दापोलीत अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोलीत अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद
दापोलीत अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद

दापोलीत अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद

sakal_logo
By

(टुडे पान १ साठी)

दापोलीत अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद

बाजारपेठेसह जनजीवनावर परिणाम ; व्यावसायिकांमध्ये वाद

दाभोळ, ता. ८ ः परवानाधारक व बिगरपरवानाधारक वडाप व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादावरून दापोलीत ५ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचा परिणाम दापोली बाजारपेठेसह खेडेगावातील जनतेवर झालेला दिसून येत आहे.
दापोली तालुक्यामध्ये खेड, उन्हवरे, भडवळे, पालगड, मंडणगड, कांदिवली, केळशी, पाजपंढरी, बुरोंडी, दाभोळसह विविध छोट्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वडाप व्यवसाय सुरू आहे. या वाहनांची संख्या सुमारे ५०० इतकी असल्याचे सांगितले जाते. यातील दापोली-हर्णै, पाजपंढरी हा वडापचा मार्ग सर्वाधिक गर्दीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर १९ परवानाधारक तर १९ बिगरपरवानाधारक वडाप व्यावसायिक आहेत. यापूर्वी झालेल्या वादावेळी दापोलीतून परवानाधारक वडाप व्यावसायिकांच्या २ तर पाजपंढरी येथून परवानाधारक वडाप व्यावसायिकांच्या ३ ट्रिपा झाल्यावर १ परवानाधारक तर १ बिगरपरवानाधारक गाडी सोडण्याचा सर्वमान्य तोडगा काढण्यात आला होता; मात्र परवानाधारक वडाप व्यावसायिक आपला व्यवसाय होत नसल्याचा आणि मोठ्या प्रमाणात शासकीय कर भरण्याची जबाबदारी असल्याचे सांगतात. त्यांनी परवानाधारक वडापच्या २ गाड्या सुटल्यावर बिगरपरवानाधारक वडापची १ गाडी सोडावी, अशी मागणी केली. ती अमान्य झाल्याने या व्यावसायिकांनी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे आपले नेतृत्व दिले व त्यामुळे दापोलीतील बिगरपरवानाधारक वडाप व्यवसाय बंद झाला असल्याची चर्चा सुरू आहे.
यापूर्वी रिक्षा संघटना व परवानाधारक वडाप व्यावसायिक यांनी केलेल्या तक्रारीनंतर दापोलीमध्ये सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते समाविष्ट असलेली वडाप व्यावसायिकांची संघटना कार्यरत झाली होती. सध्या या संघटनेचे नेतृत्व एक युवा नेता करत आहे. परवानाधारक व बिगरपरवानाधारक वडाप व्यावसायिकांच्या हर्णै पाजपंढरी मार्गावर असलेल्या वादाचा परिणाम तालुक्यातील वडाप व्यवसायावर झाला असल्याने आधीच संकटात असलेले दापोलीतील व्यापारी आणखी समस्येत गुंतले गेले आहेत.