वेंगुर्ले मुख्याधिकारीपदी कंकाळ रुजू; अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ले मुख्याधिकारीपदी कंकाळ रुजू;
अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून स्वागत
वेंगुर्ले मुख्याधिकारीपदी कंकाळ रुजू; अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून स्वागत

वेंगुर्ले मुख्याधिकारीपदी कंकाळ रुजू; अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून स्वागत

sakal_logo
By

६२२५५
वेंगुर्ले : नूतन मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांचे स्वागत करताना संगीता कुबल. शेजारी इतर.


वेंगुर्ले मुख्याधिकारीपदी कंकाळ रुजू;
अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून स्वागत
वेंगुर्ले ः येथील पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी आता पारितोष कंकाळ हे नवे मुख्याधिकारी रुजू झाले आहेत. येथील पालिकेत तीन वर्षे सेवा बजावल्यानंतर डॉ. सोंडगे यांची प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी कंकाळ यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यामुळे पालिकेवर सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. कंकाळ हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. वेंगुर्ले येथे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयाच्यावतीने कार्यालयीन अधीक्षक संगीता कुबल, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
...............
कुडाळला आजपासून व्यवसाय मार्गदर्शन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग आयोजित बेरोजगार युवक व युवतींसाठी मोफत कुडाळ येथे उद्यापासून (ता. १५) एक महिना कालावधीचा फळ प्रक्रिया व्यवसायावर आधारित उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यास १ हजार रुपये विद्यावेतन व शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वयोगट १८ ते ४५ वर्षे व शिक्षण किमान सातवी पास असावे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी सुषमा साखरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले आहे. या मोफत प्रशिक्षणासाठी दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड झेरॉक्स, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला, बॅंक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रे सादर करावी.
--
दोडामार्ग बसस्थानक सायंकाळी अंधारात
दोडामार्ग ः दोडामार्ग तालुक्याचे एसटी बसस्थानक तिन्ही सांजेच्यावेळी पूर्णतः अंधारमय असते. प्रवाशांना काळोखातच उशिराच्या बसची वाट बघत बसावे लागते. येथील बसस्थानक अलीकडील काही वर्षांत सुरु झाले. त्यावेळी स्थानक परिसरात विद्युत व्यवस्था व्यवस्थित होती; मात्र आता फक्त आतील भागात, तेही अर्धप्रकाशित काही दिवे पेटताना दिसतात. इतर विस्तारलेला परिसर सायंकाळी पूर्णत: काळोखात असतो. सायंकाळी उशिरा या स्थानकावरून गोव्याकडे जाणाऱ्या बसची महिलांसह प्रवासी प्रतीक्षा करत असतात. काळोख परिसर सुरक्षित नसल्याने महिला दोडामार्ग-गोवा राज्यमार्गाच्या बाजूला थांबतात आणि बस आल्यावर बसस्थानकात जातात, असे चित्र आहे. संबंधित प्रशासनाने वीज बिल परवडत नसेल तर सौरउर्जेवरील दिवाबत्तीची व्यवस्था करावी; पण बसस्थानक भयमुक्त करावे, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
----------------
वेंगुर्लेत शुक्रवारी वीज ग्राहक मेळावा
वेंगुर्ले ः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा वेंगुर्ले आयोजित व जिल्हा व्यापारी महासंघ, वेंगुर्ले तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ वेंगुर्ले यांच्या सहकार्याने शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहाला साई मंगल कार्यालय येथे शेतकरी, व्यावसायिक, औद्योगिक व घरगुती ग्राहकांसाठी प्रथमच वीज ग्राहक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात वीजबिलाबाबत तक्रारी, बंद असलेले पथदीप, वाढीव वीज बिले, कमी दाबाचा विद्युत पुरवठा, महावितरणच्या विविध योजना अशा विविध तक्रारींचा तत्काळ निकाल लावण्यासाठी घरगुती, व्यावसायिक, औद्यागिक, व शेतकरी ग्राहकांनी आपल्या शंका, तक्रारींच्या निवारणासाठी या मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन ग्राहक पंचायत वेंगुर्लेचे अध्यक्ष डॉ. लिंगवत, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी केले आहे.