मूर्तिकलेस व्यावसायिक स्वरुप द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूर्तिकलेस व्यावसायिक स्वरुप द्या
मूर्तिकलेस व्यावसायिक स्वरुप द्या

मूर्तिकलेस व्यावसायिक स्वरुप द्या

sakal_logo
By

61870
कुडाळ ः जिल्हास्तरीय इको-फ्रेंडली गणेशमूर्ती प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना युवराज लखमराजे. सोबत प्रमोद जठार, मनीष दळवी, अतुल काळसेकर आदी.
61871
कुडाळ ः विविध प्रकारच्या लक्षवेधी गणेशमूर्ती. (छायाचित्रे ः अजय सावंत)

मूर्तिकलेस व्यावसायिक स्वरुप द्या

मनीष दळवी ः कुडाळमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तींचे वेगळेपण राज्यातच नव्हे तर देशातही प्रसिद्ध आहे. हे वेगळेपण व्यावसायिकतेच्या माध्यमातून पुढे नेण्याची गरज आहे. ही कला टिकवण्यासाठी कुठल्यातरी यंत्रणेच्या पाठबळाची गरज असून यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज गणेशमूर्ती कार्यशाळा प्रदर्शन मेळाव्यात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इको-फ्रेंडली गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत येथील ओंकार डिलक्स हॉल येथे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उद्‍घाटन काल (ता. ११) सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, नीता राणे, गणपत देसाई, समीर सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, अॅड. राजीव कुडाळकर, उदय तावडे आदी उपस्थित होते
दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० हजारहून अधिक गणेशमूर्ती केल्या जातात. यातून सुमारे २०० कोटीची उलाढाल होते. जास्तीत जास्त उलाढाल होण्यासाठी या कलेला व्यावसायिक स्वरुप मिळाले पाहिजे. यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे, असे सांगितले. माजी आमदार जठार यांनी या कलेला राजाश्रयाची गरज व्यक्त केली. गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धा या वेगळ्या विषयाला अनुसरून जिल्हा बँकेने या कलेला व्यवसायाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. या कलेच्या माध्यमातून हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे जतन केले जात आहे. या कलेला एका वेगळ्या उंचीवर नेताना विविध कलांतून जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया, असे ते म्हणाले. लखमराजे यांनी पर्यावरण जपण्याची गरज असल्याचे सांगून भविष्यात पर्यावरणाची जोपासना न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली. गणेशमूर्ती बनविताना वापरण्यात येणारा ऑईलपेंट बदलून त्यासाठी ऑरगॅनिक रंग वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अतुल काळसेकर यांनी गणेशमूर्ती कार्यशाळेचे कौतुक केले. पेणमध्ये ‘पीओपी’चे हब असून तसा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती हब जिल्ह्यात झाला पाहिजे. जिल्ह्यात गणेश शाळांऐवजी गणपतीचा कारखाना झाल्यास व्यावसायिक स्वरूप प्राप्त होईल. जिल्ह्यातील १२० गणेशमूर्तिकार या कार्यशाळेत सहभागी झाले असून हे प्रगतीचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन मालवणकर यांनी आभार मानले.
.................
बॉक्स
बक्षीस वितरण समारंभ आज
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उद्या (ता. १३) सायंकाळी साडेतीनला माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील १२० मूर्तिकारांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना १२० अप्रतिम कलाकृती पाहण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. उद्या अक्षय मेस्त्री (घोडगे), सिध्देश तेली (परुळे) यांना मूर्तिकार प्रात्यक्षिकांसाठी निमंत्रित केले असून गणेशभक्तांना मूर्तीकलेचे प्रात्यक्षिक पाहता येणार आहे.