चिपळूण-डिव्हाईन कंपनीत स्फोट, आठ कामगार होरपळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire
चिपळूण-डिव्हाईन कंपनीत स्फोट, आठ कामगार होरपळले

चिपळूण-डिव्हाईन कंपनीत स्फोट, आठ कामगार होरपळले

खेड : लोटे (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील डिव्हाईन केमिकल कंपनीत रविवारी (ता. १३) सकाळी साडेदहा वाजता मोठा स्फोट झाला. यामध्ये कंपनीतील आठ कामगार होरपळले असून, गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सुरुवातीला उपचारासाठी चिपळूणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबईत हलवण्यात आले आहे. कंपनीतील सॉलवंट केमिकलने पेट घेतल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लोटे एमआयडीसीमध्ये डिव्हाईन केमिकल ही रासायनिक कंपनी २००७ पासून कार्यरत आहे. कंपनीत आज सकाळी वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंगचे काम सुरू असताना आगीची ठिणगी रसायन भरलेल्या ड्रममध्ये पडली आणि त्यामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

कंपनीतील ड्रममध्ये सॉलवंट केमिकल भरलेले होते. हे ड्रम सलग रांगेत लावून ठेवले होते. यातील सात फुटले आणि सात कामगार जखमी झाले. स्फोटाचा आवाज येताच कंपनीतील कामगारांची धावाधाव सुरू झाली. बाकीच्या रसायन भरलेल्या ड्रममध्ये स्फोट होऊ नये म्हणून कामगारांनी शर्थीचे प्रयत्न केले. रात्रपाळीचे कामगार ड्युटी संपवून सकाळी घरी जातात आणि सकाळी नऊनंतर कामगारांची पहिली शिफ्ट सुरू होते. याचदरम्यान हा अपघात झाला. अपघातामध्ये सतीशचंद मुकुंदचंद मोर्या, दिलीप दत्ताराम शिंदे, विनय मोर्या, दीपक गंगाराम महाडिक, मयूर खाके, आदिश मोर्या, संदीप गुप्ता, बिपिन मंदार हे आठ कामगार गंभीरित्या भाजले आहेत. यातील सतीशचंद मोर्या, दिलीप शिंदे, विनय मोर्या, दीपक महाडिक व मयूर खाके यांना चिपळुणातील एका हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

यातील विनय मोर्या व दिलीप शिंदे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने या दोघांना ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. जखमी झालेल्यांमधील आदिश मोर्या, बिपीन मंदार आणि संदीप गुप्ता या तिघांना प्रथम चिपळूणमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तिघेही होरपळले असल्याने ऐरोली बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लोटे पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता अरविंद पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंपनीतील कामगार व ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न केले.

आम्ही कंपनी चालवताना कामगारांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देतो. परंतु, हा अपघात आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे. कामगारांचे जीव वाचवण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी लागणारा सर्व खर्च कंपनी उचलणार आहे. जखमी कामगारांना चांगल्या दर्जाचे उपचार व्हावे यासाठी आम्ही त्यांना मुंबईत शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
- आर. के. मोर्या, संचालक, डिव्हाईन केमिकल, लोटे

प्रदूषणच्या अधिकाऱ्यांबद्दल संताप

लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये एखादी दुर्घटना घडली तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वेळेवर घटनास्थळी पोहोचत नाहीत. अशी तक्रार ग्रामस्थांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. याची प्रचिती आज पुन्हा आली. डिव्हाईन केमिकल कंपनी स्फोट झाल्यानंतर पोलिस अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी व ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेकडे पाठ फिरवली. ग्रामस्थ अधिकाऱ्यांना फोन करत असताना ग्रामस्थांचे फोनही अधिकाऱ्यांनी घेतले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अधिकाऱ्यांबद्दल तीव्र संताप होता.