रुग्णालय भूमिपूजनातून राणेंचा स्टंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालय भूमिपूजनातून राणेंचा स्टंट
रुग्णालय भूमिपूजनातून राणेंचा स्टंट

रुग्णालय भूमिपूजनातून राणेंचा स्टंट

sakal_logo
By

61169
कणकवली ः पत्रकार परिषदेत बोलताना सतीश सावंत. शेजारी सुशांत नाईक, शैलेश भोगले, हर्षल गावडे, कन्हैया पारकर आदी.


रुग्णालय भूमिपूजनातून राणेंचा स्टंट
---
सतीश सावंत; स्थगित कामांचेही श्रेय घ्या
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ८ ः देवगड तालुक्यासाठी मंजूर झालेल्या ५० कॉटच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी केले. मात्र, या रुग्णालयाला महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत मान्यता मिळाली होती. केवळ श्रेय उठविण्यासाठी राणेंची ही स्टंटबाजी आहे, अशी टीका शिवसेना नेते सतीश सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केली. मंजूर विकासकामांचे श्रेय घेत असाल तर तुमच्या मतदारसंघातील रखडलेल्या, बंद पडलेल्या आणि स्थगिती मिळालेल्या कामांचेही श्रेय घ्या, असा टोलाही सावंत यांनी लगावला.
येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हैया पारकर, बंडू ठाकूर आदी उपस्थित होते. श्री. सावंत म्हणाले, ‘‘देवगड उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता ही महाविकास आघाडी काळात मिळाली होती. त्याची सगळी प्रक्रिया तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत आणि तत्कालीन शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर यांच्या माध्यमातून झाली होती. या रुग्णालयाची निविदा प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून माहिती घेऊन राणेंनी भूमिपूजनाचे श्रेय घेतले; परंतु याची मान्यता नोव्हेंबर २०२१ मध्ये आघाडी सरकार काळात मिळाली. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांत काही करताना न आल्याने महाविकास आघाडी काळात मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन करून श्रेय घेण्याची स्टंटबाजी ही राणेंकडून होत आहे. भुईबावडा घाट रस्त्यांच्या डांबरीकरणाचीही मंजुरी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातूनच झाली होती. कणकवली विधानसभा मतदारसंघातील एकही काम सध्या सुरू नाही. याउलट आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात कामाचा सपाटा सुरू आहे. श्रेय लाटण्यासाठीच हा सगळा राणेंचा प्रयत्न होता.’’
ते म्हणाले, ‘‘आंबा, काजू विम्याचे पैसे मिळाले नाहीत. काही त्रुटी झाल्या होत्या. मंडळ स्तरावरील बेरजा चुकल्या होत्या. याबाबत विमा कंपनीविरोधात कैलास पाटील यांनी आंदोलन केल्यावर राज्यभरात हा प्रश्न मार्गी लागला. मात्र, या विमा प्रश्नाबाबत कोणताही पत्रव्यवहार राणेंनी केला नाही. तरी त्याचे श्रेय ते घेत आहेत. देवगड परिसरातील आंबा बागायतदारांचे विम्याचे करोडो रुपये विमा कंपन्यांकडे पडून आहेत. त्याबाबत मात्र राणे अजूनही काही बोलत नाहीत. अवकाळीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी म्हणून २५ मिलिमीटर पावसाची नोंद झालेल्या ठिकाणी आम्ही त्या वेळी प्रयत्न केला आणि त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मंजुरीही मिळाली आहे. मुळात शेतकऱ्यांचे प्रश्न समजून न घेता केवळ श्रेय लाटणे इतकेच काम राणे करीत आहेत. जे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे, ते काम लवकरात लवकर ठेकेदाराला त्रास न होता, मुदतीत कसे होईल हे तरी किमान राणेंनी पाहावे. कणकवली मतदारसंघातील मंजूर झालेल्या धरणांना या सरकारने स्थगिती दिली आहे. जिल्ह्यात जवळपास आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांना या सरकारने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी शिवसेना आंदोलन करेल.’’
-----
चौकट
विमा भरणा करण्याचे आवाहन
आगामी काळातील आंबा, काजू उत्पादनानंतर बागायतदारांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक बागायतदाराने आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन तत्काळ विमा भरणा करावयाचा आहे. जेणेकरून नुकसान झाल्यास विमा कंपन्यांकडून भरपाई घेता येईल, असे आवाहनही सावंत यांनी केले. यंदा प्रत्येक शेतकऱ्याला किमान ३० हजार रुपये विमा रक्कम भरपाईपोटी मिळाली आहे.