सावंतवाडीकरांनी अनुभवला ‘शिवकाल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीकरांनी अनुभवला ‘शिवकाल’
सावंतवाडीकरांनी अनुभवला ‘शिवकाल’

सावंतवाडीकरांनी अनुभवला ‘शिवकाल’

sakal_logo
By

61090
सावंतवाडी : शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकात सहभागी विद्यार्थ्यांसमवेत खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखमराजे भोसले आदी.


सावंतवाडीकरांनी अनुभवला ‘शिवकाल’

राजवाड्यात ‘शिवकालीन युद्धकला’; विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांमधून आत्मसंरक्षणाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ : तलवारीचे आवाज, डोळ्याचे पाते लवते न लवते तोच होणारे दांडपट्टयाचे चौफेर वार आणि लाठ्याकाठ्यांच्या आवाजांनी सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्याने शिवकाल अनुभवला. निमित्त होते अभिनव फाउंडेशन व सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचे.
सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात पारंपरिक मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि नऊवारी नेसून अफलातून संगीनी (तलवार) चालविणाऱ्या महिला, मुलींमुळे जणू राजवाड्याचे प्रांगण शिवकाल अनुभवत होते. प्रत्येक शस्त्र आणि अस्त्रामागचा इतिहास, ते चालविण्याची पध्दत, ऐतिहासिक संदर्भ विशद करत प्रत्यक्ष ते शस्त्र चालवून दाखवत मावळ्यांमधून शिवरायांनी उभा केलेला हिंदवी स्वराज्याचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. फिरंगोजी शिंदे आखाडा, कोल्हापूरचे वस्ताद प्रमोद पाटील, शिवराय पाटील यांनी युध्दकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, अभिनव फाउंडेशनचे संस्थापक ओंकार तुळसुलकर, युवा व्यावसायिक प्रतीक बांदेकर उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राजवाड्याच्या प्रांगणात प्रशिक्षणाथीँ, विद्यार्थी, त्यांचे पालक, शिवप्रेमींनी युध्दकलेची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी गर्दी केली होती.
‘विटा’ हे नावीन्यपूर्ण शस्त्र ज्याची नोंद इंग्रजांनी आपल्या गॅझेटमध्ये केले आहे, असे शस्त्र जे शत्रूवर हल्ला करून परत घेता येते, त्याची प्रात्यक्षिके वस्ताद पाटील यांनी दाखविली. नऊ वर्षांच्या विद्यार्थ्यांसह ६५ वर्षांच्या नार्वेकर, केसरकर यांनीही युद्धकलेची सुरेख झलक दाखविली. प्रशिक्षणार्थी अंकिता नेवगी, पल्लवी स्वार, आश्पाक शेख, किशोर सरनोबत, अमोघ पुराणिक, पालक रंजिता देसाई, प्रिया नाटेकर, टोपले, श्रुती गिरप, विवेकानंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिनवचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, किशोर चिटणीस, राजू केळूसकर, डॉ. प्रसाद नार्वेकर, तुषार विचारे, अमित अरवारी, अण्णा म्हापसेकर, अभिषेक देसाई, मंदार केरकर, हेमंत मराठे, विनोद वालावलकर, बाळू वालावलकर, वस्ताद प्रमोद पाटील, शिवराज पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सावंतवाडी व मळेवाड येथे एकाच वेळी दोन बॅचमध्ये हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. हेमश्री चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नार्वेकर यांनी आभार मानले.
--
उपस्थितांकडून वाहवा
शालेय वयोगटापासून ते तरुण, तरुणी आणि महिलांमध्ये वीरश्री संचारली होती. एरवी मोबाईलच्या स्क्रीनवर आणि सोशल मीडियावर फिरणारे विद्यार्थ्यांचे हात लाठीकाठी फिरवत आत्मसंरक्षणाचे धडे देत होते. शिवकालीन युद्धकलेचा आठवडाभर सराव सुरू होता. आत्मविश्वासाने भरलेले मन आणि मनगटे अचूक लक्ष भेद करतील अशी लाठीकाठी फिरवत होती. त्यांच्या तोडीस तोड महिला आणि मुलींनी तलवारी, दांडपट्टयाची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची वाहवा मिळविली.