एचबीटी क्लिनिकसाठी जागेची अडचण कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एचबीटी क्लिनिकसाठी जागेची अडचण कायम
एचबीटी क्लिनिकसाठी जागेची अडचण कायम

एचबीटी क्लिनिकसाठी जागेची अडचण कायम

sakal_logo
By

60746

एचबीटी क्लिनिकसाठी जागेची अडचण कायम


२४ तास सुविधेसाठी अडथळा; पालिकेची शोधमोहीम सुरू

मुंबई, ता. ६ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एचबीटी) क्लिनिक २ ऑक्टोबर रोजी सुरू झाल्यापासून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागेची अडचण कायम आहे. संपूर्ण शहरात आणखी एचबीटी क्लिनिक उभारण्यासाठी जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. जागेची अडचण दूर व्हावी यासाठी पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पालिका आता एचबीटी क्लिनिकसाठी झोपडपट्ट्यांजवळ अपार्टमेंट किंवा जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार करत आहे.
पालिकेने काही दिवसांपूर्वी जागेसंबंधित एक पत्रक जारी केले. त्यात क्लिनिकसाठी जागा देण्यास इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पालिकेने जाहिरातीत एचबीटी क्लिनिकसाठी २०० ते २००० चौरस फूट जागेची मागणी केली आहे. संबंधित अर्ज देण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पोर्टा केबिनसाठी जवळपास दीड हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागा आवश्यक आहे. जागेची अडचण असून अद्याप कोणताही प्रतिसाद आला नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अर्थसंकल्पातही तरतूद
महापालिकेने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात मुंबईकरांना त्यांच्या घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २२७ एचबीटी दवाखाने सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, सध्याच्या पालिका दवाखान्यांमध्ये २८ एचबीटी दवाखाने, १३ पॉलिक्लिनिक आणि नऊ पोर्टा केबिन किंवा कंटेनर क्लिनिक सुरू केले आहेत. असे एकूण ५१ क्लिनिक सुरू झाले असून त्याची संख्या आणखी वाढवण्यास पालिकेला जागा मिळत नसल्याने अडथळे येत आहेत.

झोपडपट्ट्यांसाठी लहान दवाखाने
पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की एचबीटी क्लिनिक विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये सुरू करण्यासाठी डिझाईन केले होते. मात्र झोपडपट्ट्यांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नाही. पालिकेच्या म्हणण्यानुसार, एचबीटी क्लिनिक उभारण्यासाठी सहाशे ते एक हजार चौरस फूट क्षेत्रफळ आणि पॉलीक्लिनिकसाठी सुमारे दीड ते दोन हजार चौरस फूट क्षेत्र आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, आम्ही विशेषत: धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये लहान दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०० एचबीटी क्लिनिकचे उद्दिष्‍ट
अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले, की नोव्हेंबर अखेरीस २०० एचबीटी क्लिनिक सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे; पण आमच्याकडे जागेची कमतरता आहे. आमची टीम एका मोठ्या जागेच्या शोधात आहे, जिथे २४ तास उपचार उपलब्ध करून देणाऱ्या पोर्टा केबिन उभारले जातील. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ३० हजारांहून अधिक रुग्णांना उपचार देण्यात आले आहेत.
--
कोट
आम्ही एचबीटी पॉलिक्लिनिक सुरू करण्यासाठी जागेच्या शोधात आहोत. ३ नोव्हेंबर रोजी एका जाहिरातीद्वारे क्लिनिकसाठी जागा भाड्याने देण्यास तयार असलेल्यांकडून अर्ज मागवले होते. आमच्या परिसरात एक एचबीटी क्लिनिक सुरू झाले आहे. भाडेतत्त्वावर अपार्टमेंट घेण्यासाठी सार्वजनिक नोटीस जारी केली आहे.
- महेंद्र उबाळे, सहायक आयुक्त, एम पूर्व