चिपळूण ः लोटेतील ग्रामीण रुग्णालय ठरेल स्थानिकांसाठी वरदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः लोटेतील ग्रामीण रुग्णालय ठरेल स्थानिकांसाठी वरदान
चिपळूण ः लोटेतील ग्रामीण रुग्णालय ठरेल स्थानिकांसाठी वरदान

चिपळूण ः लोटेतील ग्रामीण रुग्णालय ठरेल स्थानिकांसाठी वरदान

sakal_logo
By

rat८p२२.jpg
६१०९५
लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे.
-rat८p१९.jpg
६१०८६
अॅड. राज आंब्रे
-------------

लोटेतील ग्रामीण रुग्णालय ठरेल स्थानिकांसाठी वरदान
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मान्यता; उद्योजक संघटनेचा पाठपुरावा
मुझफ्फर खानः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ः लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळपास एकही अद्ययावत सुविधांयुक्त सरकारी रुग्णालय नाही. त्यामुळे लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची लोटे-परशुराम उद्योजक संघटनेची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्य केली. लोटेत ग्रामीण रुग्णालय उभे राहिले तर ते परिसरातील गावांसाठी वरदान ठरणार आहे.
लोटेपासून २५ किमी अंतरावर खेड येथे कळंबणी आणि चिपळूणच्या दिशेने २५ किमी अंतरावर कामथे येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. स्थानिक आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने रामपूर (ता. चिपळूण) आणि वावे (ता. खेड) येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून दोन्ही ठिकाणच्या नव्या इमारतीचा आराखडाही तयार झाला आहे.
लोटे परिसरातील अनेक गावे खाडीकिनारी तर काही गावे डोंगराळ भागात आहेत. येथील ग्रामस्थांना अनेकदा उपचारासाठी चिपळूण किंवा कळंबणीला जावे लागते किंवा खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. चिपळूण आणि खेडला जाण्याचा प्रवास खरोखरच कठीण असतो. त्यामुळे लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, अशी मागणी केली जात आहे.
-----------
चौकट
लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या २ पूर्णवेळ डॉक्टर आणि ३ आरोग्य अधिकारी आहेत. आवाशी, गुंदे, भेलसई, आंबडस, सोनगाव, लोटे येथे उपकेंद्र आहेत. या ठिकाणी प्रत्येकी एक आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक कार्यरत आहेत. पूर्वीच्या जनगणनेनूसार येथे २८ हजार लोकसंख्या आहे; मात्र लोटे एमआयडीसीतील कामगार, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या संख्येचा विचार करता ही लोकसंख्या ४० हजारच्या जवळपास आहे. कळंबणी केंद्राला जोडलेली काही गावे लोटे आरोग्यकेंद्राला जोडली तर लोकसंख्येच्या निकषातही येथील ग्रामीण रुग्णालय होणे शक्य आहे.
----------
चौकट
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवा

साधी बाळंतपणे आणि अवघड बाळंतपणे. अडलेल्या बाळंतिणीकरता सिझेरियनची सोय. वैद्यकीय गर्भपात आणि अर्धवट झालेला गर्भपात वैद्यकीय मदतीने पूर्ण करणे. स्त्रियांच्या आरोग्य समस्यांवर उपचार. लहान मुलांचा न्यूमोनिया, अतिसार, शरीरातील पाणी कमी होणे, तीव्र कुपोषित मुले तसेच तान्ह्या बाळांचे आजार या सर्व गोष्टींकरिता वैद्यकीय मदत. न्यूमोनिया, रक्तदाब, ताप, मधुमेह अशा आजारांवर उपचार. साधे फ्रॅक्चर (हाड मोडणे), गळू, हर्निया यावरील शस्त्रक्रिया, विषबाधा किंवा सर्पदंश अशा अपघातांवर उपचार, क्षयरोग नियंत्रणासाठी डॉट (समक्ष) उपचार इत्यादी.
----------
कोट
लोटे येथे मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय तयार झाले तर या तिन्ही उपजिल्हा रुग्णालयांवरील ताण कमी होईल. त्याशिवाय रुग्णांना वेळेत उपचार मिळेल. कारखान्यांमध्ये आगीची घटना घडली आणि एखादा रुग्ण जखमी झाला तर त्याला कराड किंवा मुंबईला हलवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अशा रुग्णांवर उपचार करता येईल अशी सुविधा असायला हवी, अशी आमची मागणी आहे.
- अॅड. राज आंब्रे, अध्यक्ष, लोटे परशुराम उद्योजक संघटना