खेड-माजी नगराध्यक्ष खेडेकरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-माजी नगराध्यक्ष खेडेकरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा
खेड-माजी नगराध्यक्ष खेडेकरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा

खेड-माजी नगराध्यक्ष खेडेकरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा

sakal_logo
By

खेडेकरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा
खेडमध्ये विशेष निधी गैरवापर; अटकपूर्व जामीन मंजूर
खेड, ता. ५ ः मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात विशेष घटक निधीच्या गैरवापरास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांनी खेड अतिरिक्त सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे, अशी माहिती त्यांच्यावतीने विधीज्ञ अश्विन भोसले यांनी दिली.
समाजकल्याण विभाग रत्नागिरी सहाय्यक आयुक्त यादव इरबा गायकवाड यांनी २३ फेब्रुवारी २०१५ ला वैभव सदानंद खेडेकर यांनी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन, रत्नागिरी यांना खेड तालुक्यातील भरणे बाईतवाडी ते बौद्धवाडी रोटरी शाळेकडील रस्त्यावर नदीपलीकडे जाण्याचा विशेष घटक योजनेअंतर्गत साकव मंजूर करावा, नदीपलीकडे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. पावसामध्ये विद्यार्थी तसेच नागरिकांना येण्यासाठी पर्यायी मार्गाची उपलब्धता नाही तरी विशेष घटकसंदर्भात साकव मंजूर करावा, असे विनंतीपत्र दिले होते. भरणे-बाईतवाडी ते बौद्धवाडी येथे विशेष घटक योजनेंतर्गत साकव बांधणीसंदर्भात त्यांच्याकडे प्राप्त तक्रारीबाबत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी यांनी तपासणीसाठी ३१ सदस्यीय समिती गठित केली होती. त्या समितीने २० ऑक्टोबर २०२१ ला भरणे येथील साकवाची पाहणी करून सदर साकवाचा उपयोग भडगांव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामधील सहा अनुसूचित वस्त्यांना तसेच भरणे ग्रामपंचायत क्षेत्रातील एका अनुसूचित वस्तीला होत नसून भरणे ग्रामपंचायतीने खोटा प्रस्ताव सादर करून सार्वजनिक बांधकाम विभागाची दिशाभूल केली असल्याचे निदर्शनास आल्याचे कळवले होते.
भडगांव-भरणे बाईतवाडी येथील साकव बांधणीमध्ये वैभव खेडेकर यांनी स्वतःच्या इमारतीकडे जाण्यासाठी जागेचा व पदाचा स्वतःच्या फायद्याकरिता अधिकाराचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करून शासकीय मान्यतेसाठी अटी व शर्थीचा भंग केला व साकव बांधकामाबाबत विशेष घटक योजनेच्या २० लाख रुपये निधीचा दुरुपयोग केला, अशी तक्रार सहाय्यक आयुक्त इरबा गायकवाड यांनी दिल्यावर खेड पोलिस ठाण्यात २२ ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला होता; मात्र आरपीआय आठवले गटाने २७ ऑक्टोबरला अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी अखेर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ (सुधारित २०१५) चे कलम ३ (१) (जी) अन्वये गुन्हा दाखल केला.

चौकट
अतिरिक्त सत्र न्यायालयात
या प्रकरणी वैभव खेडेकर यांनी खेड अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर शनिवारी (ता. ५) सुनावणी झाली. विधीज्ञ अश्विन भोसले यांनी सांगितले, खेडेकर यांच्या विरोधात राजकीय व फौजदारी गुन्हे दाखल असल्याने जामिन अर्ज फेटाळण्याची मागणी पोलिसांनी केली होती; परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.