे पुस्तक आहे. केवळ शिवचरित्राचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अत्यंत अल्प दरात ही पुस्तके प्रकाशित केली जातात, असे ते म्हणाले. मंजिरी मराठे यांनी, छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक पश्चात स्वभाषेच्या रक्षणासाठी आणि वृद्धीसाठी राज्यव्यवहारकोष निर्माण केला. त्यांना गुरू मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ उभी करून नवे शब्द मराठी भाषेला दिले आणि आता छत्रपतींनाच गुरू मानणाऱ्या आप्पांनी हा कोष निर्माण केला, असे सांगितले.
पुढील वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला ३५० वा श्री शिवराजाभिषेक सोहळा किल्ले रायगडावर समितीतर्फे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आप्पा परब यांनी लिहिलेल्या ''राज्याभिषेक विधी विवेचन'' या पुस्तकाचे प्रकाशन समितीतर्फे लवकरच करण्यात येईल, अशी माहिती सुनील पवार यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज भोसले यांनी केले. समीर वारेकर यांनी उपस्थित शिवभक्तांचे आभार मानले.