विठुरायाने जाणून घेतली नगराची ख्यालीखुशाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठुरायाने जाणून घेतली नगराची ख्यालीखुशाली
विठुरायाने जाणून घेतली नगराची ख्यालीखुशाली

विठुरायाने जाणून घेतली नगराची ख्यालीखुशाली

sakal_logo
By

rat६p४५.jpg
६०७३८
रत्नागिरी : विठुरायाच्या पालखी नगरप्रदक्षिणा रविवारी झाली. त्या वेळी मांडवीतून पुढे समुद्रकिनाऱ्यावरून जाताना समुद्राचे पाणी विठुरायाला स्नान म्हणून शिंपडले जाते.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)

विठुरायाने जाणून घेतली नगराची ख्यालीखुशाली
नगर प्रदक्षिणा ; समुद्रस्नान, आरती, श्रीफळ भेट, तेरा किलोमीटरचा पायी
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : मांडवी समुद्रकिनाऱ्यावर समुद्रस्नान, मुखमार्जन, अत्तर लावून विठुरायाचा जल्लोष करत आणि प्रत्येक ठिकाणी काही क्षण थांबत आरती, श्रीफळ भेट स्वीकारत विठुरायाने आज नगरप्रदक्षिणा करत रत्नागिरीकरांची ख्यालीखुशाली जाणून घेतली. ग्रामदैवत भैरीबुवा ज्याप्रमाणे शहरात फिरतो, त्याप्रमाणेच पांडुरंगही नगरवासियांची काळजी घेतो. यामुळेच या नगरप्रदक्षिणेत शेकडो भाविकांनी हजेरी लावली. सुमारे ११ तासांमध्ये १३ किलोमीटरचा हा पायी प्रवास बहुतांश भक्तांनी टळटळीत उन्हात अनवाणी केला. यावेळी वाटेत ठरलेल्या मंदिरांना भेटी देत तिथे आरती म्हणत व हातभेटीचा नारळ देण्याची प्रथा आजही जपली जात आहे.
वैकुंठ चतुर्दशीनिमित्त शेकडो वर्षे ही नगर प्रदक्षिणा सुरू आहे. कार्तिकी एकादशीच्या उत्सवात रविवारी दुपारी एक वाजता नगर प्रदक्षिणेला सुरवात झाली. ताशांच्या गजरात आणि भर दुपारी निघालेल्या या प्रदक्षिणेत बहुसंख्य भाविक अनवाणीच सहभागी झाले होते. झांज, टाळांचा सुमधूर नाद आणि विठ्ठलाचा जयजयकार करत प्रदक्षिणा विविध ठिकाणी, ठरलेल्या जागांवर वेळेवर पोहोचत होती. गोखले नाका, राधाकृष्ण नाकामार्गे धनजी नाका, गवळीवाडा जेल रोडमार्गे गोगटे कॉलेज, काशिविश्वेश्वराच्या घाटीने विश्वेश्वर देवळात पोहोचली. तिथून राजीवडा रस्त्याने तेलीआळी तळ्याजवळून खडपे वठार, चवंडे वठार रस्त्याने मांडवी नाक्यात गेली. मांडवीतील भैरव देवळासमोरून पुढे आईस फॅक्टरीजवळील रस्त्याने समुद्रावर पोहोचली. येथे विठोबावर समुद्रातील पाणी शिंपडण्यात आले. या वेळी भाविकांनी विठुरायाचा जयजयकार केला. तापलेल्या वाळूतूनच किनारपट्टीच्या मार्गाने पुढे जात पेठकिल्ला येथे पालखी पोहोचली.
तेथून श्री सांब मंदिरात पालखी नेण्यात आली. मंदिराला एक भोवती घातली. येथे काही क्षणांची विश्रांती घेतली. त्यानंतर पालखी पेठकिल्ला येथील ज्योतिबा मंदिर रस्त्याने नजीकच्या श्रीराम मंदिरात पोहोचली. येथेही आरती झाल्यावर हातभेटीचे नारळ दिले.

चौकट
रात्री झाली सांगता
मुरुगवाडा, मिऱ्या बंदराच्या चौकातून पांढऱ्या समुद्राजवळच्या रस्त्याने पंधरामाड व परत मुख्य मार्गावर येऊन परटवणे नाका, भार्गवराम मंदिर येथून पुढे डोंगर उतारावरच्या पायवाटेने सावंतनगर, खालच्या फगरवठारात पालखी नेण्यात आली. वरचा फगरवठार, डीएसपी बंगला, चावडीवरून धनजी नाक्यात येते. नंतर राधाकृष्ण नाकामार्गे विठ्ठल मंदिरात परतली. मंदिराला भोवती घालून देवाने मंदिरात विसावा घेतला. समस्त रत्नागिरीकरांची सामाजिक जडणघडण आणि एकी जपणारी ही नगरप्रदक्षिणा साजरी झाली.