खेड-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-संक्षिप्त पट्टा
खेड-संक्षिप्त पट्टा

खेड-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

खेडच्या स्मशानभूमी परिसरात मद्यपींचा अड्डा
खेड: शहरातील जगबुडी नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीचा परिसर मद्यपींचा अड्डाच बनत चालला आहे. दिवसाढवळ्या व सायंकाळच्या सुमारास याठिकाणी मद्यपींचा वावर दिसून येत असून परिसरात मद्यांच्या बाटल्यांचा खचदेखील आहे. नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने मद्यपींचे फावत चालले आहे. स्मशानभूमीच्या परिसरात मद्यपी मद्यांच्या बाटल्या फोडत असल्याने ये-जा करताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः सुट्टीच्या दिवशी दिवसभर मद्यपींचा याठिकाणी वावर असतो. स्मशानभूमीसमोरच असलेल्या वृक्षांच्या सावलीखाली मद्यपी मनसोक्तपणे मद्य रिचवताना दिसतात. दिवसाढवळ्या मद्यपींचा याठिकाणी वावर सुरू असतानाही पालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरपालिकेने ही बाब गंभीरपणे घेवून स्मशानभूमी परिसरात मद्यपींचा राजरोसपणे सुरू असलेला वावर रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
---------

आंबयेत परप्रांतीय फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई
खेड ः तालुक्यातील आंबये ग्रामपंचायतीने कार्यक्षेत्रात फिरणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. तसे फलकही ठिकठिकाणी लावले ग्रामस्थांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात साहित्य विक्रीसाठी येणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे काही ठिकाणी अनुचित प्रकार घडत आहेत. अनेक ठिकाणी परप्रांतीय व्यक्तींकडून चोऱ्याही होत असल्याचे समोर आले आहे. यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आंबये ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात परप्रांतीय फेरीवाले फिरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
-------
कान्हेरेंच्या पुतळयासमोर
फळविक्रेत्याचे अतिक्रमण
खेड ः शहरातील तीन बत्ती नाका येथे क्रांतिकारी हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या पुतळ्यानजीक फळ विक्रेत्याने अतिक्रमण केले असून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आक्रमक झाले आहेत. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून फळगाडीवाल्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित विक्रेत्याला वारंवार सांगूनही तो जागा बदलण्यास तयार नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.