फळांच्या राजाला फळमाशीपासून वाचवण्याची लढाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फळांच्या राजाला फळमाशीपासून वाचवण्याची लढाई
फळांच्या राजाला फळमाशीपासून वाचवण्याची लढाई

फळांच्या राजाला फळमाशीपासून वाचवण्याची लढाई

sakal_logo
By

सकाळ विशेष ................लोगो

फोटो ओळी
rat६p१.jpg
६०६३७
राजापूरः फळमाशीने प्रादुर्भावित फळ.
-rat६p२.jpg ः
६०६४८
फळमाशीची मादी.
-rat६p३.jpg ः
६०६५६
फळमाशीची अळी.
-rat६p४.jpg ः
६०६५७
फळमाशीच्या प्रादुर्भावाने खराब झालेले आंबे.
-rat६p५.jpg ः
६०६५८
राजापूर ः सुनील गोंडाळ यांने बनवलेला फळमाशी सापळा.
-rat६p६.jpg ः
KOP२२L६०६५९
सापळ्यात अडकलेली फळमाशी.
--------------

इंट्रो

कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असलेला अन् कोकणचा राजा म्हणून ओळखला जात असलेला हापूस आंबा दरवर्षी विविध समस्यांनी ग्रासला जात आहे. कधी अवकाळी पाऊस, बदलते प्रतिकूल वातावरण तर कधी किडीचा प्रादुर्भाव आदींमुळे त्रस्त बागायदारांना गतवर्षी फळमाशीच्या प्रादुभार्वामुळे झालेल्या नुकसानीला सामोरे जावे लागते होते. त्यातून बागायतदारांना काहीसा आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागला. गतवर्षी आंबा हंगामाप्रमाणे यावर्षी पावसाळ्यामध्ये काकडी, पडवळ, दोडका वा अन्य फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसला. त्यामुळे गतवर्षी आंबा हंगाम सरला तरी फळमाशी अद्याप पुरती गेलेली नसून त्याची उत्पत्तीही कमी झालेली दिसत नाही. त्यामुळे फळमाशीच्या उत्पत्तीला यावर्षीही पोषक वातावरण राहिल्यास गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पुन्हा आगामी हंगामामध्ये आंबा पिकाला फळमाशी हैराण करण्याच्या शक्यतेने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकरी स्वतःचा अनुभव वापरून काही क्लुप्त्या लढवत आहेत तर काही सापळा बनवण्याचे प्रयोग करत आहेत.

- राजेंद्र बाईत, राजापूर
-----------

हापूसला फळमाशीपासून वाचवण्याची लढाई
बागायतदारांचे प्रयोग सुरू ; काकडी, पडवळ, दोडक्यावरही आढळ


फळमाशी किंचित पिवळसर तांबूस रंगाची असून सर्वसाधारण ७ मि.मी. लांब असते. माशीचा शेवटचा भाग टोकदार असतो. मादी फळे तयार होण्याच्या वेळेस फळांच्या सालीच्या आतमध्ये एकावेळेस १५०-२०० अंडी घालते. अंडी १-३ दिवसांत उबतात. अंड्यातून बाहेर येणार्‍या अळ्या पांढरट रंगाच्या पायविरहित असतात. अळी अवस्था ६ ते २९ दिवसांची असते. ती पूर्ण झाल्यावर अळी जमिनीवर पडते व मातीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था उन्हाळ्यात ६ दिवसांची व तापमान कमी असल्यास ४४ दिवसांपर्यंत वाढते. ही कीड आंब्याव्यतिरिक्त पेरू, चिकू, द्राक्ष, अंजीर, पिअर, सफरचंद तसेच काहीवेळा पिकलेल्या केळीमध्येदेखील आढळून येते. त्याचबरोबर कारली, दोडकी, कलिंगड, काकडी आदी भोपळावर्गीय पिकावरदेखील आढळून येते.
----------
फळमाशी कीड कशी ओळखावी

