सुधारकांची जीवंतपणी प्रेतयात्रा सोसणारे आगरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारकांची जीवंतपणी प्रेतयात्रा सोसणारे आगरकर
सुधारकांची जीवंतपणी प्रेतयात्रा सोसणारे आगरकर

सुधारकांची जीवंतपणी प्रेतयात्रा सोसणारे आगरकर

sakal_logo
By

इये साहित्याचिये नगरी--लोगो

rat११p१.jpg
L६१६४३
प्रकाश देशपांडे
-rat११p२.jpg ः
L६१६४४
गोपाळ आगरकर
-----------

इंट्रो

आगरकरांनी सतीबंदी, स्त्रियांना शिक्षण, बालविवाह अशा अनेक विषयांवर आपली सुधारक मते व्यक्त केली. समाजातील चालीरीतींची बुद्धिवादाने चिकित्सा करताना अगदी पोषाखांपासून परलोक, चातुर्वर्ण्य, ग्रंथाप्रामाण्य, जातिभेद अशा विषयांवर आपली लेखणी चालवली. निर्मळ मनाने आणि निरोगी वृत्तीने ऐहिक जीवन जगावे हा इहवादी विचार मांडतानाच इहवादी विचारांमधून येणारा भोगवादही नाकारला. अर्थात याचे परिणामही त्यांनी सहन केले. संमतीवयाच्या कायद्यावरून सुधारकांची जीवंतपणी प्रेतयात्रा काढली. दम्याने जर्जर असलेल्या आगरकरांच्या घरासमोर ही प्रेतयात्रा आणून त्यांच्या नावाने शिमगा केला गेला. ‘माळावरचा महारोगी’ अशी बिभत्स भाषेत उद्धार करण्यात आला. आज १२७ वर्षानंतरही स्वराज्य मिळालयं; पण या थोर विचारवंताने म्हटल्याप्रमाणे सामाजिक सुधारणा किती प्रमाणात झाली, याचा विचार करावा लागतोय.
- प्रकाश देशपांडे, चिपळूण
-------------------------------
सुधारकांची जीवंतपणी प्रेतयात्रा सोसणारे आगरकर

डेक्कन कॉलेजमध्ये आगरकरांचे सहाध्यायी होते बाळ गंगाधर टिळक. दोघेही देशप्रेमाने भारलेले. दोघांनीही शिक्षण पूर्ण होताच समाजमन जागृत करण्यासाठी वर्तमानपत्र काढायचे ठरवले. १९८१ ला आगरकरांनी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांची नोकरी स्वीकारली. टिळक आणि आगरकर दोघेही या शाळेत शिक्षक झाले आणि त्याचवर्षी दोघांनी मराठा हे इंग्रजी आणि केसरी हे मराठी वृत्तपत्र सुरू केले. ज्याप्रमाणे शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची पेरणी करायची त्याचप्रमाणे महाविद्यालयातही हे विचार देता यावेत म्हणून २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या शिक्षणसंस्थेच्या फर्ग्युसन महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व पुढे प्राचार्यपदही आगरकरांनी भूषवले.
कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी यांना इंग्रजांनी वेडसर ठरवून तुरुंगात टाकले. या प्रकरणात कोल्हापूरचे दिवाण बर्वे यांच्यावर एक लेख केसरीत लिहिला. यावरून बर्वे यांनी न्यायालयात दावा दाखल केला. शेवटी आगरकर आणि टिळक या दोघांना १०१ दिवसाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. या खटल्यात खूप खर्च झाला. महात्मा फुले यांनी यासाठी १० हजार रुपये मदत म्हणून दिले. या तुरुंगवासावर ‘डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस’ हे पुस्तक आगरकरांनी लिहिले. सामाजिक विषमता, स्त्रियांवर होणारे अन्याय, अंधश्रद्धा याबाबत आगरकरांची मते जहाल होती. ‘जिथे अन्याय, अत्याचार आणि विषमता आहे तिथे स्वराज्य मिळून काय उपयोग? त्यामुळे प्रथम सामाजिक सुधारणा होण्यासाठी चळवळ आणि नंतर राजकीय चळवळ करावी हा आगरकरांचा विचार तर प्रथम इंग्रजांना घालवून स्वराज्य मिळवण्यासाठी राजकीय चळवळीची आवश्यकता आहे,’ हे टिळकांचे मत या वैचारिक संघर्षाचा परिणाम अखेर आगरकरांना केसरी सोडावा लागला. आगरकरांनी स्वमत प्रतिपादनासाठी १५ ऑक्टोबर १८८८ ला सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. सुधारकाच्या शीर्षभागी ‘इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार’ हे ब्रीदवाक्य लिहिले होते. स्वतः आगरकर हे मराठी आवृत्तीचे तर गोपाळकृष्ण गोखले इंग्रजी आवृत्तीचे संपादक होते.
वृत्तपत्र काढणे हे सोपे नव्हते. समाजात शिक्षितांचे प्रमाण अल्प आणि परंपरेविरुद्ध म्हणजे जगावेगळे विचार मांडणारे सुधारक चालवणे कठीणच. पहिल्या वर्षी खर्चवेच वजा जाता ३० रुपये फायदा झाला. म्हणजेच संपादक महोदयांना दरमहा रुपये तीनसुद्धा पगार मिळाला नाही; पण आगरकर खचून जाणारे नव्हते. ते म्हणतात, ‘आपल्या देशातील लोकांत नवीन विचारांची जशी भीती वाटते तशी दुसऱ्या कोणत्याही देशातील लोकांस वाटत नसेल.’
पुणे शहरात एकंदरच सनातनी विचाराच्या लोकांचा पगडा होता. ‘सुधारक’ चालवणे सोपे नव्हते. परंपरेविरुद्ध एखादा विचार व्यक्त व्हायला लागतो त्या वेळी त्याला प्रखर विरोध करणारे त्वेषाने तुटून पडतात. आगरकरांनी ‘बुद्धिप्रमाण्य’ हा विचार ‘बुद्ध्याचे वाण धरिले करी हे सतीचे’, असा दृढ निश्‍चयाने स्वीकारला असल्याने त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले. पुण्यात गाजलेले प्रकरण म्हणजे ‘पंचहौद मिशन चहापान’. गुरुवारपेठेत असलेल्या पंचहौद मिशनमध्ये एका सभेत लोकमान्य टिळक चहा प्यायले यावरून रणकंदन झाले. परंपरावाद्यांनी लोकमान्यांवर बहिष्कार घातला. न्यायमूर्ती रानडे प्रभृती अनेकजण या युद्धात जायबंदी झाले. शेवटी या महापापाचे क्षालन म्हणून प्रायश्‍चित्त घ्यावे लागले.
आगरकरांनी सुधारकमधून परंपरावाद्यांवर प्रहार करायला सुरवात केली. स्वतः आगरकर या चहापानात सहभागी नव्हते; मात्र त्यांनी ब्राह्मणेतरांच्या हातचा चहा पिण्यात आम्हाला दोष वाटत नाही. इतकेच नव्हे तर महार आणि ब्राह्मण एका पंक्तीत बसले तर आम्हास मोठे कृतार्थ वाटेल, असे लिहिले.सुधारणा आधी म्हणणारे आगरकर योग्य होते, असे अनेकदा वाटते.

(समाप्त)