रामेश्वर मच्छीमारी संस्थेत सत्तांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामेश्वर मच्छीमारी संस्थेत सत्तांतर
रामेश्वर मच्छीमारी संस्थेत सत्तांतर

रामेश्वर मच्छीमारी संस्थेत सत्तांतर

sakal_logo
By

60900
मालवण ः दांडी येथील श्री रामेश्वर मच्छीमारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत दांडेश्वर दर्यावर्दी परिवर्तन पॅनलने वर्चस्व मिळविल्यानंतर जल्लोष करताना विजयी उमेदवार.


रामेश्वर मच्छीमारी संस्थेत सत्तांतर

पारंपारिक मच्छीमारांची सरशी; दांडेश्वर पॅनलने तब्बल ११ जागा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ ः मच्छीमार बांधवांच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या शहरातील दांडी येथील श्री रामेश्वर मच्छीमारी सहकारी संस्थेच्या गेल्या २५ वर्षांतील पहिल्याच निवडणुकीत पारंपरिक मच्छीमारांच्या दांडेश्वर दर्यावर्दी परिवर्तन पॅनलने एकतर्फी वर्चस्व गाजवले. एकूण १३ पैकी ११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सर्व अकरा जागांवर दर्यावर्दी परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आले. दर्यावर्दी पॅनलने सत्ताधारी पॅनलला धोबीपछाड देत संस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयामुळे पारंपरिक मच्छीमारांनी एकच जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली.
दांडी येथील श्री रामेश्वर मच्छीमारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवड गेली २५ वर्षे बिनविरोध होत असताना यावर्षी प्रथमच निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पारंपरिक मच्छीमारांनी एकजूट दाखवत प्रस्थापित सत्ताधारी पॅनेल विरोधात आपले पॅनेल उभे केल्याने या संस्थेच्या २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच निवडणूक घेण्यात आली. दांडी प्राथमिक शाळेत झालेल्या या निवडणुकीत दिवसभरात मतदान प्रक्रिया पार पडल्यावर सायंकाळी उशिरा मतमोजणी झाली.
सर्व अकरा जागांवर दांडेश्वर दर्यावर्दी पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने या निवडणुकीत दर्यावर्दी पॅनलने एकतर्फी वर्चस्व गाजवले. यामध्ये क्रियाशील सर्वसाधारण सभासद प्रतिनिधी मतदार संघातून संतोष ढोके, जीवन भगत, हेमंत जोशी, प्रवीण मेस्त, तुषार आचरेकर, पंकज सादये, रवींद्र चांदेरकर, दिलीप पराडकर, महिला मतदार संघातून अर्चना आचरेकर, मृणाली कोयंडे व भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग मधून जगदीश खराडे हे विजयी झाले.
सहकार अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. यासाठी श्रीकृष्ण मयेकर, प्रेमानंद जाधव, राजन आरोंदेकर, प्रशांत शिर्सेकर, विलास सावंत, गंगाराम सावंत, शिवप्रसाद चौकेकर, अतुल मालंडकर, राधिका हळदणकर, सान्वी शेट्ये, नम्रता साळकर, योगेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले. या विजयानंतर पारंपरिक मच्छीमारांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी दांडेश्वर दर्यावर्दी परिवर्तन पॅनेलचे प्रमुख अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, भाऊ मोर्जे, रुपेश प्रभू आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी उपस्थित राहून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
--
११ जागांसाठी लढत, २ बिनविरोध
संस्थेच्या एकूण १३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. या दोन जागांवर मेघनाद धुरी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलचे दत्ताराम माणगावकर व रुपेश साळगावकर यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे ११ जागांसाठी या दोन पॅनलमध्ये थेट लढत असल्याने निवडणूक घेण्यात आली.