शिष्यवृत्तीत गुणांकनात रत्नागिरीची भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्तीत गुणांकनात रत्नागिरीची भरारी
शिष्यवृत्तीत गुणांकनात रत्नागिरीची भरारी

शिष्यवृत्तीत गुणांकनात रत्नागिरीची भरारी

sakal_logo
By

शिष्यवृत्तीत गुणांकनात रत्नागिरीची भरारी
पाचवी परीक्षेत जिल्हा पाचवा तर आठवीत सहावा क्रमांक; विशेष कक्षामुळे यश
रत्नागिरी, ता. ९ः राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सहावा क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद जिल्हा गुणवत्ता कक्षाने वर्षभर मुलांवर घेतलेल्या मेहनतीमुळे गतवर्षीपेक्षा गुणांकनात मोठी भरारी घेतली. गतवर्षी पाचवीमध्ये आठवा तर आठवीत १२ वा क्रमांक पटकावला होता.
शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचा राज्याचा निकाल २३.९० टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ३२.१८ टक्के असून राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील ८ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ८ हजार १६४ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. निकालामध्ये २ हजार ६२७ विद्यार्थी पात्र ठरले असून, ५ हजार ५३७ अपात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील आहेत. गतवर्षी पाचवीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा राज्यात आठवा क्रमांक होता. यंदा चांगली कामगिरी केली असून प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याचे दिसत आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीचा राज्याचा निकाल १२.५४ टक्के लागला. राज्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे तर रत्नागिरी जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्ह्यातील ४ हजार १९३ विद्यार्थी बसले होते. त्यातील ४ हजार ८ विद्यार्थी उपस्थित राहिले तर १८५ अनुपस्थित होते. परीक्षा दिलेल्यापैकी ७७८ पात्र ठरले असून ३ हजार २३० विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. जिल्ह्याचा निकाल १९.४१ टक्के लागला आहे. गतवर्षी राज्यात रत्नागिरी बाराव्या स्थानावर होती. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवण्यासाठी शाळांमधून विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले होते. यामध्ये माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाचा सहभाग होता.
दरम्यान, शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्यासह तत्कालीन पदाधिकार्‍यांनी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असला तरी गुणवत्ता यादी १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

चौकट
विशेष वर्ग
शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्षभर त्रिसुत्रींचे विशेष उपक्रम राबवले होते. शिष्यवृत्तीसाठी नोंदलेल्या विद्यार्थ्यांना अन्य उपक्रमात सहभागी केले गेले नव्हते. दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत शिक्षकांनी विशेष वर्ग घेतले. त्यासाठी केंद्रप्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले. दर शनिवारी सराव परीक्षेतून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली गेली.

कोट
पाचव्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी सर्वोच्च आहे. त्यासाठी सीईओ, शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाची त्रिसुत्री राबवण्यात आली. त्याचा फायदा झाला असून गतवर्षीपेक्षा यंदा राज्यातील क्रमांकात वाढ झाली आहे.
- एस. जे. मुरकुटे, उपशिक्षणाधिकारी