गुहागर-पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर-पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी
गुहागर-पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी

गुहागर-पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१३p१७.jpg- KOP२२L६२१३५ गुहागर ः पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतीप्रित्यर्थ आयोजित संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेच्या समारोपाला उपस्थित मान्यवर.
--------------

पं. गोविंदरावांची रंगभूमी सुसज्ज व्हावी
मुकुंद मराठे ; २०२४ मध्ये संगीत नाटकांच्या स्पर्धा घ्या
गुहागर, ता. १३ : या रंगभूमीला रंगदेवतेचा आशीर्वाद आहे. गोविंदरावांची कर्मभूमी असलेली रंगभूमी सर्व प्रकारच्या नाटकांचे सादरीकरण करण्यासाठी सुसज्ज व्हावी, असे प्रतिपादन गायक अभिनेते मुकुंद मराठे यांनी केले. श्री देव कोपरी नारायण देवस्थान आयोजित संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते.
मुकुंद मराठे म्हणाले, कोकणात आजही संगीत नाटक जीवंत आहे. हे आजच्या स्पर्धेने दाखवून दिले आहे. गोविंदराव म्हणतील की कोकणाने माझं संगीत नाटक जीवंत ठेवलयं. इतके अनुभवसंपन्न संगीत नाटक कलाकार या कोकणात आहेत. एकापेक्षा एक गायक गायिका इथे तयार होत आहेत. पं. गोविंदरावांच्या स्मरणार्थ ऑर्गन व हार्मोनियम वादनाच्या स्पर्धा घ्याव्यात.
अनेकांचे कुलदैवत गुहागरात आहे. तसेच आमचे सांगितिक कुलदैवत गुहागरात आहे. ४ जानेवारी २०२३ पासून विद्याधर गोखले यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. ऑक्टोबर २०२३ पासून पं. राम मराठे, एप्रिल २०२३ पासून पंडीत कुमार गंधर्व आणि सप्टेंबर २०२४ पासून गोविंदराव पटवर्धन यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. २०२४ मधील काही काळ या सर्वांच्या जन्मशताब्दीचा एकत्रित आहे. या निमित्ताने या ठिकाणी प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था आदींनी सुसज्ज असं थिएटर व्हावे. त्यासाठी आवश्यक सहकार्य आम्ही निश्चित करू. त्यावर्षी कार्तिकोत्सवात देवस्थानने संगीत नाट्यमहोत्सव भरवावा.
ज्ञानेश पेंढारकर म्हणाले, कोपरी नारायण देवस्थानच्या पंचांनी एकजुटीने व एकदिलाने उत्कृष्ठ नियोजनातून ही स्पर्धा आयोजित केली. त्याला संगीत नाट्यकलाकारांनी, संस्थांनी साथ दिली. हे कौतुकास्पद आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या आयोजकांनी ही बाब लक्षात घ्यावी. राज्य नाट्य स्पर्धेची तुलना या स्पर्धेशी करता येणार नाही. तरीही काही गोष्टींचा विचार केला तर या स्पर्धेने बाजी मारली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे म्हणाले, या रंगभूमीच्या उभारणीत गोविंदरावांचा मोठा वाटा आहे. या रंगभूमीला रंगदेवतेचा आशीर्वाद असल्याने कोणताच नाट्यप्रयोग पडत नाही. याचा अनुभव २३ वर्षे मी स्वत: घेतला आहे. येथे सुसज्ज रंगमंच व्हावा यासाठी दुर्गादेवी देवस्थान तनमनधनपूर्वक मदत करेल.