अनधिकृत व्यवसायांची यादीच तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत व्यवसायांची यादीच तयार
अनधिकृत व्यवसायांची यादीच तयार

अनधिकृत व्यवसायांची यादीच तयार

sakal_logo
By

60917
साक्षी प्रभू

अनधिकृत व्यवसायांची यादीच तयार

देवगड नगराध्यक्ष ः आमदार राणेंच्या टिकेला उत्तर


सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ७ ः भाजप आमदार नीतेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या कारभाराबरोबरच सत्ताधारी नगरसेवकांवर टीका केली आहे. शहरात कोणत्याही सत्ताधिकारी नगरसेवकांचे अनधिकृत व्यवसाय चालू असल्यास त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे. त्यांचाकडे असलेल्या अनधिकृत व्यवसायाची माहिती त्यांनी पोलिसांना द्यावी; मग आमच्याकडे असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अनधिकृत व्यवसायाची यादीही आम्ही देवू, असे प्रतिआव्हान नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी दिले. देवगड शहरासह स्थानिक पोलिसांची बदनामी त्यांनी थांबवावी, असे आवाहनही प्रभू यांनी केले.
अलीकडेच आमदार राणे यांनी नगरपंचायतीवर केलेल्या टीकेला नगराध्यक्षा प्रभू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आमदार राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी बरेचवेळा आरोप केले; पण एकदाही सिध्द करू शकले नाहीत. सत्ताधिकारी नगरसेवकांचे अनधिकृत व्यवसाय असल्यास त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे. तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांसह शहरातील प्रमुख पदाधिकार्‍यांचे किती अनधिकृत व्यवसाय आहेत हे जनतेला ज्ञात आहे. आमदारांना जनतेची इतकीच काळजी असल्यास राजकारण बाजूला ठेऊन पोलिसांना निवेदन देताना आपल्यालाही सोबत घेतल्यास सामूहिक निवेदन देवू. त्यांचाकडे असलेल्या अनधिकृत व्यवसायाची माहिती त्यांनी द्यावी. आपल्याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे किती अनधिकृत व्यवसाय आहेत याची यादी देवू. त्यांची निव्वळ राजकीय आकसापोटी टीका असते. भाजप सत्तेत असताना पेट्रोल ७०, डिझेल ६२ रूपये असतानाचे अंदाजपत्रक एक कोटी आठ लाखाचे होते. आज पेट्रोल १०६ डिझेल ९५ रूपये असतानादेखील तेच अंदाजपत्रक ९८ लाखात बनविले. फोगिंग यंत्र, गवत कापणी, कचरा गाड्यांना लागणार्‍या इंधनाची खोटी बिले लावून मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचाराला आळा घालून ८ महिन्यामध्ये नगरपंचायतीचे दहा लाख रूपये वाचविले. कचर्‍याच्या ठेकेदाराला छुपा पाठिंबा देवून कमी दराने निविदा भरायला लावून शहर बक्काल, अस्वच्छ करून सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचा डाव निश्‍चित हाणून पाडू. भाजप काळात रूग्णालयाकडे जाणारा रस्ता राजकीय आकसापोटी केला नाही. आपण सत्तेत आल्यावर प्राधान्याने पूर्ण केला. भटवाडी, बेलवाडी रस्ता भाजप नगरसेवक असून पाच वर्षात करू शकला नाही तो प्राधान्याने पूर्ण केला. देवगड स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच देवगड शहरात अग्निशमन वाहन दाखल होईल. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून विविध विकास कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. नागरोत्तानमधून तीन कोटी चाळीस लाख, पर्यटनमधून एक कोटी चाळीस लाख, लोकशाही अण्णाभाऊ साठे निधीतून ९८ लाख, पाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी ७५ लाख, सहाय्य अनुदान दोन कोटी चाळीस लाख अशी विविध विकास कामे चालू आहेत. जनतेने आमच्यावर विश्वास दाखविला आहे तो आम्ही सार्थ करत आहोत. उलट राजकीय वजन वापरून कामे रद्द होण्यासाठी आमदारांचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे राजकारण करून शहराच्या जनतेचे नुकसान थांबवावे, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे
..............
चौकट
पराभवामुळे राणेंना मानसिक धक्का
नगरपंचायतीच्या पराभवाच्या मानसिक धक्यातून आमदार राणे अजूनही सावरलेले नाहीत. देवगड शहर पर्यटनाच्या पटलावर अग्रक्रमाने येत असताना आमदारांनी शहराची बदनामी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सत्ताधारी नगरसेवकांवर आरोप करण्याआधी पाच वर्षांत भाजप नगरसेवकांकडे महागड्या गाड्या तसेच कोल्हापूर, मुंबई येथे फ्लॅट कोणत्या व्यवसायातून आले याचा शोध घ्यावा. आमदारांनीच तयार केलेल्या शॅडो समितीच्या सदस्यांना विचारणा केल्यास अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगतील, असा टोलाही प्रभू यांनी लगावला.