सिंधुदुर्गात आता बायपास शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात आता बायपास शस्त्रक्रिया
सिंधुदुर्गात आता बायपास शस्त्रक्रिया

सिंधुदुर्गात आता बायपास शस्त्रक्रिया

sakal_logo
By

60756
पडवे ः बायपास शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करताना संस्था अध्यक्षा नीलम राणे. सोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे.

जिल्ह्यातच आता बायपास शस्त्रक्रिया

पडवेतील रुग्णालयात सुविधा; मुंबई, गोवा, कोल्हापूरला जाण्याची गरज नाही

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया अमित शंकर परब (वय ४०) या रुग्णावर पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाली आहे. हा क्षण जिल्ह्याच्या आणि लाईफटाईम हॉस्पिटलच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे, अशी माहिती यशस्वी शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलचे संस्थापक तथा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यामुळे जिल्ह्यात आरोग्य विषयक परिपूर्ण सेवा देण्याचे स्वप्न पूर्णत्वास गेल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. यामुळे बायपास शस्त्रक्रियेसाठी नागरिकांना मुंबई, गोवा, कोल्हापूरसारख्या जिल्ह्याबाहेरील शहरात जाण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.
या वेळी लाईफटाईम हॉस्पिटल संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. पडवे येथील हॉस्पिटलच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. या वेळी बायपास शस्त्रक्रियातज्ज्ञ सर्जन डॉ. अमृत नेरर्लोकर, डॉ. विनायक माळी उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात परिपूर्ण आरोग्यसेवा व्हावी, या दृष्टीने आपले नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. त्यानुसार पडवे येथे लाईफ टाईम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा परिपूर्ण झाल्याचे वाटते. मुंबई, कोल्हापूर, पुणे, गोवा आदी शहरात बायपास शस्त्रक्रियेच्या जिल्ह्यातील रुग्णांना हलविले जात होते. मात्र, आमच्या या रुग्णालयात ही बायपास शस्त्रक्रिया सुविधा सुरू झाली आहे. याबाबत शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन.’’ राणे म्हणाले, ‘‘आपले हॉस्पिटल हा धंदा नाही. या जिल्ह्यात दर्जेदार रुग्णसेवा मिळावी हे स्वप्न होते. त्या स्वप्नांची पूर्तता आता होत आहे आणि त्याचा मनस्वी आनंद आहे. जिल्हा व शहर जनतेचे ऋण फेडण्यासाठी या जिल्ह्यात हा प्रोजेक्ट राबविला व आता बायपाससारखी शस्त्रक्रिया होऊन हॉस्पिटल प्रकल्प पूर्णत्वाकडे गेला.’’ नीलम राणे यांच्या हस्ते शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय अधिकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या बायपास शस्त्रक्रियेसाठी व या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आसावरी उपाध्याय यांनी परिश्रम घेतले असून त्यांचेही राणे यांनी कौतुक केले.
---------
चौकट
दर्जेदार रुग्णसेवेची ग्वाही
लाईफटाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर्स, नर्सेस अन्य सर्व कर्मचारी या सर्वांसाठीच हा ऐतिहासिक व आनंदाचा दिवस आहे. बायपास शस्त्रक्रियेच्या निमित्ताने या हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना स्फूर्ती मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळेल, अशी ग्वाही मंत्री राणे यांनी याप्रसंगी दिली.
--
दर्जेदार सुविधांसाठी पुढाकार
राजकीय तुलना करताना मंत्री राणे म्हणाले, ‘‘मी आणि माझ्या विरोधातील विरोधी नेते यामध्ये मोठा फरक आहे. या जिल्ह्यात शैक्षणिक सुविधेसाठी शाळा, कॉलेज, इंजिनिअरींग, मेडिकल कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधांची सोय व्हावी म्हणून मी पुढाकार घेतला आहे. त्या पूर्णत्वाकडे नेल्या आहेत.’’