केशरनाथ मंदिर तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी उत्तम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशरनाथ मंदिर तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी उत्तम
केशरनाथ मंदिर तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी उत्तम

केशरनाथ मंदिर तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी उत्तम

sakal_logo
By

rat6p7.jpg
60660
शेडवईः श्री देव केशरनाथ मंदिर आणि निसर्गरम्य परिसर.
-rat6p8.jpg ः
60661
मंदिरातील अतिशय पुरातन विष्णूमूर्ती.
------------
केशरनाथ मंदिर तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी उत्तम
श्रद्धा, भक्तीचे स्थान; शेडवईचा पर्यटन आराखड्यात समावेश हवा
मंडणगड, ता. ६ ः निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मंडणगड तालुक्यातील शेडवई या गावी श्री देव केशरनाथांची शिल्पकलेचा अजोड नमुना असलेली अतिशय पुरातन विष्णूमूर्ती, एका ओढ्याच्या किनारी अतिशय निसर्गरम्य वातावरणात स्थानापन्न झाली आहे. कोकण भूमीला अपरांताची ओळख निर्माण करून देण्यास ही मूर्ती नक्कीच कारणीभूत ठरली आहे. या मूर्तीसारखी दुसरी मूर्ती जिल्ह्यात नाही.
श्री देव केशरनाथांच्या मूर्तीतील अजोड शिल्पकला पाहण्यासाठी पर्यटक आता वाट धरू लागले आहेत. त्यामुळे परिसर विकसित करणे गरजेचे आहे. दहागाव येथून उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने गाडीने ७ किलोमीटपर्यंत अंतर कापले की, शेडवई गावाच्या थोडे अलीकडे एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्यावरून किंचित उताराने पुढे गेलो की, आपण एका ओढ्यावर येतो. या ओढ्यावर एक छोटा पूल आहे. तिथेच डाव्या हाताला श्री केशरनाथ मंदिर दिसते. कोकणी पद्धतीचे कौलारू असे हे साधेपण अतिशय देखणे देऊळ आहे. मंदिरात आत गेल्यावर आपल्याला नेत्रसुखद अशी अप्रतिम विष्णूमूर्ती दिसते. हिरवटसर छटा असलेली ही मूर्ती सुमारे चार फूट उंचीची आहे. अत्यंत शिल्पसमृद्ध अशा या मूर्तीच्या हातात पद्म-शंख-चक्र-गदा अशी आयुधे असल्यामुळे मूर्तीशास्त्रानुसार ती केशवाची मूर्ती होते. मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीदेवी अर्थात लक्ष्मी आहे तर उजवीकडे गरूड शिल्पित केलेला दिसतो. मूर्तीच्या मस्तकाशेजारी मेहेकरच्या मूर्तीप्रमाणेच उजवीकडे ब्रह्मा तर डावीकडे शिवप्रतिमा दिसते. पाठीमागील प्रभावळीमध्ये दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या अंगावर भरभरून कोरलेले दिसतात. शेडवई येथील मंदिराचा परिसर अत्यंत रम्य आहे. भरपूर झाडी, बाजूलाच असलेला बारमाही वाहणारा ओढा, नीरव शांतता आणि इथे आढळणारे विविध जातींचे पक्षी यांनी हा परिसर रमणीय झालेला आहे.

चौकट
शिल्पकलेचा अजोड नुमना
मंडणगड तालुक्याच्या सार्वत्रिक पर्यटन विकासांची चर्चा करताना महत्वाच्या स्थानात अतिशय पुरातन व शिल्पकलेचा अजोड नुमना असलेली केशरनाथांची मूर्ती महत्वाची आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तालुक्याच्या पर्यटन विकास आरखड्याची चर्चा होते तेव्हा तेव्हा या मंदिराचा समावेश त्या आरखड्यात करणे क्रमप्राप्त आहे. ग्रामस्थ, त्यांच्या माध्यमातून करत असलेल्या प्रयत्नांना सरकारस्तरावरून मंदिर परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी बळ देण्याची आवश्यकता आहे.