सागरी जीवसंशोधन प्रासंगिक लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सागरी जीवसंशोधन प्रासंगिक लेख
सागरी जीवसंशोधन प्रासंगिक लेख

सागरी जीवसंशोधन प्रासंगिक लेख

sakal_logo
By

(टुडे पान ३ साठी, प्रासंगिक लेख)

फोटो ओळी
-rat१४p३.jpg ः
६२२१६
गिरगाव चौपाटीवरील ऑक्टोपस, कोरल्स, गाजर अॅनिमोन.

संशोधन, संवर्धन करणारे मरिन लाईफ ऑफ मुंबई

इंट्रो
आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आणि सहयोगी संस्था किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी आणि विवा अनटेम्ड अर्थ यांच्यासह समुद्र या विषयावर तीन दिवसांचा महोत्सव जानेवारीत होणार आहे. कोकणाला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याचे संवर्धन होण्याकरिता व अभ्यास करण्याकरिता यातून प्रयत्न होणार आहेत. रत्नागिरीतील आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनच्या तज्ञ समितीचे सभासद प्रदीप पाताडे यांनी ''मरिन लाईफ ऑफ मुंबई'' ही मोहीम दहा वर्षांपूर्वी सुरू केली याविषयी..

- प्रतिनिधी


सुरवातीला केवळ ''भटकंती'' म्हणून सुरू केलेल्या ''मरिन लाईफ ऑफ मुंबई'' या लोकचळवळीने आता सागरी जीव संशोधनक्षेत्रात मोहिमेचे रूप धारण केले आहे. सागरी परिसंस्थेतील प्रत्येक घटकाशी हळूहळू ओळख निर्माण झाली. पाताडे यांनी २००९ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन वॉटरस्पोर्ट्स प्रशिक्षण आणि सोबतच किनाऱ्यावर जीवरक्षक म्हणूनही काम केले. २०१३ मध्ये गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आलेल्या गणेशभक्तांना ''स्टिंग-रे'' या सागरी जीवाचा दंश झाला. पाताडे त्या वेळी किनाऱ्यावरच होते. लोक वेदनेने कळवळत होते; मात्र, त्या वेळी कोणालाच या दंशावरील प्रथमोपचार माहित नव्हते. पाताडेंनी लगेच सागरी जीवतज्ज्ञांशी संपर्क साधला; मात्र, या जीवाच्या दंशावर कोणते उपाय करावे याची त्या तज्ज्ञांनाही कल्पना नव्हती. पाताडे सांगतात, “ही घटना मला सागरी जीवांच्या निरीक्षणाचे काम करण्यास कारणीभूत ठरली.” त्यानंतर त्यांनी किनाऱ्यांवरील छोट्या दुर्लक्षित सागरी जीवांच्या निरीक्षणाचे काम सुरू केले. मात्र, त्यांना कोणतीच शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती तसेच त्यांनी हे काम आणि त्याच्या भविष्यासंबंधी कोणताच विचार केला नव्हता.
गळ्यात कॅमेरा अडकवून ते किनारा फिरायला लागले. त्या ठिकाणी दिसणाऱ्या प्रत्येक सूक्ष्मजीवांचा अधिवास आणि त्याची शारीरिक रचना याचे निरीक्षण करून त्याचे छायाचित्र टिपू लागले. फेसबुकवरून ''मरिन लाईफ ऑफ मुंबई'' या शीर्षकाखाली फोटो व जीवाची माहितीही टाकण्यास सुरवात केली. त्याकरिता सागरी जीवशास्त्रज्ञ अभिषेक जमालाबाद आणि सिद्धार्थ चक्रवर्ती यांची मदत मिळाली.
''मरिन लाईफ ऑफ मुंबई''चा पाया रचला गेल्यानंतर त्याचा डोलारा उभा करण्याची कसरत या तिघांना करावी लागली; मात्र, या तिघांच्या सहा हातांना अनेक हात जोडू लागले. सागरी विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मंडळींमध्येही या मोहिमेविषयी आकर्षण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच जनसामान्य आणि वन्यप्रेमींमध्ये निर्माण झालेले हे आकर्षण शमवण्याचे काम ''मरिन वॉक'' या उपक्रमाने केले. आपण एकटेच किनारा फिरून या जीवांना पाहतो, त्याची माहिती गोळा करतो. याउलट सगळ्यांसमवेत आपण मुंबईचे किनारे फिरलो तर लोकांना या जीवांनाही पाहता येईल आणि आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या विषयाचे प्रबोधनही होईल, या हेतूने ''मरिन लाईफ ऑफ मुंबई''ने ''मरिन वॉक'' उपक्रमाला सुरवात केली.
आज लोकांमध्ये जंगलात फिरण्याइतकेच ''मरिन वॉक''चे आकर्षण निर्माण झाले आहे. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतो आहेच; परंतु, या उपक्रमाने आजतागायत दुर्लक्षित राहिलेल्या किनाऱ्यावरील छोट्या जीवांच्या संशोधन आणि निरीक्षण क्षेत्रासंबंधी प्रबोधन करण्याचे काम अप्रत्यक्षरित्या केले आहे. ''मरिन लाईफ ऑफ मुंबई''ने मुंबईच्या किनाऱ्यांवर केलेल्या सागरी जीवांच्या नोंदीला आंतरराष्ट्रीय ''आय नॅचरलिस्ट'' या संकेतस्थळाने मान्यता दिली आहे. पाताडे यांच्यासोबत आज अनेक स्वयंसेवक जोडले गेले असून शौनक मोदी, गौरव पाटील आणि सेजल मेहता या स्वयंसेवकांनी ''मरिन लाईफ ऑफ मुंबई'' या उपक्रमाला नव्या स्तरावर घेऊन जाण्याचे काम केले आहे. सागरी परिसंस्थेसंबंधीच्या या लोकचळवळीला आज वनविभागाच्या कांदळवन कक्षानेदेखील मान्यता दिली आहे. या मोहिमेच्या आधाराने सुरू झालेली ''मरिन रिसपॉन्डेन्ट'' ही मोहीम सागरी जीव बचावाच्या कामात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यामुळे सागरी परिसंस्थेतील जीवांविषयी प्रत्येक निसर्गप्रेमीच्या मनात नवचेतना निर्माण करणारी ही मोहीम समुद्रकिनाऱ्यांविषयी असलेली अनेकांची दृष्टी बदलण्यास कारक ठरली आहे. सिटिझन सायन्स म्हणजेच नागरिक विज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सुरू झालेली ही मोहीम आज सागरी संशोधन, संवर्धन आणि जनजागृती क्षेत्रात लक्षणीय ठरली आहे.