वन्यप्राणी-मानव संघर्ष तीव्रच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन्यप्राणी-मानव संघर्ष तीव्रच
वन्यप्राणी-मानव संघर्ष तीव्रच

वन्यप्राणी-मानव संघर्ष तीव्रच

sakal_logo
By

वन्यप्राणी-मानव संघर्ष तीव्रच

सिंधुदुर्गातील स्थिती; शेती, बागायती सरकतेय जंगलाकडे

निखिल माळकर ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः सिंधुदुर्गातील वन्यजीव आणि मानवातील संघर्ष आजही कायम आहे. या संघर्षातून जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत म्हणजेच २०१९ ते २०२१ पर्यंत दोन जणांचा बळी, तर २२ जण जखमी झाले आहेत. पशुधनावर वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यातील प्रकरणांतही वाढ झाली असून अशी ४३४ प्रकरणे पुढे आली आहेत. जिल्ह्यात जंगलाच्या दिशेने शेती बागायती वेगाने सरकू लागल्याचे हे परिणाम म्हणता येतील. यातून शेतीच्या नुकसानीचे प्रमाणही वाढत आहे.
सिंधुदुर्गातील जंगलात मोठ्या प्रमाणावर शेती आहे. अलिकडे विशेषतः डोंगरी भागात काजू लागवडीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे खासगी वनाचे रुपांतर बागायतीत होताना दिसत आहे. या शेतीत अनेकवेळा वन्यप्राण्यांकडून हैदोस घालण्यात आला. यातून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानापोटी वनविभागाकडून मदत देण्यात येते; पण ती मदत झालेल्या नुकसानीच्या तुलनेत कमी आहे. या वनात प्रामुख्याने रानडुक्कर, जंगली मांजर, जंगली कुत्रा, हत्ती, बिबट्या, वाघ, गवे रेडे, माकडांची मोठी संख्या आहे. शिवाय काही हिंस्र पशूही आहेत. यात प्राण्यांनी भात, नाचणी, भुईमूग, केळीच्या बागा, सूर्यफुल ही पिके या वन्यप्राण्यांनी नेस्तनाबूत केली आहेत. वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. यातूनच शेतकऱ्यांना गतवर्षांत एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.
जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून पीक नुकसानीचे प्रकार हे वारंवार होतच असतात. त्यातून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. डोंगर पायथ्यावरून खाली येत वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीत हैदोस घातला जातो. यात जोडधंदा म्हणून पशुपालनाचा आधार शेतकऱ्यांचा असतो शिवाय शेती कामासाठी मोठी मदतही होत असते. अशात पशुधनावर होणाऱ्या हल्ल्यात मोठी वाढ झाली असल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर शेतीच्या माध्यमातून आर्थिक़ उत्पन्न वाढविणे कठीण बनले आहे.
काही वर्षांपूर्वी दोडामार्गमार्गे जिल्ह्यातील इतर भागांत पाऊल ठेवलेल्या हत्तींनी नुकसानीने बरीच ठिकाणी प्रभावित केली होती; मात्र हत्तीचा अपवाद वगळता इतर वन्यप्राणीही नुकसानीसोबत हल्ले करण्यात बरेच पुढे आले आहेत. यात नुकसानीने प्रभावित होणाऱ्या मानवाची उदासिनता ठळक असल्यामुळे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे. विशेषतः भात, नाचणी याची लागवड कमी होत आहे; मात्र जंगल तोडून काजू लागवड सह्याद्रीच्या अनेक भागात सुरुच आहे. पशुधनावरही होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. अलिकडे याचे प्रमाण अधिक झाले आहेत. गतवर्षी १५५ वेळा वन्यप्राण्यांकडून पशुधनावर हल्ले झाले आहेत. यावेळी २३ लाख ३६ हजार ८९८ एवढी भरपाई देण्यात आली. तर यावर्षी फक्त जानेवारीपर्यंतच १४९ वेळा पशुधनवर मृत व जखमी होण्याची वेळ आली आहे. यासाठी २३ लाख ५९ हजार ८५७ एवढी नुकसानी देण्यात आली आहे. वन्यप्राण्यापासून पशुधन मात्र संकटात आहे ही बाब ठळक दिसून येत आहे. वन्यप्राण्यांकडून मानवावर होणाऱ्या हल्ल्यात घट झाल्याचे समोर येत आहे. शेतीबाबत उदासिन व वन्यप्राण्यांकडून वारंवार नुकसानी होत असल्याच्या कारणामुळे शेतकऱ्यांकडून शेतीकडे पाठ फिरविण्यात येत आहे. शिवाय ज्या ठिकाणच्या शेतीमध्ये वन्यप्राण्याचा वावर ठळक असतो, अशा ठिकाणच्या बऱ्याच शेती पडीक होत आहेत. वन्यप्राण्यांकडून जीव गमाविण्यापेक्षा शेतीकडे पाठ फिरविण्याची नामुष्की आज आली असल्याचे दिसून येत आहे.
--------------
चौकट
भरपाईत वाढ
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी अथवा शेतकरी कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्‍या मदत निधीत पाच लाखाची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १५ लाखांचे अर्थसहाय्य दिले जात होते, आता ते वीस लाख दिले जाणार आहे. यापैकी दहा लाख रुपये हे देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाच्या माध्यमातून व उरलेले दहा लाख रुपयेही त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्‍या संयुक्त खात्यात ठेव रक्कम जमा करण्यात येते. व्यक्ती कायम अपंग झाल्यास पाच लाख तर गंभीर जखमी झाल्यास एक लाख पंचवीस हजार रुपये इतके अर्थसाह्य देण्यात येते. यामध्ये व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्च देणार असून, खासगी रुग्णालयात उपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा वीस हजार रुपये प्रति व्यक्ती इतकी राहणार आहे.
-----------
चौकट
पाळीव प्राण्यांवर हल्ला झाला तरी भरपाई
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्‍या ६० हजार रुपये रकमेत वाढ करून ती ७० हजार केली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्‍या १० हजार रुपये रकमेत वाढ करून ती १५ हजार रुपये केली आहे. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास देण्यात येणारी १२ हजार इतकी रक्कम वाढवून १५ हजार रुपये केली. गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास देण्यात येणारी ४ हजारावरुन ५ हजार रुपये इतकी केली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी व त्यामुळे संबंधित कुटुंबीयांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
-----------
पशुधन हानी

वर्ष*प्रकरणे*रक्कम
२०१९-२०*१३०*१९, ३२,८५०
२०२०-२१*१५५*२३, ३६, ८९८
२०२१-२२*१४९*२३, ५९, ८५७
----------
मनुष्य हानी

वर्ष*प्रकरण*रक्कम
२०१९-२०*१३*३,०५,३२,९९३
२०२०-२१*९*४९३२७१
२०२१-२२*२*५,४,६९५
-------------
कोट
वन्यप्राण्यापासून होणाऱ्या हल्ले कमी होण्यासाठी मानवाने स्वतःची व पशुधनाची काळजी स्वतः घेतली पाहिजे. शेतामध्ये जाताना सतर्कता बाळगायला हवी. तरच यात घट होवू शकते.
- नवकीशोर रेड्डी, उपवनसंरक्षक