पावशीत बाळूमामांचे आध्यात्मिक केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावशीत बाळूमामांचे आध्यात्मिक केंद्र
पावशीत बाळूमामांचे आध्यात्मिक केंद्र

पावशीत बाळूमामांचे आध्यात्मिक केंद्र

sakal_logo
By

61955
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेते राहुल बोडस, प्रा. बेटावकर, मयुरेश सराफ, मोनिशा तेरसे आदी. (छायाचित्रे ः अजय सावंत)

61956
श्री संत बाळूमामा

पावशीत बाळूमामांचे आध्यात्मिक केंद्र

राहुल बोडस ः पाच मजली इमारतींएवढा पुतळा उभारणार

कुडाळ, ता. १२ ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूरचे श्री संत बाळूमामांचा भव्यदिव्य जागतिक दर्जाचा तळ व आध्यात्मिक केंद्र तालुक्यातील पावशी-मिटक्याचीवाडी येथे साकारत आहे. सुरुवातीला सात हेक्टर क्षेत्रात सुमारे सव्वाशे कोटीचा प्रकल्प तीन ते चार वर्षांत उभा राहणार आहे. श्री संत बाळूमामांचा भव्यदिव्य असा पाच मजली इमारतींएवढ्या उंचीचा भव्य पुतळा मुख्य प्रवेशद्वारावर असणार आहे. प्राण्यांचे हॉस्पिटल, गोशाळा, बारमाही फुलांची बाग, स्पिरिच्युअल थीम पार्क आदी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम असणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत अभिनेते राहुल बोडस यांनी दिली. श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्यावतीने या प्रकल्पाबाबत पावले टाकली आहेत.
आज कोकणामध्ये किंवा आपल्या सिंधुदुर्गात संत बाळूमामांचे लाखो भक्त नित्य-नेमाने आदमापूर दर्शन वारीला जातात व आपले संकट निवारण करतात. सिंधुदुर्ग तसेच लगतच्या गोवा राज्यातील अशा किमान पाच हजारपेक्षा जास्त भक्तांना एकत्र करून श्री संत बाळूमामांच्या भक्तिकार्याचा तसेच सामाजिक कार्याचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प केला जात आहे. अशा सर्व भक्तांच्या सहकार्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री संत बाळूमामांचा तळ अर्थात त्यांच्या अलौकिक अशा भक्तिकार्याची ओळख करून देणारे तसेच आपली संस्कृती व परंपरा जतन करून वारकरी जीवनाचे महत्त्व व ते कसे जगावे, याचे शिक्षण देणारे आणि तरुण पिढीला व्यसनमुक्त करून चांगले आचार व विचार देणारे आध्यात्मिक केंद्र उभारण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. आदमापूर येथील बाळूमामांच्या शेळ्या-मेंढ्यांचा एक कळप (बघा) दरवर्षी पावशी येथील तळावर तीन महिन्यांसाठी आणून भक्तांना सेवाकार्याची संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. आज याबाबत येथील हॉटेल स्पाईस कोकणमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वास्तुशास्त्रज्ञ प्रा. मोहन बेटावकर, आर्किटेक मयुरेश सराफ, मोनिशा तेरसे, श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पंडित, उपाध्यक्ष अजय कदम, रामदास तेंडोलकर यांच्यासह संत बाळूमामांचे भक्त उपस्थित होते.
आर्किटेक सराफ यांनी संत बाळूमामा यांचा भव्य पुतळा ‘जीआरसी’मध्ये असेल. हा पुतळा तयार होण्यासाठी ९ ते १० महिने लागणार असल्याचे स्पष्ट केले. तेरसे यांनी कोकणातील संस्कृती पुढे नेण्यासाठी हा जागतिक पातळीचा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्पष्ट केले. वास्तुशास्त्रज्ञ प्रा. बेटावकर यांनी हा प्रकल्प साकारण्यासाठी व जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. प्रतिष्ठानचे रामदास तेंडोलकर यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली.
--
61954
सध्या ७ हेक्टर जागा
अभिनेते गोडस म्हणाले, ‘‘पावशी-मिटक्याचीवाडी या निसर्गरम्य ठिकाणी जागा पाहिल्यानंतर या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्याचे सुचले. जागतिक पातळीचा प्रकल्प होण्यासाठी २८ हेक्टर जागेची गरज आहे. सध्या ७ हेक्टर जागा मिळाली आहे. त्यानुसार तीन टप्प्यांत हा प्रकल्प असणार आहे. माणसाच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक दूरदृष्टीकोन ठेवून वाटचाल करण्यासाठी हा जागतिक पातळीवरचा प्रकल्प असणार आहे. स्पिरिच्युअल थीम पार्क, बाळूमामांचा भव्य पुतळा व शेळ्या-मेंढ्या असणार आहेत. तळ्याच्या भागाचा वापर कृत्रिम तलाव म्हणून करण्यात येणार आहे. फुलांची बारमाही बाग असून या बागेतील फुले बाळूमामांसाठी असणार आहेत. नारळ, पेढे असे काही असणार नाही.
--
असा असेल प्रकल्प
या भव्य प्रकल्पात पक्षांच्या जतनासह दुर्मिळ वनस्पतींची लागवड केली जाणार आहे. सात हेक्टर जागेत पहिल्या टप्प्यात सव्वाशे कोटीचा प्रकल्प होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागेल. गोशाळा, प्राण्यांचे हॉस्पिटलसह विविध उपक्रम असणार आहेत. हे सर्व उपक्रम समाजाला उपयुक्त असे असतील. एकूणच २८ एकर जागेची या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यानुसार हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे, असे गोडस म्हणाले.