फळमाशीचा प्रार्दुभाव होण्यापूर्वी फळावर तिच्या अळ्या आहेत की नाही हे ओळखणे महत्वाचे ठरते. त्यामुळे फळातील अळ्या फळमाशीच्या आहेत का अन्य कोणत्या किडीच्या आहेत ओळखण्याची साधी पद्धत आहे.
* फळमाशी किडीच्या अळ्या पायविरहित असतात.
* अळी पांढरट, पिवळसर रंगाची आणि मागील बाजूने निमूळती झालेली असते.
* अळीला स्पर्श केल्यास अळीचा डोक्याकडील आणि पाठीमागील भाग एकत्र आणून लांब उडी मारते.
---------

अशी करते फळमाशी नुकसान

फळमाशीची अळी फळांतील गरांवर उपजीविका करते. फळांमध्ये अंडी घालण्यासाठी मादी फळमाशी ज्या ठिकाणी छिद्रे पाडते अशा छिद्रातून त्या फळामध्ये बुरशीचा शिरकाव होतो. कालांतराने छिद्राच्या ठिकाणचा भाग तांबूस रंगाचा होतो नंतर फळ पूर्णपणे नासते व गळून पडते. फळमाशी फळे पक्व होण्याच्या अवस्थेत अथवा पक्व झालेल्या फळांवर मोठ्या प्रमाणावर येते. तिचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येतो. मात्र, मे ते जुलै या कालावधीत या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
-----------

असे करता येईल नियंत्रण

१) फळ पक्व होण्याच्या अवस्थेत अथवा पक्व झालेल्या फळांवर मोठ्या प्रमाणात फळमाशी येते. त्यामुळे फळे परिपक्व होण्यापूर्वी किंचित अगोदर काढल्यास प्रादुर्भाव टाळता येतो. कोकणामध्ये हापूस आंबे १२ ते १४ आणे तयार अवस्थेत काढतात. अशा आंब्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव अजिबात आढळत नाही;
२) झाडाखाली पडलेली फळे आणि प्रादुर्भित फळे नष्ट करावीत.
३) झाडाखालील जमीन हिवाळ्यात नांगरावी अथवा खोदावी (१० सेमी) त्यामुळे सुप्तावस्थेतील कोष नष्ट होतील.
४) फळमाशीच्या नरास आकर्षित करणारा मिथिल इजॅनोलचा सापळा बागेत लावावा. त्यामध्ये नर किटकनाशकाच्या द्रावणात पडून मरतात. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने बागायतदार वा शेतकर्‍यांना सुलभ वापरता येण्याजोगा रक्षक सापळा विकसित केलेला आहे.
५) बटर पेपर कागदापासून बनवलेल्या ६ बाय ८ आकाराच्या पिशव्या फळे अंड्याच्या आकाराची असताना फळांवर घातल्यास फळमाशीचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रित करता येतो.
----------------
कोट
गतवर्षी आंबा हंगामाच्या शेवटी फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवला होता. आतून फळ खराब होऊन त्याचा फळविक्रीवर प्रतिकूल परिणाम जाणवला होता तर, झाडावरील फळगळतीचे प्रमाणही वाढले होते. यावर्षी फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- विशाल सरफरे, आंबा बागायतदार
--------------
कोट
आंबा निर्यातीच्यादृष्टीने फळमाशी ही एक फार महत्वाची कीड आहे. मागील वर्षी आंबा पिकावर फळमाशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंबापिकाचे नुकसान झाले होते. हंगामामध्ये अचानक येणारी पावसाची सर ही या किडीच्या प्रादुर्भावास महत्वाचा घटक ठरते. त्यामुळे शेतकर्‍यांनी अशा हवामानाच्या बदलास सतर्क राहणे आवश्यक आहे. यावर्षी कृषी विज्ञान केंद्र रत्नागिरी या कार्यालयामार्फत फळमाशी नियंत्रणाबाबत शेतकर्‍यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके शेतकर्‍यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणार आहेत.
- डॉ. सुदेश चव्हाण, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र लांजा

फळमाशीचा का वाढला प्रादुर्भाव?

फळमाशीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दरवर्षी असतो; मात्र, गतवर्षी पडलेला अवकाळी पाऊस, तौक्तेसारखे चक्रीवादळ, त्यातून हवामानात झालेले बदल, हंगामाच्या सुरवातीला दमटपणासह मे महिन्यात वाढलेले तापमान आदींमुळे फळमाशीचा गतवर्षी प्रादुर्भाव जास्त वाढल्याचा अंदाज बागायतदारांकडून वर्तवण्यात येत आहे. मे महिन्यात अचानक वाढलेल्या तापमान आणि वादळामध्ये फळगळतीचे प्रमाण वाढले. त्यामध्ये जमिनीवर पडलेली आंबाफळे उचलली गेली नसल्यास झाडाखाली फळे कुजून तयार झालेले सुप्तावस्थेतील फळमाशीचे कोष यंदा त्रासदायक ठरून एकाचवेळी वाढलेली उत्पत्ती उपद्रव करत आहे.


....................
शेतकऱ्यांचा प्रयोग

यु ट्युबवरील व्हिडिओ पाहून शीळ येथील तरुण शेतकरी सुनील काशिनाथ गोंडाळ यांनी लूर गोळीचा वापर करत प्लास्टिक बाटल्यांच्या आधारे सापळा बनवला आहे. प्लास्टिकच्या बाटलीत छोटे छोटे होल मारून त्या बाटलीवर रंगीत पिवळा कलर मारण्यात आला आहे. अशा रंगीत बाटलीमध्ये अर्ध्यावर पाणी भरले. त्यावर लूरची गोळी टांगली. लूरच्या वासाने आणि रंगीत पाण्याकडे फळमाशा आकर्षित होतात आणि बाटलीत शिरतात. बाटलीमध्ये असलेल्या लूर गोळीच्या वासाने त्यांना गुंगी येते आणि आपसूक त्या खालच्या पाण्यात पडतात. हा प्रयोग त्यांनी यावर्षीच्या पावसाळी हंगामात केला असून आंबा हंगामामध्ये करण्याचा त्यांचा मानस आहे.

.............
विजय मोहिते यांनी बनवलेला फळमाशी सापळा

साध्या पाण्याच्या बाटलीत खालच्या भागात पाणी भरले. त्यामध्ये हळुहळू बाष्पीकरण होणारे केमिकल दोन थेंब टाकले. त्यानंतर बुचाच्या खालच्या बाजूला तीन छोटी भोके पाडायची. सोबत बुचालाही बारीक भोक पाडून त्याला छत्रीमध्ये तारेला अडकवायचा, आकडा लावायचा. त्या ठिकाणी कीटकनाशक औषध व तुळशीमध्ये घटकद्रव्य असलेल्या मिथिल युजेनॉलच्या ब्लॉकचा वापर करायचा. यामध्ये ‘मिथिल युजेनॉल’च्या वासाने मादी माश्या आकर्षित होतात व आतमध्ये उडत असताना बाजूच्या भिंतींवर पंख आपटून पाण्यात पडून किंवा पाण्यात टाकलेल्या औषधाने मरतात. त्या द्वारे प्रजोत्पादनाची प्रक्रिया मंदावण्यास मदत होते.
..................

कोट
फळमाशीचा प्रादुर्भाव नेहमीच कमी-जास्त प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षामध्ये हवामानामध्ये झालेल्या बदलासह कीडप्रतिबंध उपाययोजना करण्याकडे शेतकर्‍यांचे झालेले दुर्लक्षही त्याला काहीअंशी कारणीभूत आहे. कणी स्थितीमध्ये आणि पक्व होऊन पिवळा झाल्यानंतर आंबा फळावर फळमाशीचा अधिक प्रादुर्भाव होऊन नुकसान होते. फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिसलेरीच्या बाटलीचा खुबीने वापर करून आपल्या बागेमध्ये यापूर्वी केलेला प्रयोग काही अंशी यशस्वी ठरला होता.
- विजय मोहिते, आंबा बागायतदार
...........
कोट
गोठणेदोनिवडे, पडवे, नाणार, कुंभवडे, विल्ये, जैतापूर, मिठगवाणे आदी गावांमध्ये आर्थिक धोकापातळीच्या खाली फळमाशीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पन्नात साधारणतः २ टक्के घट झाली होती. चालू हंगामात २३-२४ मध्ये कृषी विभागातर्फे फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे तसेच कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘हॉर्टसॅप’ (फलोत्पादन पिकावरील कीड व रोग सर्व्हेक्षण प्रकल्प) या योजनेंतर्गत फळमाशी प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्षक सापळे वितरित करण्यात येणार आहेत.”

- विद्या पाटील, कृषी अधिकारी राजापूर