भाजप-शिंदे गटाने एकत्र ग्रामपंचायती लढवाव्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप-शिंदे गटाने एकत्र
ग्रामपंचायती लढवाव्यात
भाजप-शिंदे गटाने एकत्र ग्रामपंचायती लढवाव्यात

भाजप-शिंदे गटाने एकत्र ग्रामपंचायती लढवाव्यात

sakal_logo
By

भाजप-शिंदे गटाने एकत्र
ग्रामपंचायती लढवाव्यात
केसरकर; वरिष्ठांच्या चर्चेनंतर लवकरच घोषणा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः सिंधुदुर्गातील ग्रामपंचायत निवडणुका भाजप आणि शिंदे गटाने एकत्र मिळूनच लढवाव्यात, असे माझे मत आहे. वरिष्ठ नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.
ते म्हणाले, ‘‘शिंदे गटाचा प्रवक्ता म्हणून मी केलेले काम सर्वांनी पाहिले आहे. यापूर्वी मी शहराला कोट्यवधीचा निधी दिला आहे. शहरात उद्यान, शिल्पग्राम, भाजी मंडई, बॅ. नाथ पै सभागृह आदींसाठी निधी दिला; मात्र त्यानंतर त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देऊनसुद्धा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे काही उपक्रम पुन्हा बंद पडले. मी दिलेल्या निधी त्यांना खर्च न करता आल्याने सर्व निधी परत गेला. त्यामुळे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांनी आलेला निधी खर्च का करू शकलो नाही, याचे आत्मचिंतन करावे आणि नंतरच टीका करावी. साळगावकर निधी खर्च करू शकले नाहीत, हे त्यांचे अपयश आहे. त्यांना नगराध्यक्ष करण्यामागे माझा मोठा वाटा होता. ते अजूनही माझे मित्र आहेत. त्यांच्यावर यापुढे टीका करणार नाही. साळगावकरावर मी कायमच प्रेम केले आहे. त्यांचे चांगले व्हावे, अशी माझी मनापासून इच्छा आहे; मात्र त्यांनी वायफळ टीका करण्यापेक्षा सकारात्मक राहून शहराच्या विकासासाठी काम करावे, असा माझा त्यांना सल्ला आहे.’’
ते म्हणाले, ‘‘मी दोडामार्ग, वेंगुर्ले शहरांसाठी देखील मोठा निधी दिला. दोडामार्गमध्ये रुग्णालय नव्हते, ते आता पूर्णत्वास येत आहे. वेंगुर्लेलासुद्धा पर्यटन शहर म्हणून ओळख दिली जाणार आहे. येत्या काळात वेंगुर्लेचा कायापालट झालेला दिसेल. तेथेही रुग्णालय इमारतीचे काम सुरू आहे. मी गोरगरिबांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे टीकेला उत्तर न देता माझी क्षमता कामातून दाखवून देईन. सावंतवाडीत होणाऱ्या ‘मल्टिस्पेशालिटी’साठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. कबुलायतदार गावकर प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असून तो प्रश्न सुद्धा येत्या काळात सुटून जाईल. आम्ही शिवसेना सोडली नसून शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही जिवंत ठेवली आहे. त्यामुळे मी शिवसेना सोडली असे जर कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे.’’

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी लहान नाही. त्यांना स्थानिक पदाधिकारीच उत्तर देतील.
- दीपक केसरकर, शिक्षण मंत्री