मेहेंदी शगुनाची .... मेहेंदी मिळकतीची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेहेंदी शगुनाची .... मेहेंदी मिळकतीची
मेहेंदी शगुनाची .... मेहेंदी मिळकतीची

मेहेंदी शगुनाची .... मेहेंदी मिळकतीची

sakal_logo
By

(टुडे पान ३ साठी, सदर)

फोटो ओळी
-rat८p३.jpg ः
६१०३२
प्रसाद जोग

धरू कास उद्योगाची .............लोगो

मेहेंदी शगुनाची .... मेहेंदी मिळकतीची

तुळशीचे लग्न लागले, वाघबारस झाली की, लग्नाचे मुहूर्त निघायला सुरवात होते आणि लग्नात हळदीप्रमाणेच वाढती मागणी असते ती नैसर्गिकरित्या तयार केलेल्या व चांगली रंगणाऱ्या मेहेंदीला ... लग्नात, शुभकार्यात ही शगुनाची मेहंदी जास्तच भाव खाऊन जाते.
व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येईल की, प्रचंड मागणी असूनही हा उद्योग कोकणात फार वाढू शकलेला नाही;
पण या व्यवसायाला लागणारा कच्चा माल म्हणजे मेहंदी नीट लागवड केल्यास कोकणातदेखील चांगल्याप्रकारे वाढू शकते व मेहेंदी उद्योग कोकणात उभारण्यासाठी साहाय्यभूत होऊ शकते.
(मेंदी बाग) किंवा मेहेंदीची झुडपे जमिनीत बिया टाकून किंवा मेहंदीच्या एक वित लांबीच्या फांद्या, मेहंदीचे तिरके छाट (कलम) लावूनही करता येऊ शकते. वाळवंटी प्रदेशात, कमी पाण्याच्या भागातही ही मेहंदी चांगली तग धरून राहू शकते. गुजरात, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रात मेहंदी मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या उगवताना आढळते. कधी कधी ग्रामीण भागात शेतकरी मेहेंदीचा वापर जैविक कुंपणासाठीही करतात. ती कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकत असल्याने ओसाड जागी गवताच्याऐवजी मेहेंदी लागवड केल्यास अथवा वाढू दिल्यास मेहेंदीच्या पाल्याचा उपयोग मेहेंदी व मेहेंदी उत्पादनांसाठी करता येऊ शकतो व त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
मेहेंदीचा वापर सौंदर्य प्रसाधनाबरोबरच डायनिर्मिती, केसांना वापरायचे रंग यामध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो. मेहेंदी उद्योगातील नामवंत ब्रँड आपल्या सर्वांना परिचयाचे आहेतच. राजस्थानच्या सोजत मेहेंदीला तर जीआय इंडिकेशन (मानाचे भौगोलिक निर्देशांक) देखील मिळालं आहे. सोजत मेहेंदी तिच्या रंगण्याच्या गुणवत्तेमुळे भारतात व परदेशातही लोकप्रिय झालेली आहे. मेहेंदी, डाय यामध्ये त्या स्थानिक मेहेंदीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
कोकणातील गावच्या घरांजवळ, बांधांवर, कुंपणांमध्ये पहिल्यांदा मेहेंदीची झुडुपे मोठ्या प्रमाणात दिसून येत असत. कालांतराने मेहेंदीची विशेष लागवड न झाल्याने मेहेंदीच्या पाल्याची कमतरता भासू लागली व लग्नकार्यात करवल्यांकडून पाट्यावर वरवंट्याच्या साहाय्याने वाटली जाणारी घराघरातली नैसर्गिक मेहेंदी बनवण्याची रित हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. आता सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानात आयत्या मेहेंदीच्या कोनांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे आढळते. गृहिणी जरी घरी मेहेंदी स्वतः तयार करू शकत नसल्या तरी
