मळगाव घाटीत बसवणार अखेर ‘सीसीटीव्ही’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगाव घाटीत बसवणार अखेर ‘सीसीटीव्ही’
मळगाव घाटीत बसवणार अखेर ‘सीसीटीव्ही’

मळगाव घाटीत बसवणार अखेर ‘सीसीटीव्ही’

sakal_logo
By

सकाळ इम्पॅक्ट लोगो
---

मळगाव घाटीत बसवणार अखेर ‘सीसीटीव्ही’

वन व्यवस्थापन समिती; कचरा टाकणाऱ्यांवर आता ‘वॉच’, सरपंचांकडून निर्णयाला दुजोरा


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः मळगाव घाटीत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईसाठी सोलर सिस्टीमवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय संयुक्त वन व्यवस्थापन समितीने घेतला आहे. याबाबत लवकरच अंमलबजावणी होणार आहे. या गंभीर प्रश्नाकडे दैनिक ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. त्यानंतर आज घाटीत कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मळगाव सरपंच स्नेहल जामदार यांनी या निर्णयाला दुजोरा दिला.
सावंतवाडी-रेडी मार्गावरी मळगाव घाट हा सद्यस्थितीत अक्षरशः कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड बनत चालला आहे. या घाटीत काही बेजबाबदार नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. या घाटातून धबधबा देखील वाहतो. मात्र, या सर्व सौंदर्याला नागरिकांकडून टाकण्यात आलेला कचरा बाधा ठरत आहे. या कचऱ्यामुळे घाटीत दुर्गंधी पसरली असून वाहनचालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे ''सकाळ''ने ''मळगाव घाटी बनली डंपिंग ग्राऊंड'' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याबाबत वन समितीच्या बैठक झाली. या बैठकित दैनिक ''सकाळ''च्या वृत्ताची मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समिती दखल घेतली आहे. घाटीत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी समितीने ठोस पाऊले उचलली असून सोलर सिस्टीमवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय या समितीने घेतला आहे. येत्या काही दिवसात त्याची अंमलबजावणी होणार आहे. मळगाव घाटीत हे सोलार सीसीकॅमेरे बसवण्यात येणार असून कचरा फेकणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. चालत्या गाडीवरून कचर्‍याच्या पिशव्या फेकणाऱ्या वाहनांचा नंबर कॅमेरात कैद झाल्यावर त्याआधारे संबंधीतांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे संबंधीताकडून संपूर्ण परिसराची साफसफाई करून घेतली जाईल.
आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असून नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे जिल्ह्याचे नागरीक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी असते. परंतु, सामाजीक बांधीलकी विसरून स्वत:च्या घरातील कचरा सौंदर्याने नटलेल्या निसर्गाच्या ठिकाणी टाकून परीसर विदृप करण्याचे काम काही समाजकंटकांकडून होताना दिसत आहे. या समस्येवर वन समितीच्या मिटींगमध्ये सदस्य गजानन सातार्डेकर यांनी गांभिर्याने लक्ष वेधले. तसेच त्यावर तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा तथा सरपंच स्नेहल जामदार यांनी दिली. यावेळी उपसरपंच हनूमंत पेडणेकर, सदस्य गजानन सातार्डेकर, गुरूनाथ गावकर, अशोक बुगडे, वन अधिकारी व कर्मचारी राणे, नानगीरे, वाघमारे उपस्थीत होते.
------------
कोट
मळगांव घाटीत दोन-चार दिवसात कचरा टाकताना पकडलेल्यांकडून टाकलेल्या कचऱ्यासोबत आजुबाजूचीही सफाई करून घेतली आहे. त्यामुळे भविष्यात कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे धोरण समितीने आखले असून हे प्रकार थांबतील, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. घरातील कचरा मळगाव घाटीत फेकणाऱ्यांनी हे प्रकार थांबवावेत.
- स्नेहल जामदार, सरपंच, मळगाव तथा समिती अध्यक्ष, वन व्यवस्थापन