रत्नागिरी-पोलिस ठाण्याच्या आवारातून चोरट्याचे पलायन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पोलिस ठाण्याच्या आवारातून चोरट्याचे पलायन
रत्नागिरी-पोलिस ठाण्याच्या आवारातून चोरट्याचे पलायन

रत्नागिरी-पोलिस ठाण्याच्या आवारातून चोरट्याचे पलायन

sakal_logo
By

रत्नागिरी पोलिस ठाण्याच्या
आवारातून चोरट्याचे पलायन?

रेल्वेमध्ये सराईताच्या मोबाईल चोऱ्या; दोन्ही यंत्रणांची धावाधाव

रत्नागिरी, ता. १२ : शहर पोलिस ठाण्याच्या आवारातून एका चोरट्याने पलायन केल्याची घटना घडली आहे. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी करणारा हा सराईत चोरटा आहे. विशेष म्हणजे या चोरट्याबाबत रेल्वे पोलिस किंवा शहर पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत अटक किंवा ताब्यात दाखविल्याची नोंद नाही. कारण, गुन्हा दाखल होण्याआधीच त्याने दोन्ही पोलिसांच्या हातावर तुरी दिली. पोलिस त्याच्या मागावर आहेत. मात्र, याबाबत दोन्ही पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
कोकण रेल्वेमध्ये मोबाईल चोरी करणारा हा सराईत आहे. तो मुळचा सोलापूरचा आहे. यापूर्वी देखील त्याला शहर पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी पकडले आहे. रेल्वेतील चार्जिंगला लावलेले किंवा खिशातील मोबाईल चोरण्यात तो माहीर आहे. एकाच मार्गावरील रेल्वेची दोन ते चार तिकिटे तो काढायच्या. त्या तिकिटाच्या आरक्षणाप्रमाणे त्या-त्या डब्यामध्ये जाऊन हात की सफाई साधायचा. चोरलेले मोबाईल मुंबईत जाऊन विकायचे आणि त्या पैशांवर मौजमजा करायची, असा त्याचा खाक्या. रेल्वे पोलिस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. आज पहाटे रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला. त्याला पकडून रेल्वे पोलिस सकाळीच गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यासाठी शहर पोलिस ठाणे परिसरात आले होते. बराच अवधी गेला तरी अटकेची प्रक्रिया झाली नव्हती.
या दरम्यान, हा चोरटा नैसर्गिक विधीला जातो सांगून शौचालयात गेला आणि तेथील खिडकीतून पलायन केल्याचे समजते. या घटनेने रेल्वे आणि शहर पोलिसांची झोप उडाली आहे. दोन्ही पोलिस यंत्रणेकडे गोडसे अधिकृतपणे ताब्यात असल्याची नोंद झाली नसली, तरी एका सराईत चोरट्याने पोलिस ठाण्याच्या आवारातून पलायन केले आहे, ही बाब दोन्ही यंत्रणांना भूषणावह नाही. संशयिताने पोबारा केल्यानंतर आता यंत्रणा त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली असून, कसून तपासणी व चौकशी सुरू ठेवल्याचे समजते. मात्र, दोन्ही यंत्रणांकडून कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना देण्यात आली नाही.