रायगडमध्ये यात्रांचा हंगाम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडमध्ये यात्रांचा हंगाम सुरू
रायगडमध्ये यात्रांचा हंगाम सुरू

रायगडमध्ये यात्रांचा हंगाम सुरू

sakal_logo
By

रायगडमध्ये यात्रांचा हंगाम सुरू

स्‍थानिकांना रोजगाराचे साधन; अर्थकारणाला गती

अलिबाग, ता. ६ ः दोन वर्षे यात्रा, उत्सवांना निर्बंध लावले होते. त्याचा परिणाम स्थानिक व्यावसायिकांवर प्रचंड झाला; मात्र आता सर्व निर्बंध हटवल्याने पुन्हा नव्याने यात्रा-उत्सवांना सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून यात्रांचा नवा हंगाम सुरू झाला असून स्थानिकांना रोजगाराचे साधन मिळाले आहे.
भातकापणीची कामे संपल्यावर कार्तिकी एकादशीपासून जिल्ह्यात यात्रांना सुरुवात होते. जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साजगावच्या यात्रेनंतर आवास येथील नागेश्वरची यात्रा, मापगावची कनकेश्वरची यात्रा, वरसोलीची यात्रा तसेच डिसेंबर महिन्यांमध्ये चौलची यात्रा सुरू होते. या यात्रांमध्ये रस्त्या- रस्त्यावर गल्लोगल्ली वेगवेगळ्या प्रकारची दुकाने लावली जातात. त्यात वेगवेगळ्या मिठाईच्या दुकानांसह खेळणी, चादर, स्वेटर, तसेच घरगुती सजावटीसाठी लागणारे वेगवेगळे साहित्य, फोटो-फ्रेमची दुकाने असतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे अनेकांना घरातून बाहेर पडता आले नाही. तसेच सण उत्सवांवरील निर्बंधांमुळे यात्रांवर बंदी होती; परंतु आता निर्बंध शिथिल झाल्याने पुन्हा आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. या यात्रांमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीमुळे कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील यात्रा येत्या २० नोव्हेंबरला; तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ७ डिसेंबरला दत्तजयंतीनिमित्त चौल-भोवाळेची यात्रा भरणार आहे. एकापाठोपाठ होणाऱ्या या यात्रांमुळे जिल्ह्यातील अर्थकारणालाही गती मिळणार आहेत. तसेच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सर्व काही सुरू झाल्याने अनेकांना या यात्रांमुळे रोजगाराचे नवे साधन मिळाले आहे.

चौल - भोवाळेची यात्रेचे आकर्षण
अलिबाग तालुक्यातील चौल परिसरातील भोवाळे या ठिकाणी उंच टेकडीवर दत्त मंदिर आहे. सुमारे हजार पायऱ्या चढून या मंदिरातील दत्तांचे दर्शन घेतले जाते. साधारणतः डिसेंबर महिन्यात ही यात्रा सुरू होते. याच महिन्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने यात्राच्या निमित्ताने पर्यटन वाढीला चालना मिळते. यात्रा सुरु होण्याच्या काही दिवस अगोदर १४ गावांतील सप्ताह होतो. त्यात भजनांचा कार्यक्रम होतो.