चिपळूण-कोयनेच्या सर्जवेलची होणार तातडीने दुरूस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-कोयनेच्या सर्जवेलची होणार तातडीने दुरूस्ती
चिपळूण-कोयनेच्या सर्जवेलची होणार तातडीने दुरूस्ती

चिपळूण-कोयनेच्या सर्जवेलची होणार तातडीने दुरूस्ती

sakal_logo
By

६१८०४

कोयनेच्या सर्जवेलची होणार दुरुस्ती
२२ कोटींच्या खर्चाला तांत्रिक मान्यता; नवीन वर्षात गळती काढण्याच्या कामाचा मुहूर्त
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः कोयना धरणातून पोफळीतील वीज निर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याची गळती काढण्याच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांनी ‘सकाळ’ला दिली.
कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भुयार निघते या बोगद्याच्या शेवटी एक सर्जवेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल १९६० मध्ये बांधून पूर्ण झाली आहे. डोंगरातील कातळ फोडून ही विहीर बांधलेली असून ती कातळात १०० मीटर खोल खोदलेली आहे. त्याला अर्ध्या मीटर रुंदीचे काँक्रिट अस्तरीकरण केलेले आहे. साठ वर्ष या भिंतीने भूकंपाचे अनेक धक्के पचवलेले आहेत. मात्र आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्ज वेलमधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॅाल्व्ह टनेल म्हणजे आपत्कालीन झडपद्वार भुयार यामध्ये जाते आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडते. या पाण्यामुळ वीज गृहाला जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही नसला तरी गेली पाच वर्ष ही गळती सुरू आहे. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दिवसेंदिवस ही गळती वाढत असल्यामुळे सर्जवेलची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे. ही गळती काढण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने अंदाजपत्रक तयार करून पाठवले होते. मात्र त्याला गती मिळाली नव्हती. ही गळती वाढल्याची वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आली. जलसंपदा विभागाच्या कोयना सिंचन विभागाने तीन वर्षांपूर्वी या कामासाठी २० कोटीचे अंदाजपत्रक तयार केले होते. आज त्याला सरकारकडून मान्यता मिळाली. जीएसटी आणि इतर कर धरून हे काम २२ कोटीपर्यंत जाणार आहे. नोव्हेंबरअखेर या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन डिसेंबर अखेर काम करण्याचे आदेश एजन्सीला दिले जातील. २०२३ या वर्षाच्या सुरुवातीलाच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती डोईफोडे यांनी दिली.

पहिला, दुसरा टप्पा बंद ठेवावा लागणार
सर्जवेलची गळती काढण्यासाठी कोयना प्रकल्पाचा पहिला आणि दुसरा टप्पा बंद ठेवावा लागणार आहे. ऊर्जा खाते आणि महानिर्मिती कंपनीने त्यासाठी परवानगी दिली तर हे दोन्ही टप्पे बंद करून गळती काढण्याचे काम केले जाणार आहे. टप्पा १ आणि २ बंद ठेवून सर्जवेलचा परिसर कोरडा केला जाईल. त्यानंतर झोपाळ्याच्या मदतीने तज्ज्ञ कारागिर सर्जवेलमध्ये पाठवून गळती काढण्याचे काम केले जाईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे काम करण्याचे नियोजन आहे.