मालवणात बांधकाम आधिकारी धारेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात बांधकाम आधिकारी धारेवर
मालवणात बांधकाम आधिकारी धारेवर

मालवणात बांधकाम आधिकारी धारेवर

sakal_logo
By

60955
मालवण ः तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत बांधकामच्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना आमदार वैभव नाईक. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)


मालवणात बांधकाम आधिकारी धारेवर

आमदार नाईक आक्रमक; ‘कार्यारंभ’ मिळूनही रस्त्याची रखडल्याने संताप

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : कुंभारमाठ जरीमरी, सागरी महामार्ग आणि बेळणे रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश देऊनही या कामांना अद्याप सुरुवात न केल्याने आक्रमक बनलेल्या आमदार वैभव नाईक यांनी आज पदाधिकाऱ्यांसह येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आठ दिवसांत या कामांना सुरुवात करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
शहरातील कुंभारमाठ जरीमरी या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर बेळणे तसेच शहरातील रेवतळे सागरी महामार्गाच्या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणूनही तसेच या कामांना कार्यारंभ आदेश मिळाला असतानाही प्रत्यक्षात कामांना सुरुवात झालेली नाही. परिणामी लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आक्रमक बनलेल्या आमदार नाईक यांनी आज दुपारी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, मंदार केणी, किरण वाळके, मंदार ओरसकर, पंकज सादये, प्रसाद आडवणकर, सिद्धार्थ जाधव, दीपक देसाई, सन्मेष परब, मनोज मोंडकर, तपस्वी मयेकर, सिद्धेश मांजरेकर, राहुल परब, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधकामचे अधिकारी अजित पाटील, पाटील आदी उपस्थित होते.
कुंभारमाठ रस्त्याच्या कामाचे काय झाले, असा प्रश्न आमदार नाईक यांनी पाटील यांना केला. यावर संबंधित ठेकेदाराला आवश्यक सूचना दिल्या आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले. प्रत्यक्षात या कामांना जून महिन्यात कार्यारंभ आदेश मिळाला असताना अद्याप काम का सुरू झाले नाही? असा सवाल करत रस्त्यावरील खड्डे न बुजविता हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम करण्यात यावे, अशा सक्त सूचना आमदार नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
--
महिनाअखेरची डेडलाईन
बेळणे, सागरी महामार्गाच्या रस्त्याचेही काम तत्काळ हाती घ्यावे. आम्हाला ठेकेदारावर आक्षेप घ्यायचा नाही; मात्र मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने ते काम मार्गी लागावे, अशी इच्छा आहे. त्यामुळे या महिना अखेर ही सर्व कामे मार्गी लागायला हवीत. पुन्हा आठ दिवसांनी आपण पुन्हा कार्यालयाला भेट देऊन आढावा घेणार असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.