कुडाळ पोलिसांची भूमिका संशयास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ पोलिसांची भूमिका संशयास्पद
कुडाळ पोलिसांची भूमिका संशयास्पद

कुडाळ पोलिसांची भूमिका संशयास्पद

sakal_logo
By

टीपः swt५२७.jpg मध्ये फोटो आहे.
कुडाळ ः शहरातील जागरूक नागरिकांनी शनिवारी कुडाळ मारुती मंदिर येथे बैठक घेतली.

कुडाळ पोलिसांची भूमिका संशयास्पद
---
सभेत आरोप; उद्योजक पटेल यांच्यावरील हल्ला प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. येथील पोलिस ठाण्याच्या आवारात हल्ल्याची घटना घडूनही पोलिसांनी हल्लेखोराला झुकते माप दिले. त्यामुळे न्यायालयात संशयित आरोपी हादी खान याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याचा आरोप कुडाळमधील सर्वपक्षीय, उद्योजक व व्यापाऱ्‍यांच्या बैठकीत प्रमुख मंडळींनी केला. या पार्श्वभूमीवर काल (ता. ७) जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन संशयित हल्लेखोराला कुडाळसह जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन प्रमुख मंडळींनी केले. त्याला उपस्थित सर्वांनी सहमती दर्शविली.
येथील पोलिस ठाण्याच्या आवारात गुरुवारी (ता. ३) उद्योजक पटेल यांच्यावर परप्रांतीय कामगार हादी खान याने हल्ला केला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची गंभीर दखल घेत शहरातील जागरूक नागरिकांनी आज येथील मारुती मंदिरात बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसचे अभय शिरसाट, उद्योजक कमलाकांत परब, बबन तेली, शामा तेली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धीरज परब, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रामा शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, बांधकाम व्यावसायिक दिलीप परब, प्रसाद शिरसाट, संदेश पडते, बंड्या सावंत, निकू म्हाडेश्वर, किरण शिंदे, पुरुषोत्तम पटेल, कांती पटेल आदी उपस्थित होते.
अभय शिरसाट म्हणाले, ‘‘या प्रवृत्तीचा वेळीच बीमोड करणे गरजेचे आहे. संशयिताकडून यापूर्वी अशा प्रकारच्या चार ते पाच घटना घडलेल्या आहेत. संशयिताची पार्श्वभूमी माहिती असताना पोलिसांनी न्यायालयात पोलिस कोठडीसाठी भक्कमपणे बाजू मांडली नाही. त्यामुळेच त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे संशयिताची न्यायालयीन कोठडी संपल्यावर तो कुडाळसह जिल्ह्यात राहू नये.’’ त्याला उपस्थित सर्वांनी सहमती दर्शविली. कमलाकर परब म्हणाले, की पटेल हे गेली २० वर्षे चांगल्या प्रकारे व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर पोलिस ठाण्यासमोर खुनी हल्ला होतो, हे खेदजनक आहे. या घटनेचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. पटेल बंधूंच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे, अशी भूमिका मांडली. धीरज परब यांनी, हल्लेखोराची नसती आफत आपल्याकडे नको म्हणून पोलिसांनी पोलिस कोठडी मागितली नाही, असे सांगत न्यायालयात तपासी अधिकारी हजर का झाले नाहीत, याबाबत पोलिस अधीक्षकांना विचारणा करू. या व्यक्तीला कुणीच आसरा देऊ नये, यासाठी पोस्ट व्हायरल करू, अशी भूमिका मांडली.
या वेळी राजन नाईक, बंड्या सावंत, प्रसाद शिरसाट यांनी मत व्यक्त केले. या बैठकीला व्यापारी, सूज्ञ नागरिक, कुडाळसह कणकवली व अन्य तालुक्यांतील पटेल समाजातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंड्या सावंत यांनी आभार मानले.

निषेधार्ह घटना
ही घटना निषेधार्थ आहे. यासाठी तुम्ही कधीही हाक मारा, आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी पटेल समाजातर्फे पुरुषोत्तम पटेल यांनी भूमिका मांडली.