नव्या युतीवरून खलबते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या युतीवरून खलबते
नव्या युतीवरून खलबते

नव्या युतीवरून खलबते

sakal_logo
By

(टुडे पान १ साठीमेन)

नव्या युतीवरून खलबते, इच्छुकांची चिंता वाढली

भाजप-शिंदे गट-मनसे एकत्र येण्याची शक्यता ; हक्काची जागा दुसऱ्यासाठी सोडण्याची भिती

चिपळूण, ता. ९ ः भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे आगामी काळात एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार, असे संकेत तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. अर्थात, स्थानिक पातळीवर चर्चा करूनच निर्णय घेणार अशी सावध भूमिका घेतली जात असली तरी तिन्ही पक्षाची युती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यावरून तिन्ही पक्षाच्या इच्छुकांमध्ये खलबते सुरू झाली आहेत. युती झाल्यास आपल्या हक्काचा प्रभाग जाणार, अशी धाकधूक उंमेदवारांमध्ये आहे.
चिपळूण पालिकेत भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सुरवातीचे अडीच वर्ष सत्ता स्थापन केली. नंतरचे अडीच वर्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगेसने अडीच वर्ष सत्ता स्थापन केली. त्यामुळे चारही प्रमुख पक्षांना पालिकेत सत्तेत राहण्याची संधी मिळाली; मात्र शहराचा विकास म्हणावा तसा झाला नाही. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार की नवीन मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी कोणताही पक्ष कोणाबरोबरही युती करू शकतो आणि पालिकेत कोणतेही समीकरण जुळवून येऊ शकतात हे मागील पाच वर्षात स्पष्ट झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होणार हे जवळपास निश्चित आहे. शिवसेनेला सोबत घेण्यावरून चर्चा सुरू आहे. महाविकास आघा़डीतील तिन्ही पक्ष एकत्र आले तरी बंडखोरीची चिंता कायम आहे.
शहरातील शिवसेनेची मोठी फळी शिंदे गटाबरोबर गेली आहे. त्यात काही नगरसेवकांचाही समावेश आहे. काहीजण उघडपणे शिंदे गटात सक्रिय आहेत तर काही निवडणुकीची वाट पाहत आहेत; पण आधीपासूनच बहुतेकांनी आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपसोबत युती झाल्यास बहुतेकांना आपल्या हक्काच्या प्रभागावर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते, ही चिंता आता त्यांना सतावत आहे. याशिवाय मतांचे विभाजन होणार ते वेगळे. शहरात मनसेची ताकद फारशी नाही; मात्र काही भागात मनसेचे पदाधिकारी सक्रिय असल्यामुळे एखाद दुसरी जागा मनसेला द्यावी लागणार आहे. शिवसेना गटाची भाजपसोबत समसमान जागेवर युती झाल्यास शिंदे गटाची मते त्यांना मिळतील; पण पूर्वीच्या अनुभवानुसार शिंदे गटाच्या उमेदवाराला भाजपची मते मिळतीलच, याची शाश्वती नाही. त्यातही ठाकरे गटासोबत थेट लढत होणार असल्याने शिवसेनेचा परंपरागत मतदार विभागला जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान दोन्ही गटातील इच्छुकांचे होणार आहे.

कोट क्र. १
युतीचा फॅार्म्युला अद्याप ठरलेला नाही. पक्षाच्या वरिष्ठांकडून त्याबाबत सूचना येतील. पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मते आजमावली जातील. भाजपने प्रत्येक प्रभागात आपली ताकद वाढवली आहे. त्यामुळे शिंदे गट असो किंवा इतर छोटे पक्ष असो कोणाची किती ताकद कोणत्या प्रभागात आहे, याचा विचार करूनच सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते जागा वाटप करतील.
- आशिष खातू, भाजप शहरप्रमुख

कोट
निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष आणि पक्षाचे इच्छुक उमेदवार करत आहेत; मात्र प्रभाग आरक्षण, नगराध्यक्षपदाचे आरक्षण पडल्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. शहरात काँग्रेसला चांगले वातावरण आहे. दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र आले आणि योग्य जागा वाटप झाल्यावर पालिकेची सत्ता आघाडीला मिळेल.
- अन्वर जबले, उपाध्यक्ष, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग