दोडामार्ग मार्गावर ‘अपघातवार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्ग मार्गावर ‘अपघातवार’
दोडामार्ग मार्गावर ‘अपघातवार’

दोडामार्ग मार्गावर ‘अपघातवार’

sakal_logo
By

60462
साटेली भेडशी ः अपघातानंतर इतस्तः पसरलेले नारळ.
60502
घाटीवडे-बांबर्डे ः अपघातग्रस्त मोटार.
60503
घाटीवडे-बांबर्डे ः मोडून पडलेला विद्युत खांब.


दोडामार्ग मार्गावर ‘अपघातवार’

दिवसांत तीन घटना; जीवितहानी नाही, वाहनांचे मात्र मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. ५ : दोडामार्ग-बेळगाव मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा शनिवार अपघातवार ठरला. या मार्गावर पहाटेपासून सकाळपर्यंत तीन अपघात झाले. दिवसभर अपघातांची मालिका सुरूच होती. मध्यरात्री तिलारी घाटात नारळ घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपचा, त्यानंतर वायंगणतड येथे ब्रॉयलर कोंबड्या घेऊन गोव्याकडे जाणाऱ्या पिकअपचा, तर सकाळी आठच्या दरम्यान घाटिवडे-बांबर्डे येथे गोव्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी मोटारीचा अपघात झाला. सुदैवाने या तिन्ही अपघातांत जीवितहानी टळली; मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.
तिलारी घाटात बोलेरो पिकअपचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटून मध्यरात्रीनंतर अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने वाहन (केए १६ एए १००४) घाटातील कठड्याला जाऊन आदळले आणि जाग्यावरच पलटले. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला; मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त बोलेरो पिकअप नारळ घेऊन बेळगावहून म्हापसा-गोवाकडे निघाली होती. तिलारी घाटात सुमारे तीन-साडेतीनच्या दरम्यान चालक पोचला. चालक नवीन असल्याने गुगल मॅप वापरून त्याचा प्रवास सुरू होता; पण घाटरस्त्याच्या तीव्र उतार व वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. हेवाळे येथील दत्ताराम देसाई यांनी आज सकाळी जेसीबीच्या साह्याने वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
घाटिवडे-बांबर्डे येथे मोटार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला. यात मोटार रस्त्यालगतच्या विजेच्या खांबाला आदळून गटारात जाऊन थांबली. धडक इतकी जोरदार होती की, सिमेंटचा खांब तुटून पडला. यात सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मोटारीतील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या; मात्र मोटारीचे मोठे नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थ हनुमंत गवस यांनी मदतकार्य केले. दत्ताराम देसाई व स्थानिकांनी ती मोटार बाहेर काढली. खांब तुटल्याने खंडित झालेला दोन दिवसांत पूर्ववत होण्याची शक्यता आहे. वायंगणतड येथे आणखी एक अपघात घडला. यात कोंबड्या घेऊन जाणारी गाडी उलटून नुकसान झाले.
..................
बोंडेचोरांचे फावले
कोकणच्या बहुतांश परिसरात नारळ चोरणाऱ्यांना ‘बोंडेचोर’ म्हणतात. अपघातानंतर रस्त्यात पडलेले आयते नारळ चोरले नसते तर ते बोंडेचोर कसले? गाडीत अडीच हजार नारळ होते. सकाळी त्यातील सतराशे-अठराशे एवढेच नारळ शिल्लक होते. बाकीचे चोरीस गेले होते.