चिपळूण ः लाचखोरीचे व्यवस्था चक्र मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः लाचखोरीचे व्यवस्था चक्र मालिका
चिपळूण ः लाचखोरीचे व्यवस्था चक्र मालिका

चिपळूण ः लाचखोरीचे व्यवस्था चक्र मालिका

sakal_logo
By

लाचखोरीचे व्यवस्थाचक्र भाग- 2.......लोगो

सरकारी कार्यालये लाच घेण्यात आघाडीवर
सर्वत्र पॅटर्न सारखा ; अडवणूक करण्यात माहीर
चिपळूण, ता. ५ः लाचखोरीमध्ये शासकीय कार्यालय सर्वाधिक आघाडीवर आहेत. हे मागील काही वर्षात झालेल्या कारवाईतून समोर आले आहे. नागरिकांची कामे अडवायची, ठेकेदारांचे बिल अडवून ठेवायचे, त्यांचा छळ करून पैसे घेतल्याशिवाय कामे मार्गी लावायची नाहीत, असे प्रकार शासकीय कार्यालयात वाढले आहेत. यात शैक्षणिक विषयाशी संबंधित खातीही मागे नाहीत.
गावपातळीवरील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय असो किंवा तालुका आणि जिल्हापातळीवरील सरकारी कार्यालय असो. सर्वच शासकीय कार्यालयात लाचखोरी चालते असा उघड आरोप होतो. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईतून हे दिसून येते. पारदर्शक, गतिमान कारभारासाठी सरकारने ऑनलाइन कामावर भर दिला जात आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिक्रमणावरील कारवाईत थांबवणे, मिळकतीला नाव लावून घेणे, नोंदणी करणे, पाणीपुरवठ्याचे नवे कनेक्शन, कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराची अडवणूक करणे, कर्मचाऱ्याची इच्छित ठिकाणी बदली यासाठी लाच घेण्याचे प्रकार घडत आहेत. गावातील तलाठी आणि ग्रामसेवक कधीही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे सातबारा, नकाशे, मृत्यू दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि इतर कामांसाठी पैसे द्यावे लागतात. यांचेही वसुली अधिकारी ठरलेले असतात. जन्म-मृत्यूचा दाखला देण्यासाठीसुद्धा पैसे द्यावे लागतात ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. खेर्डी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला यापूर्वी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. पेन्शन सुरू करण्यासाठी,सरकारी कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल पास करण्यासाठीसुद्धा लाच घेतात, असे आरोप करून जनता बोटे मोडत असते. पालिकेच्या बांधकाम विभागातही सर्व कागदपत्रे, नकाशे व्यवस्थित देऊन फाईल सबमिट केली तरी नव्या त्रुटी काढून अडवणूक केली जात आहे. कारवाईत पकडलेला माल सोडवणे, अनधिकृतपणे व्यवसाय करण्यासाठी लाच घेतली जाते. त्या विरोधात तक्रार केली तरच कारवाई केली जाते. एकात्मिक बालविकास सेवा कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. वाळू व्यावसायिकांच्या तक्रारीवरून एका पोलिस कर्मचाऱ्यावरही यापूर्वी कारवाई करण्यात आली होती.
-----------
कोट
सरकारकडून मिळणारे पगार आमच्या हक्काचे आहे; परंतु नागरिकांचे काम करताना लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय कामेच करायची नाहीत, असा पायंडा सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाडला आहे. कामे करताना सामान्य लोकांपेक्षा ठेकेदारांचे हित पाहिले जाते. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. अशाच प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात माझा लढा सुरू आहे.
- इनायत मुकादम, माजी नगरसेवक चिपळूण पालिका

कोट
शासकीय कार्यालयात सर्व कागदपत्रे व्यवस्थित असूनही कामासाठी अडवणूक केली जाते. सहाय्यक निबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई हिमनगाचे टोक आहे. सर्वच शासकीय कार्यालयात नागरिकांची प्रचंड पिळवणूक सुरू आहे याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भान नाही. वरिष्ठांकडे तक्रारी केल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते, हा अनुभव आहे.
- सुभाष जाधव, नागरिक सावर्डे

कोट
लोकसेवकास नेमून दिलेले काम त्याने वेळेत व सचोटीने केले पाहिजे. विभागप्रमुखांनी कामाचा नियमित आढावा घ्यावा व कोणतीही फाईल प्रलंबित राहणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. बिले वेळेत निकाली काढले पाहिजेत, त्यावर योग्य मुदतीत योग्य तो निर्णय झाला पाहिजे अन्यथा कारवाई केली जाईल. याबाबतच्या सूचना आम्ही संबंधितांना दिल्या आहेत. यातून कोणी काम करत नसेल किंवा लाचेची मागणी करत असेल तर प्रथम आमच्याशी संपर्क करावा.
- प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी चिपळूण पालिका