प्लास्टिकविरोधी कारवाईचा व्यावसायिकांना धसका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिकविरोधी कारवाईचा व्यावसायिकांना धसका
प्लास्टिकविरोधी कारवाईचा व्यावसायिकांना धसका

प्लास्टिकविरोधी कारवाईचा व्यावसायिकांना धसका

sakal_logo
By

(पान २ साठी)

खेडमध्ये प्लास्टिकविरोधी कारवाईचा धसका

व्यापाऱ्यांकडून विक्री बंद ; पालिकेची मोहीम तीव्र

खेड, ता. ७ ः शासनाच्या आदेशानुसार, सिंगल यूज कॅरीबॅगवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नगर प्रशासनाच्या पथकाकडून शहरातील दुकानांना अचानक भेटी देत प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. या कारवाईचा दुकान व्यावसायिकांनी धसका घेतला असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे बंद केले आहे.
साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कापडी पिशव्या विकत घेण्याचे फर्मान दुकान व्यावसायिकांकडून सोडले जात असून यासाठी १० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. शासनाने १ जुलैपासून सिंगल युज कॅरिबॅगवर बंदी घातली आहे. नगरप्रशासनाने या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच नगरप्रशासनाच्या पथकाने दुकानांना अचानक भेटी देत ३ दुकानदारांकडून ११ किलो प्लास्टिक जप्त केले होते. या धडक कारवाईनंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकान व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते; मात्र, काही दिवसानंतर दुकान व्यावसायिकांनी पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यास सुरवात केल्याचे निदर्शनास येताच नगरप्रशासनाच्या पथकाने दुकानांना अचानक भेटीचा सपाटा सुरू केला. या धडक कारवाईत अनेक दुकान व्यावसायिक कारवाईच्या कचाट्यात अडकले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. पथकाने ही मोहीम अधिक तीव्र केली असून कोणत्याही क्षणी पथक दाखल होत असल्याने व्यावसायिकांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे. दंड भरण्यापेक्षा प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करणे काही दुकान व्यावसायिकांनी पसंत केले असून साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० रुपयांची पिशवी विकत घेण्याची गळ घातली जात आहे. यामुळे ग्राहकांना १० रुपयांचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.