निलंबित वहाळ केंद्रातील लिपिकाची बँक खाती सील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निलंबित वहाळ केंद्रातील लिपिकाची बँक खाती सील
निलंबित वहाळ केंद्रातील लिपिकाची बँक खाती सील

निलंबित वहाळ केंद्रातील लिपिकाची बँक खाती सील

sakal_logo
By

वहाळ केंद्रातील निलंबित
लिपिकाची बँक खाती सील
फ्लॅटमध्येही गुंतवणूक; संशयित अद्याप हाती लागेना
चिपळूण, ता. ८ ः तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वहाळ येथील कनिष्ठ सहाय्यक लिपिक दुष्यंत शहाजी तिरमारे याने पगार बिलातून १ कोटी ६३ लाख ६९ हजार ६२७ रुपयांचा शासनाला गंडा घातला. त्याच्याकडून सन २०२० पासून पगारबिलात खोटी माहिती देऊन पैसे हडपण्याचा प्रकार सुरू होता. तिरमारे याने दोन वर्षात जमवलेल्या पावणेदोन कोटीच्या मायेतून काही सदनिका खरेदी केल्याची आरोग्य विभागात चर्चा आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर सावर्डे पोलिसांनी तपास सुरू ठेवला असून तिरमारेची काही बँक खाती गोठवली आहेत.
कनिष्ठ सहाय्यक लिपिक दुष्यंत तिरमारे यांनी चतुराईने पगारबिलातून शासनाला पावणेदोन कोटीचा गंडा घातला आहे. त्याच्याकडून गेली दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. महिन्याकाठी सरासरी १० लाखाची रक्कम तो पगारबिलातून काढत होता. नियमित पगारापोटीची रक्कम अदा होत असतानाही ती कमी पडल्याने चौकशीला सुरवात झाली आणि तिरमारेचे कारनामे उघड झाले. तिरमारेने अपहार केल्याने येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती सदानंद जाधव यांनी सावर्डे पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला; मात्र अद्याप त्याला अटक झालेली नाही.
तिरमारे याने पगारबिलातून हडप केलेली रक्कम स्वतःच्या बॅंकखात्यात जमा करून घेतली होती. जमा झालेली रक्कमेची त्या -त्या महिन्यात विल्हेवाट लावली. लाखोंच्या रकमा काहींना धनादेशद्वारे दिल्या तर अनेकदा २ ते ५ लाखापर्यंतची रक्कम स्वतःच काढलेली आहे. जमवलेल्या या काळ्या मायेतून त्याने काही ठिकाणी सदनिका घेतल्याची माहिती उपलब्ध होत आहे. मुळात लिपिकाने सादर केलेली पगारबिले वरिष्ठांनी मंजूर केल्यानंतर पुढे पाठवायची असतात. तिरमारेने सादर केलेल्या बिलांची परिपूर्ण तपासणी न करताच त्यावर वरिष्ठांनी सह्या केल्याचे जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आले आहे. आरोग्य विभागात पगारबिले सादर केल्यानंतर तिरमारे तिथे थांबतच नव्हता. कामात चतुराई जमत नाही, असे तो कृतीतून दाखवून द्यायचा; मात्र त्याने केलेल्या कोटीच्या अपहाराने वरिष्ठ अधिकारीही अचंबित झाले आहेत.
सेवार्थ प्रणालीत असलेल्या त्रुटींचा अंदाज घेऊन तिरमारे यांनी पद्धतशीरपणे पगारबिलात पावणेदोन कोटीची रक्कम बेकायदा आपल्या बँकखात्यात वळवली आहे. याबाबत सावर्डे पोलिस निरीक्षकांशी संवाद साधला असता या प्रकरणी तपास सुरू असून तिरमारेबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.