‘सोबतीण’, सिंधुदुर्गाच्या मातीतील कथासंग्रह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोबतीण’, सिंधुदुर्गाच्या 
मातीतील कथासंग्रह
‘सोबतीण’, सिंधुदुर्गाच्या मातीतील कथासंग्रह

‘सोबतीण’, सिंधुदुर्गाच्या मातीतील कथासंग्रह

sakal_logo
By

60872
वृंदा कांबळी

‘सोबतीण’, सिंधुदुर्गाच्या
मातीतील कथासंग्रह

लीड
लेखक प्रमोद कोयंडे यांचा ‘सोबतीण’ हा कथासंग्रह वाचनात आला होता. परवा पुस्तके चाळत असताना तो परत हाती लागला. कथा ही आतून येत असते. कोणताही कथालेखक नंतर त्यात आपल्या कल्पनेचे रंग भरतो. कथेला आकर्षक बनविण्यासाठी, ठाशीवपणा देण्यासाठी कथेच्या बाह्यरुपावर काम करत असतो; पण कथाबीज हे भोवतालच्या परिसरातून, लेखकाच्या अनुभवविश्वातूनच रुजत असते. कथाबीज एकदा का मनात पडले की लेखकाला त्याला कथारुप देईपर्यंत चैन पडत नसते. कथेमध्ये लेखकाच्या अनुभवविश्वाचा, जीवनानुभवांचा स्पष्ट ठसा उमटत असतो. प्रमोद कोयंडे यांचा ‘सोबतीण’ हा कथासंग्रह असाच सिंधुदुर्गाच्या अस्सल मातीतील आहे. सिंधुदुर्गातील ग्रामीण लोकजीवनाचे प्रतिबिंब त्यात दिसत आहे.
- सौ. वृंदा कांबळी
...............
आजरा वाचनालयाचा शिवाजी सावंत स्मृती पुरस्कार ‘सोबतीण’ या कथासंग्रहाला मिळाला आहे. लेखकाचा हा पहिलाच कथासंग्रह. यातील कथांना दिवाळी अंकातून पूर्वप्रसिद्धी मिळालेली होती. यातील कथा वाचकाच्या मनाची पकड घेणाऱ्या अशा कथा आहेत. आपल्या अवतीभवती घडत असणाऱ्या सामान्य घटनांवरही ते कथा रंगवत नेतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण जीवन त्यांनी अनुभवलेले आहे. त्यामुळे कथांमधून ग्रामीण व्यक्तिरेखा ठाशीवपणे उतरल्या आहेत. प्रसंग खुलवत खुलवत ते कथानक पुढे नेतात. कथेतील वातावरण निर्मिती करताना संवादात बोली भाषेचा चपखल वापर केल्यामुळे वातावरणनिर्मिती अचूक साधली आहे. यातूनच अनेक व्यक्तिरेखा त्यांनी उभ्या केल्या आहेत. भोवतालच्या जगाचे सूक्ष्म निरीक्षण, मानवी मनाचा अभ्यास कथा वाचताना जाणवतो. लोकांच्या स्वभावातील गुण-दोष प्रसंगातून सांगत व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ग्रामीण भागातील व्यक्तींबरोबरच इथला निसर्ग, इथले प्राणी हेही कथेचेच एक घटक बनून येतात. एखादी कथा प्रवाहित करण्यासाठी लेखकाने याचा चांगला वापर करून घेतला आहे. शीर्षककथा ‘सोबतीण’ या कथेत एका अपंग व गरीब होडीवाल्याचे शब्दचित्र व त्याचे भावविश्व आले आहे. खाडीच्या दुसऱ्या काठाला लोकांना घेऊन जाणारा ‘गंग्या’ नावाचा पोलिओने अपंग बनलेला गरीब होडीवाला. खाडीवर पूल बांधला गेल्यामुळे त्याचा होडीचा व्यवसाय बंद पडतो. अपंगत्वामुळे तो दुसरा कोणताच व्यवसाय करू शकत नाही. उपासमारीची वेळ येते. अशा वेळीही तो आपली होडी विकायला तयार होत नाही. ती आपली सोबतीण आहे. आजपर्यंत तिनेच साथ दिलीय. तिला मी कशी विकू? त्याच्या मृत्यूनंतर गावकरी ती होडी त्याच्याबरोबर चितेवर जाळतात. या कथेत ‘गंग्या’ या अशिक्षित ग्रामीण माणसाच्या मनातील जीवननिष्ठा, त्याच्या श्रद्धा, त्याचा करुण अंत आदींमुळे ही कथा वाचकाच्या मनाला चटका लावून जाते.
