चिपळूण ःपरशुराम घाट चौपदरीकरणासाठी बंद ठेवण्याच्या हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ःपरशुराम घाट चौपदरीकरणासाठी बंद ठेवण्याच्या हालचाली
चिपळूण ःपरशुराम घाट चौपदरीकरणासाठी बंद ठेवण्याच्या हालचाली

चिपळूण ःपरशुराम घाट चौपदरीकरणासाठी बंद ठेवण्याच्या हालचाली

sakal_logo
By

६११३३


परशुराम घाट पुन्हा बंद ठेवण्याच्या हालचाली
चौपदरीकरणाचे काम; काम गतीन पूर्ण करण्यासाठी महिनाभराचे नियोजन
चिपळूण, ता. ८ ः परशुराम घाट चौपदरीकरणासाठी पुन्हा एकदा बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गेल्या वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याची घटना घडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास महिनाभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आता पाऊस उघडल्याने या घाटातील चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी घाटातील वाहतूक काही दिवस बंद ठेवण्याचे नियोजन असून अद्याप त्याची तारीख निश्चित झालेली नाही; मात्र तसे नियोजन राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीकडून केले जात आहे.
येथील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम करताना अपघाताच्या घटना घडल्या होत्या. पोकलेनने डोंगरकटाई करताना भरावाखाली येऊन चालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पावसाळ्याच्या कालावधीत दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या. घाटाच्या पायथ्याशी पेढे गाव वसले असून येथील लोकवस्तीस धोका असल्याने ग्रामस्थांचा सातत्याने विरोध सुरू होता. घाटात सरंक्षक भिंत उभारण्यास सुरवात करून वाहतूक सुरू केली होती. दरम्यान, आता पावसाळाही संपला आहे. घाटात अवघड ठिकाणीच चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. घाटात डोंगरकटाई आणि भरावाची कामे करताना प्रवाशांना धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिनाभर परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे. यास राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. घाट केव्हापासून बंद ठेवायचा ते अद्याप निश्चित झालेले नाही; मात्र घाटातील वाहतूक बंद ठेवून चिरणीमार्गे वाहतूक वळवण्याचे नियोजन सुरू आहे.


दोन्ही बाजूस संरक्षक भिंत
सध्याच्या स्थितीला घाटात डोंगरकटाई करतानाच डोंगराच्या बाजूस तत्काळ संरक्षक भिंत उभारली जात आहे. घाटात दोन्ही बाजूस संरक्षक भिंतीचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही दिवसात परशुराम घाटातील वाहतुकीबाबतची घोषणा प्रशासनाकडून होण्याची शक्यता आहे.