अजूनही शहरी, निमशहरी व ग्रामीण भागात इव्हेंट्समध्ये, फंक्शन्समध्ये, लग्नसमारंभात, साखरपुड्यासारख्या कार्यक्रमात तसेच ईद, दिवाळीसारख्या सणात महिलांना मेहेंदी काढून घ्यायला, काढायला आवडते.
मेहेंदी उद्योगासाठी जर नीट बाजारपेठ सर्व्हेक्षण केले तर स्थानिक बाजारपेठेत नॅचरल मेहेंदी पावडरला, मेहेंदी कोनांना महिला ब्युटीपार्लर संचालक विशेष प्राधान्य देत असल्याचे समजून येते. केमिकल फ्री, ऑरगॅनिक प्रोडक्ट्सनाच प्रचंड मागणी वाढत आहे. याचाच अर्थ मेहेंदी व्यवसायात मेहेंदीच्या गुणवत्तेला व शुद्धतेला अनन्यसाधारण महत्व आहे, हे महत्व ओळखून कोकणातील मेहेंदीची विश्वासार्हता मार्केटमध्ये प्रस्थापित करण्याचे काम या क्षेत्रात येणारे नवउद्यमी करू शकतात. मेहेंदीला असलेले व्यावसायिक मूल्य ओळखून कोकणातील महिला उद्योजिकांनी, बचतगट सदस्यांनी आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने या चार पैसे मिळवून देणाऱ्या उद्योगाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. सुयोग्यपणे नियोजनबद्ध मेहेंदीची लागवड बचतगटांच्या माध्यमातून कोकणात करता येणे शक्य आहे.
फँटसी स्टाइल, जरदौसी, डिझायनर, अरेबिक, राजस्थानी, मारवाडी, मुघल मेहेंदी अशा मेहेंदीच्या विविध फॅशन सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंग असून मोठमोठे ब्रॅन्ड या साजशृंगाराच्या स्पर्धेत आहेत. या क्षेत्रातील उद्योगसंधी खालीलप्रमाणे ः
१. मेहेंदीची शेती करणे.
२. मेहेंदीची पेस्ट, पॅक, पावडर करून स्थानिक ब्युटी पार्लरना घाऊकमध्ये विकणे.
३. कृषी पर्यटनामध्ये पाट्यावर वाटलेली ट्रेडिशनल मेहेंदी पर्यटकांना डोक्याला थंडावा येण्यासाठी व हाता-पायांना लावण्यासाठी उपलब्ध करून देणे.
४. ब्रायडल मेहेंदी मेक्अप, आर्ट्सच्या ऑर्डर्स घेणे.
५. पर्यटनस्थळी मेहेंदी हट्स उभारून सेवा पुरवणे.
६. मेहेंदी क्लासेस, मेहेंदी प्रशिक्षण वर्ग यांचे आयोजन करणे.
७. मेहेंदी डिझायनर बनून नवे डिझाइन्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणे.
८. ब्युटी पार्लरच्या जाहिराती घेऊन कॉफी बूकसारखा मेहेंदी डिझाइन्सचा विशेषांक प्रकाशित करणे.
९. मेहेंदी कोन किरकोळ व घाऊक विक्री स्टॉल लावून करणे.
१०. मेहंदी कार्यशाळांचे शाळा-कॉलेजमधील मुलींसाठी पॅकेज तयार करून ते विकणे.
११. स्वतःचा मेहेंदी स्टुडिओ उभारणे.
१२. स्वतःचा मेहेंदी व ट्रेंड यावरील यू ट्यूब चॅनल ब्रॉडकास्ट करून सबस्क्रिप्शन वाढवणे.
१३. मेहेंदी डिझाईन्स व मेहेंदी उत्पादने ऑनलाइन बाजारात विक्रीस उपलब्ध करून देणे.
१४. मेहेंदी उद्योगासाठी लागणारी मशिन्स तयार करणे.
१५. मेहेंदी व हेअरडाय.
क्वालिटेटिव्ह प्रॅक्टिसेस यामध्ये प्रोफेशनल कन्सल्टन्सी प्रोव्हाईड करणे.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)