निसर्गसौंदर्य राखून विकास साधावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गसौंदर्य राखून विकास साधावा
निसर्गसौंदर्य राखून विकास साधावा

निसर्गसौंदर्य राखून विकास साधावा

sakal_logo
By

62162
देवगड ः येथे प्रसाद गावडे यांचे स्वागत करताना नगराध्यक्षा साक्षी प्रभू. शेजारी निशिकांत साटम. (छायाचित्र ः वैभव केळकर)

निसर्गसौंदर्य राखून विकास साधावा

प्रसाद गावडे ः देवगडमध्ये पर्यटन वाढीसाठी कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ ः जुन्या पिढीने जपलेले कोकणचे निसर्गसौंदर्य अबाधित राखून पर्यटन विकास साधला पाहिजे. आपली जीवनशैली, चालिरीती, रूढी परंपरा आणि संस्कृतीची ठेवण जपल्यास आपोआप पर्यटनवृद्धी होईल, असा विश्‍वास पर्यटन अभ्यासक प्रसाद गावडे यांनी येथे व्यक्त केला. यासाठी आपल्या भागाची स्वतः ओळख करून घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समितीतर्फे स्थानिक पर्यटन वाढीसाठी आयोजित कार्यक्रमावेळी प्रसाद गावडे बोलत होते. मंचावर जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव नितीन वाळके, निशिकांत साटम, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष शैलेश कदम, महिला व्यापारी तालुकाध्यक्षा प्रियांका साळसकर, समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे, सचिव अजित टाककर आदी उपस्थित होते. समितीच्यावतीने प्रसाद गावडे यांचे नगराध्यक्षांनी स्वागत केले. श्री. गावडे म्हणाले, ‘‘प्रचंड नैसर्गिक साधन संपत्ती असलेला आपला भाग आहे. जुन्या मंडळीनी कोकणचे वेगळेपण अबाधित राखले. निसर्ग समजून घेतला तर जगण्यातील समाधान मिळेल. आपल्या संस्कृतीची माहिती करून घेऊन आनंद घेतला पाहिजे. शाश्‍वत जीवनशैली म्हणजे मुळ व्यवसाय, उद्योग सांभाळून पर्यटन विकास. येणार्‍या पर्यटकांची आवड अभ्यासली पाहिजे. येथील निसर्गसौंदर्यामुळे कोरोना काळातही कोकणला फारशी अडचण जाणवली नाही. आपली निसर्ग संपत्ती जपत गुणवत्तापूर्वक काम झाले पाहिजे.’’
वाळके यांनी, केवळ पैसा मिळवणे म्हणजे विकास नसून विकास शाश्‍वत झाला पाहिजे. बदललेल्या मानसिकतेचा वेध घेत विकास साधला पाहिजे. यासाठी स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आपल्या कामातून समाधान मिळाले पाहिजे, असे सांगितले. साटम यांनी, पर्यटन समजून घेऊन त्याची सुरूवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. व्यावसायिक एकमेकांशी जोडले गेले असले पाहिजेत. संघटनेतून सर्वच प्रश्‍न सुटणार नसले तरी दबाब म्हणून एकत्र असले पाहिजे असे सांगितले. नलावडे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुबल यांनी सूत्रसंचालन केले. कदम यांनी आभार मानले.
...........
चौकट
निकाल असा
पर्यटन स्थळांबाबत छायाचित्र आणि व्हिडीओ स्पर्धा घेण्यात आली होती. यातील छायाचित्र स्पर्धेमध्ये अनुक्रमे श्रावणी जोईल, ओंकार बांदकर, किरण पांचाळ पाहिले तीन आले. तर व्हिडीओ स्पर्धेत अनुक्रमे, संकेत जोईल, रूपेश शिंदे, महेंद्र चव्हाण पहिले तीन आले. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.