रत्नागिरी-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त
रत्नागिरी-संक्षिप्त

रत्नागिरी-संक्षिप्त

sakal_logo
By

पान २ साठी, संक्षिप्त)

मच्छीमारांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
रत्नागिरी ः मच्छीमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करताना मच्छीमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तींना तोंड द्यावे लागते. हृदयविकाराचा झटका, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे आदी आपत्तीमध्ये आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दलची शास्त्रीय माहिती मच्छीमारांना असणे गरजेचे आहे. यासाठी रिलायन्स फाउंडेशन, भाट्ये मच्छीमार सेवा सहकारी संस्था भाट्ये आणि नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी यांच्यातर्फे आपत्ती व्यवस्थापनाचा प्रात्यक्षिक व प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाला. यावेळी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, कार्यक्रम सहाय्यक चिन्मय साळवी, नागरी संरक्षण केंद्राचे उपनियंत्रक मिलिंद जाधव, तसेच सहाय्यक उपनियंत्रक उपस्थित होते. मिलिंद जाधव यांनी समुद्रामध्ये मच्छीमारांना हृदयविकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासहित समजावून सांगितल्या तसेच कृत्रिम श्वासोच्छ्‍वास, सीपीआर म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्‍वासाद्वारे दिलासा कसा द्यावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच प्राथमिक उपचार कसे द्यावेत याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी भाट्ये मच्छीमार सहकारी संस्था भाट्येचे सेक्रेटरी अरमान भाटकर यांचे सहकार्य लाभले.

रुग्णवाहिका, कंत्राटी वाहनचालकांचा प्रश्न मार्गी लावणार
रत्नागिरी ः ‘समान काम, समान वेतन’ या न्याय्य तत्वानुसार कंत्राटी वाहनचालकांचे मूळ वेतन १९ हजार ९०० असून ते वाहनचालकांना लागू करण्याबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कंत्राटी वाहनचालकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या भेटीत दिले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिकांवर ६७ कंत्राटी चालक म्हणून गेली १८ वर्षे अखंडित सेवा करत आहेत. या कंत्राटी चालकांना ठेकेदाराकडून १३ हजार ४४८ रुपये इतके मानधन देण्यात येते. किमान वेतन कायद्यानुसार वेळोवेळी वाढ करण्यात येणाऱ्या भत्त्यानुसार चालकांना मानधन अदा करणे सेवा पुरवठादाराला बंधनकारक होते; मात्र या चालकांना किमान वेतन तत्वानुसार मानधन अदा करण्यात येत नाही. किमान वेतनानुसार १९ हजार ९०० इतके मानधन मिळणे आवश्यक आहे. मानधन कमी देण्यात येत असून, तेही वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटी वाहनचालकांचे हाल सुरू आहेत. सणासुदीलाही त्यांना मानधन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत. याबाबत अनेकदा जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये जोरदार चर्चाही झाली आहेत. शिवाय कंत्राटदारालाही तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही त्यांना वेळेवेर मानधन तर मिळतच नाही, शिवाय शासनाच्या किमान वेतनानुसार ते देणे आवश्यक आहे. याबाबत पालकमंत्री सामंत यांची वाहनचालकांनी भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.

साळवी स्टॉप येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती कट्टा
रत्नागिरी ः शहरातील प्रभाग क्र. पाचमध्ये लोकोपयोगी अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या विश्रांती कट्टाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते झाले. सकाळी आणि सायंकाळी चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना विसावा घेण्याकरिता हक्काची अशी जागा साळवी स्टॉप-नाचणे लिंक रस्त्यावर नव्हती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब माजी सरपंच संदीप सावंत यांनी लक्षात आणून दिली आणि ही गैरसोय उद्योजक सौरभ मलुष्टे आणि दीपक पवार यांनी तत्काळ सोडवली. साळवीस्टॉप प्रभाग क्र. ५ मधील साळवी स्टॉप ते नाचणे लिंकरोडदरम्यान ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाले. या वेळी माजी सरपंच सावंत, शिल्पा सुर्वे, सौरभ मलुष्टे, दीपक पवार, पूजा पवार, सुनील चव्हाण यांच्यासह विजय सुर्वे, गणपत साळवी, सावंतदेसाई, शैलेंद्र गोलतकर, सुरेश वरक, रमाकांत काबळे आदी उपस्थित होते.

खेड व्यावसायिक फोटोग्राफर
संघटना अध्यक्षपदी गणेश शिर्के

खेड ः तालुक्यातील व्यावसायिक फोटोग्राफर संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश शिर्के तर सचिवपदी प्रशांत सावंत यांची निवड करण्यात आली. फोटोग्राफर यांच्या सर्वांगीण विकासासाठी नुकतीच नेहा डिजिटल फोटो स्टुडिओ भरणेनाका येथे झालेल्या मीटिंगला उपस्थित राहिलेल्या सदस्यांमधून खेड तालुका व्यावसायिक फोटोग्राफर संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. फोटोग्राफर संघटना खेड संघटनेच्या सल्लागारपदी संदीप कांबळे, अध्यक्ष गणेश शिर्के, उपाध्यक्ष गणेश बुरटे, सचिव प्रशांत सावंत, सहसचिव नवनीत बुरटे, खजिनदार राकेश महाडिक, सहखजिनदार संदेश कडू, सदस्य म्हणून मोतीराम घाणेकर, प्रमोद खेडेकर, योगेश कदम, सुनील तटकरी, कैलास गुडेकर, अमोल कांबळे, सूर्यकांत माने या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली.
---

दोन एक्स्प्रेसना एक स्लीपर श्रेणीचा डबा वाढवला

खेड ः दीपावली सुट्टीचा हंगाम संपुष्टात आल्याने मुंबईहून गावी आलेल्या व गावाहून मुंबईला गेलेल्या प्रवाशांनी परतीची वाट धरली आहे. यामुळे कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. रेल्वेगाड्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आणखी २ एक्सप्रेस गाड्यांना स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी १ अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गांधीधाम-तिरुनेलवेली एक्स्प्रेस ७ व परतीच्या प्रवासात १० नोव्हेंबरला एक अतिरिक्त डब्यांची एक्सप्रेस धावणार आहे. याशिवाय भावनगर-कोचुवेली एक्स्प्रेस ८ व परतीच्या प्रवासात १० नोव्हेंबरला एक अतिरिक्त डब्यांची धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने रविवारी सायंकाळी जाहीर केले आहे.


खेडमध्ये २६ ला संविधान दिन
खेड ः तालुका बौद्ध कर्मचारी संघटना यांच्यावतीने २६ नोव्हेंबरला ''एक संविधान, १३५ करोड भारतीयांचा अभिमान'', या टॅगलाईनखाली संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सी. आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून २६ ला सकाळी ११ ते १ या वेळेत संविधान जनजागृती रॅली शहरातून काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी अल्पोपाहार, १ ते २ या वेळेत संविधान जनजागृतीपर प्रा. प्रदीप मोहिते हे व्याखान देणार आहेत. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.