रत्नागिरी-ढगाळ वातावरणाच्या शक्यतेने बागायतदार धास्तावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-ढगाळ वातावरणाच्या शक्यतेने बागायतदार धास्तावले
रत्नागिरी-ढगाळ वातावरणाच्या शक्यतेने बागायतदार धास्तावले

रत्नागिरी-ढगाळ वातावरणाच्या शक्यतेने बागायतदार धास्तावले

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat१३p१०.jpg-KOP२२L६२०६० रत्नागिरी ः आंबा कलमांना पालवी आणि मोहोर एकत्र दिसून येत आहे.
-rat१३p१३.jpg- KOP२२L६२०९८ रत्नागिरी ः कलमांना मोठ्या प्रमाणात पालवी दिसून येत आहे.
-----------

ढगाळ वातावरणाच्या शक्यतेने बागायतदार धास्तावले
तुडतुड्याची भिती ; फवारणीचा खर्च वाढणार, किमान तापमानात वाढीने चिंता
रत्नागिरी, ता. १३ ः गेले दोन दिवस मतलई वारे वाहू लागले असले तरीही हवामान विभागाने पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तविल्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत. याचा परिणाम आंब्यावर तुडतुड्याचा अटॅक होऊ शकतो. यंदा दिवाळीत थंडीचे आगमन झाले, पण त्यात सातत्य नाही. गेले दोन दिवस किमान तापमानात चार ते पाच अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेली पालवी जुन कधी होणार हा प्रश्‍न बागायतदारांपुढे आहे. वातावरणाची साथ मिळाली नाही तर हंगाम पंधरा दिवस पुढे जाईल.
नैॠत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे १४ ते १५ या कालावधीत कोकणात आकाश ढगाळ राहून रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ ते ३४ आणि किमान तापमान २० ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील असा अंदाज कोकण कृषी विद्यापिठाकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे गेले चार दिवस १३ ते १५ अंशावर स्थिरावलेले किमान तापमान रविवारी (ता. १३) २० अंशावर गेल्याने याचा परिणाम हापूसच्या कलमांवर होणार आहे. मागील आठवड्यात किमान तापमान दापोलीत १३.२ अंशापर्यंत खाली आले होते. बदलत्या वातावरणामुळे पारा २० अंशापर्यंतवर येऊ शकतो. बदलत्या वातावरणाचा परिणाम निश्‍चित आंबा पिकावर होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा बागेत कोवळ्या पालवीवर मिज माशी तसेच शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. शेंडे पोखरणारी अळी पालवीच्या दांड्याला छिद्र पाडून आत शिरते आणि आतील भाग पोखरुन खाते. परिणामी किडग्रस्त फांदी सुकून जाते. प्रादुर्भित भागात अळीची विष्ठा व मृतपेशी आत राहिल्यामुळे फांद्यांवर गाठी निर्माण होतात. तशी परिस्थिती निर्माण झाल्यास बागायतदारांना किटकनाशकांची फवारणी करावी असा सल्ला कृषी विद्यापिठाने दिला आहे. पालवी अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुडा दिसू शकतो. आंबा बागेत जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी छाटणी केलेल्या झाडाचे खोडकिडीपासून संरक्षण करण्याचे आव्हान बागायतदारांपुढे आहे.
बदलत्या वातावरणाचा परिणाम दरवर्षी आंबा हंगामावर होतो. यंदाही दिवाळीच्या आरंभी थंडीला सुरवात झाली होती; मात्र पुढे सातत्य न राहिल्यामुळे नोव्हेंबरच्या सुरवातीला कलमांना मोहोर येणे अपेक्षित होते. यंदा सर्वाधिक झाडांना पालवी आलेली आहे. हे चित्र प्रथमच दिसत आहे. परिणामी हंगामाचे गणित आताच सांगणे अशक्य असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जात आहे. पालवी आलेल्या झाडांना मोहार येणार, त्यानंतर पुढे कणी तयार होणार यामध्ये पंधरा दिवस हंगाम लांबू शकतो. यापुढे २५ टक्के थंडीत वाढ झाली तर १५ डिसेंबरपर्यंत हंगामाचे चित्र स्पष्ट होईल. बागायतदारांच्या सुदैवाने शनिवारपासून (ता. १२) मतलई वारे वाहू लागले आहेत. पुढे थंडी वाढली तर चार ते पाच आठवड्यात पालवी जून होईल. मात्र हवामान ढगाळ राहीले तर बागायतदारांना फवारणीचा खर्च करावा लागेल.
-------------
कोट
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिण कोकणात हलका पावसाची शक्यता वर्तविली आहे. उत्तर कोकणात पडेल असे नाही; मात्र दक्षिणेकडे पाऊस पडला तरीही त्याचा परिणाम उत्तरेतील भागात होऊ शकतो. त्यामुळे पालवीसह मोहोर आलेल्या आंब्याच्या झाडांवर रोगराई पसरु शकते.
- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार
----------
चौकट
गेल्या पाच दिवसातील किमान तापमान
तारीख तापमान
९ नोव्हेंबर- १५.६
१० नोव्हेंबर- १४.३
११ नोव्हेंबर १३.२
१२ नोव्हेंबर २०.०
१३ नोव्हेंबर २०.०
------
पुढील तीन दिवसातील किमान तापमानाचा अंदाज
१४ नोव्हेंबर- २१.०
१५ नोव्हेंबर- २३.०
१६ नोव्हेंबर- २१.०