जिल्ह्यात ''लेप्टो स्पायरोसिस'' आटोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात ''लेप्टो स्पायरोसिस'' आटोक्यात
जिल्ह्यात ''लेप्टो स्पायरोसिस'' आटोक्यात

जिल्ह्यात ''लेप्टो स्पायरोसिस'' आटोक्यात

sakal_logo
By

जिल्ह्यात ''लेप्टो स्पायरोसिस'' आटोक्यात
डॉ. महेश खलिपे ः दहा महिन्यांत एक रुग्ण, प्रभावी उपाय योजनांचे फलित
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत सुरुवातीपासूनच राबविण्यात आलेल्या प्रभावी उपाय योजनांमुळे लेप्टो स्पायरोसिस या आजारावर नियंत्रण मिळाले आहे. ही साथ जिल्ह्यात आटोक्यात असून गेल्या दहा महिन्यांत केवळ एक रुग्ण लेप्टोचा सापडला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी आज दिली.
जिल्ह्यात भात लावणी व कापणीच्या हंगामात लेप्टोच्या रुग्णांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होते; मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत यावर्षी सुरुवातीपासूनच राबविण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजना आणि जनजागृतीयामुळे जिल्ह्यात लेप्टोची साथ आटोक्यात राहिली आहे. शेतात काम करणाऱ्या सर्व नागरिकांना ‘डॉक्झी सायक्लिन’ या लेप्टो प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप घरोघरी जाऊन केले होते. आता भात कापणीचा हंगाम संपत आला असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे लेप्टोची साथ वाढण्याचा धोका टाळला आहे. तरीही नागरिकांनी चिखलात काम करताना काळजी घ्यावी, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लेप्टो प्रतिबंधक डॉक्झी सायक्लिन गोळ्या घेऊन त्याचे सेवन करावे, असे आवाहन डॉ. खलिपे यांनी केले आहे.
जिल्ह्यात जानेवारीपासून ऑक्टोबरअखेरपर्यंत लेप्टो सदृश केवळ एकच रुग्ण सापडला आहे. तो उपचाराअंती बरा झाला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत लेप्टोच्या प्रतिबंधासाठी सुरुवातीपासूनच प्रभावी उपाय योजना आणि जनजागृती केल्यामुळे तसेच नागरिकांनीही सूचनांचे पालन केल्यामुळे लेप्टोची साथ जिल्ह्यात आटोक्यात आहे, अशी माहिती डॉ. खलिपे यांनी दिली.

चौकट
तालुका निहाय रुग्ण
देवगड तालुका - हिवताप ३, डेंगी १, चिकुनगुण्या १, कणकवली - हिवताप ५, मालवण - हिवताप ४, वैभववाडी - हिवताप १, कुडाळ- हिवताप ८, डेंगी १, चिकुनगुण्या ४, वेंगुर्ले- हिवताप ४, डेंग्यू ८, चिकुनगुण्या ४, सावंतवाडी - हिवताप १३, डेंगी ५३, चिकुनगुण्या १२, दोडामार्ग- हिवताप ८, डेंगी ९४, माकडताप ९, चिकुनगुण्या १, तर इतर ७ रुग्ण डेंगीचे आढळले आहेत.

कोट
जिल्हा हिवताप विभागामार्फत हिवताप, डेंगी, चिकूनगुण्या, माकडताप या आजारांच्या प्रतिबंधासाठी उपाय योजना केल्या जातात. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत हिवतापाचे ४६ रुग्ण, डेंगीचे १६४ रुग्ण, चिकुनगुण्याचे २२ रुग्ण, तर माकडतापाचे (केएफडी) ९ रुग्ण असे मिळून एकूण २४१ रुग्ण सापडले होते. हे सर्व रुग्ण उपचारांती पूर्णपणे बरे झाले असून जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही.
- डॉ. रमेश कर्तसकर, जिल्हा हिवताप अधिकारी