आता आगाऊ मतदान नोंदणीचा पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता आगाऊ मतदान नोंदणीचा पर्याय
आता आगाऊ मतदान नोंदणीचा पर्याय

आता आगाऊ मतदान नोंदणीचा पर्याय

sakal_logo
By

आता आगाऊ मतदान नोंदणीचा पर्याय

अर्हताकारी तारखा निश्चित; आजपासून विशेष मोहीम

ओरोस, ता. ८ ः मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हताकारी दिनांक होता. म्हणजे १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती; मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्याच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये उद्या (ता. ९) प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ आदी तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील नाव तपासणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने १९ व २० नोव्हेंबर आणि ३ व ४ डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. वंचित घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला आणि दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी १२ व १३ नोव्हेंबर, तर २६ व २७ ला तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नावनोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जातील. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर हा कालावधी मतदार नोंदणी तसेच एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले, तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.
.................
विशेष ग्रामसभेचे उद्या आयोजन
ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने गुरुवारी (ता. १०) राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्याअंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावांत गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाणार आहे.
--
कोट
मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदार यादीतील आपले तपशील अचूक असल्याची खात्री करून घ्यावी.
- के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी