मुणगेत आढळला ‘हाऊबरा माळढोक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुणगेत आढळला ‘हाऊबरा माळढोक’
मुणगेत आढळला ‘हाऊबरा माळढोक’

मुणगेत आढळला ‘हाऊबरा माळढोक’

sakal_logo
By

61834
मुणगे ः येथे आढळलेला पक्षी.


मुणगेत आढळला ‘हाऊबरा माळढोक’

परदेशी पक्षी; पायात ‘आबुदाबी’ची निशाणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ ः तालुक्यातील मुणगे येथे ‘हाऊबरा माळढोक’ नावाचा भरकटलेला एक परदेशी पक्षी आढळला. त्याच्या पायात असलेली निशाणी आबुदाबीची असल्याचे निदर्शनास आले. असे पक्षी अभ्यासासाठी सोडले जातात. मुंबई येथील बी.एन.एच.एस. यांच्यामार्फत याची माहिती उपलब्ध झाली असून हा पक्षी पाकिस्तानमधून राजस्थानमध्ये जाणार होता; मात्र, भरकटत तो मुणगे येथे आल्याची माहिती मिळाली.
मुणगे येथील एका ठिकाणी हा पक्षी आढळला. पक्षाची सर्वसाधारण ठेवण आपल्याकडे आढळणाऱ्या पक्षासारखी भासली नसल्याने स्थानिकांना त्याचे कुतुहल वाटले. अधिक पहाणी केली असता पक्षाच्या पायात सांकेतील क्रमांक नोंदवलेली रिंग असल्याचे निदर्शनास आले. त्यावरील सांकेतीक क्रमांक अबुदाबी येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुरूवातीला पक्षाबाबत अधिकच गुढ वाढले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानुसार वनविभागाच्या प्रतिनिधींनी पक्षाला ताब्यात घेऊन कणकवली येथे नेले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत; मात्र, पक्षाच्या पायात आढळलेल्या सांकेतीक क्रमांकाच्या रिंगवरून हा पक्षी अभ्यासासाठी सोडल्याचे तसेच त्यामध्ये काहीही संशयास्पद नसल्याचे समोर आले. समुद्रातील खराब वातावरण तसेच वादळ आणि पावसाच्या कारणामुळे तो भरकटून मुणगेत आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला. याबाबत वन्यजीव अभ्यासक प्रा. नागेश दप्तरदार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘मुणगेत आढळलेला पक्षी कणकवली येथे वनविभागाच्या ताब्यात आहे. पक्षाच्या पायात आढळलेल्या रिंगवरून त्याची अधिक माहिती घेण्यासाठी मुंबई येथील बी.एन.एच.एस. मधील रिंग तपासणी तज्ज्ञ मृगांक प्रभू यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी त्याच्यावरील सांकेतील क्रमांकावरून हा पक्षी आबुदाबी येथील पक्षी संरक्षणातंर्गत प्रजनन केंद्राशी निगडित असल्याचे कळाले. पक्षाबाबत त्यांनी अधिक माहिती घेतली असता अबुदाबीकडून हा पक्षी अभ्यासासाठी पाकिस्तानमध्ये सोडला होता. तेथून तो पक्षी राजस्थानमध्ये स्थलांतरीत होणार होता. मात्र, मार्ग चुकल्यामुळे किंवा खराब वातावरणामुळे तो भरकटत सिंधुदुर्गच्या मुणगे किनारी आला असावा.’’
.....................................
कोट
मुणगे येथे सापडलेल्या पक्षावर कणकवलीत उपचार सुरू आहेत. तो पूर्ण बरा होऊन तरतरीत झाल्यानंतर त्याला प्रशासकीय पातळीवर हालचाली करून राजस्थान हद्दीपर्यंत सोडले जावे असे वनविभागाला सांगतले आहे. त्यामुळे याबाबत लवकरच कार्यवाही होईल. असे पक्षी अभ्यासासाठी नेहमीच सोडले जात असल्याने त्यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही.
- प्रा. नागेश दप्तरदार, मानद वन्यजीव रक्षक, सिंधुदुर्ग