‘होळी’ ही कथाही अशीच चटका लावणारी आहे. होळीसाठी सागवानी झाड तोडल्यावर झाडाचा मालक तसाच मोडून पडतो. कारण त्या झाडाच्या येणाऱ्या चांगल्या किंमतीतून तो मुलीच्या लग्नासाठी खर्च करणार असतो; पण होळीसाठी झाड तोडले आणि त्याची किंमतही नाकारली. त्या धक्क्याने वडिलांचा मृत्यू होतो. आता लग्नाची शक्यताच संपल्याने मुलगी आत्महत्या करते. तिकडे गावात होळी जळत असते आणि इकडे मुलीसह घर जळत असते. करुण शेवट असलेली ही कथा गरिबी, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, जातीयता, मानवी जीवनातील कुरूपता इत्यादींचे विदारक दर्शन घडवते. ‘मास्तर’ या कथेत शाळेतील वातावरण, संस्थेतील राजकारण, प्रयोगशील व उत्साही शिक्षकाच्या भावनांची होणारी गळचेपी याचे चित्रण आले आहे. ‘सूर्य काजळून गेला’ या कथेत गाव पातळीवरील राजकारण, निवडणुकीतील डावपेच दाखवले आहेत. प्रामाणिक लोकसेवा करणारा ‘सूर्या’ लोकांच्या प्रेमामुळे निवडणुकीत आमदारालाच आव्हान करतो; पण न बोलता, छुप्या रीतीने त्याचा कसा काटा काढला जातो, ते या कथेत पाहायला मिळते. गोरगरीब, सामान्य व प्रामाणिक माणसाला सत्ता व संपत्ती याच्या बळावर कसे सहज चिरडले जाते, या सामाजिक भेदक वास्तवाचे चटका लावणारे वर्णन आले आहे. ‘वीस रुपये’ या कथेत भिकारी वीस रुपये मागतो. आपले पाकीट मारले गेलेय, असे सांगून सहानुभूती मिळवतो. अनेकांकडून वीस रुपये घेतो. घरातील आजारी आई व दोन बहिणींसाठी त्याने हा मार्ग अनुसरलेला असतो. हे काढून घेण्यासाठी त्याला पोलिसी हिसका दाखवला जातो. ''नापास'' या कथेत वर्गात नेहमी पहिला नंबर मिळवणारा मुलगा पुढे जगाच्या शाळेत नापास होतो. मुंबईत नोकरीसाठी जाऊन नोकरी न मिळाल्यामुळे पोटासाठी वॉचमनची नोकरी करतो. ''भिक्या'' ही चटका लावणारी एक सुंदर कथा आहे. बाल कामगारांसाठी शासनाने कायदे केले; पण याची दुसरी बाजू लेखकाने या कथेत प्रभावीरीतीने दाखवली आहे. मालकांनी या बालमजुरांना काढून टाकले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. काम करून शिक्षण घेणारी मुले रस्त्यावर येतात. ‘अण्णांचा पुनर्जन्म’ ही कथा ग्रामीण लोकांच्या स्वभावावर व वृत्तीवर प्रकाश टाकणारी कथा आहे.
या सर्व कथांचा विचार केल्यावर काही समान धागे लक्षात येतात. ग्रामीण माणसाच्या मनाचा, स्वभावाचा, विचारांचा, एकूणच ग्रामीण लोकजीवनाचा चांगला अभ्यास आहे. निरीक्षणशक्ती, संवेदनशीलता आहे. यातील पात्रे आपल्या अवतीभोवती वावरत आहेत, असे वाटण्याइतकी जिवंत उतरली आहेत. संवाद बोलीभाषेचा वेगळा बाज यामुळेही कथांना सौंदर्य प्राप्त झाले आहे.