व्हेल माशाची उलटी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हेल माशाची उलटी बातमी
व्हेल माशाची उलटी बातमी

व्हेल माशाची उलटी बातमी

sakal_logo
By

कोल्हापुरात पुन्हा
व्हेलची उलटी जप्त
तीन संशयित ताब्यात; सलग तिसरी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः जिल्ह्यात आठवड्यात दुसऱ्यांदा प्रतिबंधित व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी उघडकीस आली. बाबूभाई परीख पूल ते मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावर आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी व्हेल माशाची उलटी नेणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ किलो १५ ग्रॅमची उलटी जप्त केली. याची किंमत सुमारे २ कोटी १ लाख इतकी आहे. करण संजय टिपुगडे (२७, राम गल्ली, कळंबा), संतोष अभिमन्यू धुरी (४९, सुभद्रा टावर, कदमवाडी), जाफर सादिक महम्मद बाणेदार (४०, सुलोचना पार्क, नवीन वाशी नाका) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित असणारी व्हेल माशाची उलटी घेऊन काहीजण शहरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या दुचाकीच्या डिकीतून उलटी हस्तगत केली. हा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार, विनायक चौगुले, प्रकाश पाटील, हरीश पाटील, संजय हुंबे, नितीन चौथे, संदीप कुंभार, शिवानंद मठपती, रफिक आवळकर यांच्यासह वनाधिकारी रमेश शंकर कांबळे व वनपाल विजय ईश्वर पाटील यांनी केली. यासाठी सायबर पोलिस ठाण्याकडील अंमलदार प्रदीप पावरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आंतरराज्य रॅकेट
व्हेल मासा हा खोल समुद्रात असतो. त्यामुळे आज हस्तगत केलेली व्हेलची उलटी सिंधुदुर्ग येथून आणल्याचा संशय आहे. ही उलटी कोठे विकली जाते? या मागे आंतरराज्य रॅकेट आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. जिल्ह्यात सहा महिन्यांत तिसरी तर एका आठवड्यातील दुसरी कारवाई आहे.

व्हेलची उलटी बनते कशी
व्हेल हे दात नसलेले व दात असलेले असे दोन प्रकारचे असतात. दात असलेल्या स्पर्म व्हेलची उलटी मौल्यवान मानली जाते. वैद्यकीय भाषेत याला अॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. व्हेलचे आवडते खाद्य म्हणजे म्हाकूळ आणि कोळंबी. यातील म्हाकूळचा तोंडाकडचा चोचीसारखा भाग आणि कोळंबीचा कवचाकडचा कडक भाग व्हेलला पचत नाही. तो भाग व्हेल खोल समुद्रात उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायने असतात. ही उलटी दीर्घकाळ लाटांवर तरंगत राहिल्यामुळे ती मेणासारखी बनते. तिचे वजन ५० किलोपर्यंत असू शकते.

का आहे इतकी किंमत
व्हेलची उलटी अत्तर उद्योगात महत्त्वपूर्ण मानली जाते. यापासून बनवलेल्या अत्तराचा वास दीर्घकाळ टिकतो. त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होत नाही. यामुळे नैसर्गिक तत्त्व म्हणून हा घटक वापरलेल्या अत्तराला मोठी किंमत मिळते. अगरबत्ती, धूप, औषध उद्योगातही या अत्तराचा वापर होतो. साहजिकच याला मोठी किंमत मिळते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे उलटीची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याच्या बऱ्याच घटना अलीकडच्या काळात उघड झाल्या आहेत.